सदस्य:डॉ.सुभाष राठोड, पुणे
Appearance
डॉ. सुभाष राठोड : लेखक परिचय
डॉ. सुभाष राठोड हे एक सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक व उत्कृष्ट ब्लॉगर असून ते गोर-बंजारा संस्कृतीचे संशोधक, अभ्यासक आहेत. ते सध्या पुणे येथे वास्तव्यास असून रयत शिक्षण संस्थेच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी बंजारा समाज व संस्कृती विषयी अनेक पुस्तके लिहिली आहेत. तसेच शिक्षणशास्त्रातील त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे येथे मराठी विषयाचे अभ्यास मंडळ सदस्य म्हणूनही योगदान दिले आहे. डॉ. सुभाष राठोड हे स्वतः समाजकार्यात सक्रिय असून उपेक्षित, दुर्लक्षित अशा भारतीय बंजारा समाजाच्या विविध सांस्कृतिक पैलू व सामाजिक समस्यांवर आपल्या लेखनातून अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. जन्म - बालपण व शिक्षण : डॉ. सुभाष राठोड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९७७ रोजी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील नायगाव येथे एका बंजारा तांड्यावर झाला. त्यांचे पूर्वज चार पिढ्यांपासून नायगाव येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे बालपण नायगाव तांड्यावर गेले. त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यांचे वडील हेमाजी नाईक राठोड हे अल्पभूधारक शेतकरी होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते ऊसतोड कामगार म्हणून कुटुंबीयांच्या समवेत मोसमी स्थलांतर करायचे. त्यामुळे डॉ. सुभाष राठोड या़ंचे प्राथमिक शिक्षण मध्येच थांबत असे. परंतु नंतरच्या काळात राठोड कुटुंबीयांना शिक्षणाचे महत्त्व कळले होते. आपल्या वाट्याला आलेले हालाखीचे जीणे आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ते आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी जागरूक झाले होते. डॉ. सुभाष राठोड यांना बालपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण नायगाव, मंठा येथे झाले व महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथे पूर्ण झाले. एका निरक्षर कुटुंबात जन्मलेल्या डॉ. सुभाष राठोड यांनी शिक्षणातील सर्वोच्च पदवी पीएच.डी. बरोबरच अनेक पदव्या मिळवल्या आहेत. ग्रंथ संपदा : डॉ. सुभाष राठोड यांनी शिक्षणशास्त्र या विषयांबरोबरच गोरं बंजारा संस्कृती व इतिहास, बंजारा तथा गोर बंजारा समाजाची बोलीभाषा यांसारख्या विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 'बंजारा समाज : गोरबोली आणि मौखिक वाड्.मय,, सामाजिकशास्त्रे : अध्ययन - अध्यापनशास्त्र - भाग १ व २, Pedagogy of social sciences, आकारिक मूल्यमापन आदी त्यांचे ग्रंथ प्रकाशित आहेत.
पुरस्कार : राष्ट्रीय विद्या सरस्वती पुरस्कार, विद्यारत्न पुरस्कार, लाईफ टाईम ॲचिव्हमेंट ॲवॉर्ड, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. सुभाष राठोड यांनी महाराष्ट्रातील गोर-बंजारा तथा गोरमाटी - लमाण समाजात शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जागृती, प्रबोधन करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते सध्या रयत शिक्षण संस्थेत सेवेत असून सातत्याने विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन करीत असतात. ते एक उत्कृष्ट ब्लॉगर असून मराठी मायभूमी, शिक्षण कट्टा, गोरबंजारा साहित्य या विविध ब्लॉगवरून लेखन करीत असतात.