सदस्य:एकनाथ शिँदे
जुने गाव- पिरकल्याण
एके काळी अध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक, राजकीय, नैतिक, आर्थिक, शैक्षणिक, शेती, सिंचन, पर्यावरण आदी सर्वच क्षेत्रात वैभवसंपन्न असलेले आणि कल्याणी काठी वसलेले गाव म्हणजेच*पीरकल्याण(जुने गाव)*. जिथे बारमाही संपन्नतेचे खळखळ झरे वाहत होते. पीरकल्याण म्हणजे सर्वधर्म समभाव,समता, बंधुता, एकता, न्याय, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सदविचार, सहकार्य, भावनेच्या श्रीमंंती थाटाचे गाव. आजूबाजूला दूरदूर पर्यंत ख्यातीप्राप्त गाव. प्रत्यक्षात गावाच्या या वैभवाचा आस्वाद आमच्या पिढीला घेता नाही आला. कधीकाळी बालपणी सणावाराला आजोबांसोबत जुन्या गावातील देवदैवतांच्या दर्शनासाठी जायचो. आजोबा भारावल्यागत सांगत राहायचे त्यांच्या बालपणापासूनची गावाची श्रीमंती, दाखवायचे पडझड झालेल्या वाड्यांच्या खाणाखुणा. चुलत्याकाक्यांची घरदारं.सख्यासोबत्यांच्या गमतीजमती. मध्येच आवंढा गिळायचे, क्षणभर स्तब्ध व्हायचे. नकळतपणे पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा धोतराच्या सोग्यानं पुसून चालू लागायचे दवालमालकाच्या दर्ग्याकडं. जुन्या आठवणींना उराशी कवटाळून भक्तिभावाने मारुतीच्या पारावर माथा टेकायचे. नंतर सावतोबाच्या देवळात क्षणभर टेकायचे. आजूबाजूला पडझड झालेल्या जुन्याजीर्ण भग्न अवशेषाशी हितगुज करीत स्वारी चालू लागायची. भावकीतल्या एकाएकाची घरं, वाडे, ओटे, मिरगसण, सारं काही पुसटशा आठवणाऱ्या खाणाखुणा उभं राहून दाखवायचे. फिरतफिरत बालपणी पावसाळी पन्हाळाखाली चांदुडी पैसे गोळा करण्यासाठी बालमित्रांसह उडणारी झुंबड सांगत, त्या पन्हाळाचा टोलेजंग वाडा दाखवायचे. गतकाळातील वैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवत उतारत्या वयातही तो वाडा आजोबाला नि आजोबा त्याला पाहून बेधुंद होत. तिथंच गावाच्या सर्वच इतिहासाचा साक्षीदार असलेल्या वडाच्या झाडाखाली आईच्या कुशीत बसल्यागत बसून रहायचे. काही वेळ बसल्यानंतर आमच्या वाड्याचे भग्नावशेष दाखवायचे. मी त्या पूर्वजांच्या अपूर्व ठेव्याला डोळाभरुन साठवून घ्यायचो. गावतल्या आसराजवळ येऊन नजर पुरेल तिथपर्यंत धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या वाडवडिलांच्या, भावभावकींच्या शेतजमिनीच्या आठवणी जागवायचे. परत फिरतांना मांगवाडा, महारवाडा, धनगरवाडा, मुस्लिम मोहल्ला,तेली, तांबोळ्यांची घरं सगळं काही पुन्हापुन्हा न्याहाळायचे. निजामकालीन पोस्ट आँफिस बघायचे. जड अंतःकरणाने माघारी फिरतांना पुन्हा एकदा गावाकडं तोंड करुन हात जोडून पायाला दगड बांधल्यासारखे चालू लागायचे. जुन्या गावात जातांनाचा आजोबांचा उत्साह गावातून परततांना ओसरुन गेलेला असायचा. ते आख्यायिकांसारखे जुन्या गावाविषयी सांगत सुटायचे. मी आपला बालमनाला आवर घालत उत्सुकतेपोटी हूं हूं हुंकार भरत ऐकत राहायचो. वर्ष उलटले, आजोबा काळाआड गेले. पण माती अन् वतन न विसरण्याचा सल्ला देऊन गेले. आजोबाच्या माघारी जुन्या गावात फारसे जाणे होत नाही. काल नवरात्रीच्या निमित्ताने लेकरासंग जुन्या गावात गेलो. आजोबांची आठवण आली. अंगावर सरसरून काटा आला. आजोबाचे शब्द कानात गुंजू लागले. न पाहिलेले पण आजोबांनी शब्दबद्ध केलेले जुने गाव झरझर नजरेसमोर येत गेले. आजही तिथले भग्नावशेष गतकाळाचा उजाळा देत राहतात. गावात शिरताच आई जगदंबा जणू आमची वाटच पाहत होती. आता तिथे फारसे कुणी जात नाही. आजूबाजूला निसर्गसौंदर्याचे लेणे सांभाळत ती एकटीच मंदिरात लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. नाहीच आलं कुणी तर आठवत राहते गतकाळातील नवरात्र, दिवाळी, पोळा आदी सणांची संपन्नता. वाढलेल्या गवतातून वाट काढत पूर्वजांनी जीव ओतून बनवलेल्या त्या पावन मंदिरात गेलो. कूलस्वामिनी आई जगदंबेच्या चरणी कन्या ज्ञानेश्वरीसह षड्विकार सांडून भक्तिभावे नतमस्तