सदस्य:गणेश सावंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

‘दैववादी नव्हे कर्मवादी बना’


उन्हाळा अन् पावसाळा स्वराज्याचा गारवा 

जिजाऊंच्या जिवावर नाही कुणाची परवा 

आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या अण्या

होईल तुझीच रं शोभा बोल दुरुनी शहाण्या 

आम्ही जिजाऊच्या मुली मिर्‍या परीस तिखट

बोल जपून रं बाबा, आप जाईल फुकट

आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा

नाही घेणार बघ दादा कोण्या परायाचा वारा 

राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या स्वप्नातलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात उतरवलं आणि ते स्वराज्य रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत अबाधित ठेवलं तर नव्हे नव्हे ते संभाजी राजांनी वाढवलं म्हणूनच आज साडेतीनशे वर्षानंतरही महाराष्ट्राच्या कणा कणात तना-तनात आणि मना-मनामध्ये जिजाऊ मॉ साहेबांनी निर्माण केलेल्या स्वातंत्र्याचा अभिमान प्रत्येकाला वाटतो. त्यातले त्यात अबला म्हणून आजपर्यंत जगत आलेली महिला केवळ जिजाऊ मॉ साहेबांच्या कणखर धोरणामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या स्वराज्यामुळेच स्पष्टपणे आजही बोलते. इतिहासाच्या कालपटलावर ज्या काही स्त्री व्यक्तिमत्त्व उभारीस आलं त्या व्यक्तिमत्त्वामध्ये जिजाऊंचं नाव सर्वप्रथम घ्यावच लागेल. म्हणूनच आजही जगभरात जिजाऊ मॉसाहेबांच्या कार्याची नोंद घ्यावी लागते.

तो काळ कसा होता 

ज्या काळात मराठी मातीत सर्वत्र मुर्दाड आणि निसत्व वातावरण निर्माण झालं होतं. पारतंत्र्य आणि गुलामीबद्दल कुणालाही तिटकारा वाटत नव्हता. स्वातंत्र्य गमावल्याबद्दल खेत नव्हता. भूमीपुत्रांनाच मुस्कटदाबी सहन करावी लागत होती. आदिल शाही, कुतुबशाही, निजामांसह पोर्तुगीज, डच, इंग्रजांसारखे दुश्मन चारही बाजुने महाराष्ट्राचे लचके तोडत होते, रयत पिचली जात होती, सत्य काय-असत्य काय, न्याय काय-अन्याय काय याचं कुणालाही देणेघेणं नव्हतं. अशा स्थितीत दैववादी बनून आजचं मरण उद्यावर ढकललं जात होतं. मराठी मुलुखातील प्रस्थापितांना उलथवून टाकण्यासाठी जिजाऊ मॉ साहेबांनी स्वराज्य विचारांचा पुरस्कार केला आणि तो शिवरायांद्वारे अमलात आणला. त्यांचा स्वराज्य विचारही या मराठी मुलुखात नव्या युगाची नांदी होती. जेवढा शत्रुंचा दहशतवाद होता तेवढाच मनुवाद्यांनी स्त्रीयांना गुलामीचं जिनं बहाल केलं होतं. समाजाच्या मोठ्या वर्गाला दैववादी बनवलं होतं. माणसा-माणसात, जाती-जातीत जातीयवादाच्या भिंती उभ्या केल्या होत्या. महाराष्ट्रातल्या मर्द माणसांनी क्षत्रियत्व पूर्णपणे बाजुला ठेवलं होतं. समाज बलहीन, सत्वहीन आणि तेजोहीन बनला. या परिस्थितीत माणसातल्या मना-मनात आणि तन-तनातली चेतना जागवायची, त्यांच्यातलं क्षत्रियत्व जागं करायचं, शत्रुविरोधात बंडाच्या मशाली पेटवायच्या आणि रयतेने गमावलेल्या सत्वाला फुंकार घालायचीय या भूमिकेत जिजाऊ मॉ साहेब स्वत:हून घुसल्या आणि त्यांनी माणसा माणसातला स्वाभीमान जागा केला. त्यांना छात्रवाण्यांची शिकवण दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत होय, आम्हाला स्वातंत्र्याचा श्‍वास हवाय, आम्हाला लाचारीचं जगणं नकोय, कष्टाचं असेल परंतु हक्काचं असेल असं आम्हाला घरदार आणि शेतपोत हवय. आम्ही आमचं स्वराज्य उभं करू शकतो आणि ते स्वराज्य चांगलं चालवूही शकतो ही उमेद शिवबांना जिजाऊ मॉ साहेबांनीच दिली. म्हणूनच स्वराज्याचं तोरण बांधता आलं. २३ किल्ले तहात देऊन त्याच्या दहापट किल्ले पुन्हा महाराजांना जिंकता आले ते केवळ आणि केवळ राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांच्या दुरदृष्टीमुळे आणि दैववादापेक्षा श्रमवादाला महत्त्व दिले म्हणूनच.

अंधश्रध्देवर प्रघात 

करणार्‍या राजमाता जिजाऊ आदर्श माताच नव्हे राष्ट्रमाता तर ठरल्याच ठरल्या परंतु जात-पात-धर्म-पंथापेक्षा माणुस धर्म सर्वश्रेष्ठ कसा आहे हे दाखवणार्‍या जणू चंडीकाच या महाराष्ट्राच्या भुतलावर अवतरल्या, असा आभास तेव्हा नक्कीच झाला असेल. इतिहासातला एक दाखला याठिकाणी द्यावयासा वाटतो जेव्हा मुरार जगदेवाने पुणे परगण्यावर गाढवाचा नांगर फिरवला, शास्त्रवचण पुढे करत धार्मिक दहशतवाद माजवण्याच्या इराद्याने ज्याठिकाणी गाढवाचा नांगर फिरवला त्याठिकाणी उभी पहार रोवली आणि त्यावर फाटकी वाहन लटकवून ठेवली. शास्त्र वचनात याचा अर्थ असा होतो, जिथं गाढवाचा नांगर फिरवला जातो तिथं पहार आणि फाटकी वहान असेल आणि ती जमीन कुणी जर कसेल तर कसणार्‍याचा निर्वंश होईल. मुरार जगदेवाच्या या धार्मिक दहशतवादाला पुण्या परगण्याचे लोक बळी पडले. अगोदरच रक्तपातीत दहशतवादी भेदरलेले बापडे धार्मिक दहशतवाद्याने अधिकच भेदरून गेले आणि त्यांनी पुणे परगणा सोडला. जिजाऊ मॉ साहेब जेव्हा बाल शिवबांना घेऊन पुण्यात आल्या, त्याठिकाणी लाल महाल बांधला, त्यावेळी त्यांनी उभी पहार आणि फाटकी वहान असलेल्या जमिनीवर शेत फुलवण्याचे मनसुबे आखले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते त्याठिकाणी सोन्याचा फाळ लावून तिथं नांगरणी करण्याचे योजिले. पुणे परगण्यात दवंडी देण्यात आली, प्रत्यक्षात नांगरणी करण्यास सुरुवात केली, त्याच दरम्यान मॉ साहेबांकडे असलेला भट त्याठिकाणी आला आणि मॉ साहेबांना म्हणाला, ‘मॉ साहेब, हे चुकीचं करताय, मॉ साहेब म्हणाल्या, मतलब, भट म्हणाला, ‘ ही जागा कसण्यायोग्य नाही,’ मॉ साहेबांनी उत्तर दिलं, ‘कसलं तर काय होईल,’ भटाने भीत भीत उत्तर दिलं, ‘तो जमीन कसेल तो निर्वंश होईल,’ जिजाऊ मॉ साहेबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, त्या कडाडल्या, ‘भट, ही जमीन तुम्हाला दिली तर, भट म्हणाला, ‘मी आनंदाने कसेल,’ तेव्हा मॉ साहेब म्हणाल्या, ‘तुमचा निर्वंश होणार नाही का?’ तो म्हणाला ‘नाही’, संतापलेल्या मॉ साहेबांनी मुरार जगदेव कोण? भट म्हणाला, ‘ब्राह्मण,’ मग एका भटाने रक्तपातीत दहशत माजवायचा आणि दुसर्‍या भटाने त्याची री ओढत धार्मिक दहशतवादाला खतपाणी घालायचे हे खपवून घेतले जाणार नाही. या स्वराज्यात कुठलीही जात-पात-धर्म-पंथ नसेल. इथं असेल तो स्वराज्याचा धर्म आणि माणुसकीचा धर्म आणि राजमातांनी त्याठिकाणी अंधश्रध्देला मुठमाती देत दैववादी बनण्यापेक्षा श्रमवादी, कर्मवादी बना म्हणत सोन्याचा नांगर फिरवून त्याठिकाणी शेत पिकवलं. ‘शुद्ध बिजापोटी फळ रसाळ गोमटी’ मॉ साहेबांनी केलेल्या पेर्‍यात पीक असं काही पिकलं की परागंदा झालेली माणसं पुन्हा परगण्यात येऊन थांबली. अंधश्रध्देचं किडकं फळ मॉ साहेबांनी अलगद उचलून फेकून दिलं. तर दुसरीकडे 

स्त्री अत्याचारावर 

लक्ष केंद्रित करत ज्या राज्यात स्त्रीयांची विटंबणा होईल ते राज्य वर्धेष्णो होऊच शकणार नाही. स्त्रीयांवर अत्याचार करणारा त्यांची विटंबणा करणारा मग ती स्त्री कुठल्याही जात-पात-धर्म-पंथ वंशाची असो, जो अत्याचार करतो तो समाजद्रोहीच. स्त्री शक्तीला हीन लेखणारा, स्त्रीयांची टेहाळणी करणारा, जगामध्ये तिरस्कारणीच होय. स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे, ती सदैव त्याज समजावी आणि तिला अप्रतिष्ठा मानणारी मनुस्मृतीची शिकवण अद्याप या राज्यात विसरली गेली नाही. म्हणूनच रांझेगावच्या पाटलाने एका अबला स्त्रीवर बलात्कार केला, मनुस्मृतीला ठोकरून स्त्रीला प्रतिष्ठा देणारा पुत्र राजमाता जिजाऊ मॉ साहेबांनी निर्माण केला. याचं उदाहरण रांझेगावच्या पाटलाचा देता येईल. स्त्रीयांना बटीक समजणार्‍या पाटलाचे हात-पाय तोडून त्याचा चौरंगा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आणि त्यांनी स्त्रीयांना भोगाची वस्तू समजणार्‍यांना जबरदस्त चपराक दिली. राजमाता जिजाऊ मॉ साहेबांचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे माणसाला सुतासारखं सरळ करणारा तर धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र हा धगधगता निखारा समजायला हवा. शिवाजी राजे आणि धर्मवीर संभाजी राजे या दोन सर्वश्रेष्ठ योद्धे आणि राजे या महाराष्ट्राच्या मातीला केवळ आणि केवळ राजमाता जिजाऊ मॉ साहेबांना मिळाले. खरं पाहितलं तर जिजाऊ मॉ साहेबांचं चरित्र खळखळणार्‍या निखळ पाण्यासारखे जेवढे स्वच्छ आहे तेवढेच त्या चरित्रामध्ये पराकोटीचा संघर्ष आणि सत्यासाठी-न्यायासाठी, लोकांच्या सत्वासाठी, अभिमान-स्वाभिमानासाठी धगधगणारं एक ज्वालामुखी स्वरुप मूर्तीमंत उदाहरण म्हणजेच राजमाता जिजाऊ आहे. एकूणच ज्या महाराष्ट्राच्या मातीत 

तुमचा-आमचा जन्म झाला 

ती माती म्हणजे जिजाऊ मॉ साहेबांची कुस आहे. मग आम्ही जर जिजाऊंच्या कुशीतून जन्मलो आहोत तर आम्ही जात-पात-धर्म-पंथ का पाळतोत? स्त्रीयांवर आजही अत्याचार का करतोय? याचं आत्मचिंतन नक्कीच व्हायला हवा. जिजाऊंच्या लेखी स्वाभिमानाने जिणं जगतायत त्याचा अभिमान तुम्हा-आम्हाला नक्कीच असायला हवा. जिजाऊंच्या चरित्रातून दुसरं काही शिकता आलं नाही तरी आकालच्या महिला-पुरुषांनी, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी माणसातलं माणूसपण, त्याचं कर्तव्य-कर्म त्यातून नक्कीच शिकावं तो यशोशिखरावर गेल्याशिवाय राहणार नाही. तलावात ऐटीत पोहणारा बदक आपल्याला दिसतो, परंतु पाण्यावर तरंगणार्‍या बदकाला तरंगण्यासाठी स्वत:चे पाय किती हलवावे लागतात हे आपल्याला दिसत नाही. म्हणूनच आम्ही म्हणतो, दैववादी बनू नका, श्रमवादी बना, कर्मवादी बना आणि मग बघा तुमच्या विकासाआड कोण येतो. ब्रह्मदेवाचा बाप जरी तुमच्या विकासाआड आला तर जिजाऊंचा कर्मवाद-श्रमवाद त्याचाही नितपात करायला मागे पुढे पाहणार नाही हे त्रिवार सत्यच तुमच्या-आमच्यात धगधगता निखारा निर्माण करणार्‍या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांना सायं. दैनिक बीड रिपोर्टरकडून त्रिवार मानाचा मुजरा!

सायं दैनिक बीड रिपोर्टर मधील आज १२ जानेवारी जिजाऊ माँ साहेबांवरील अग्रलेख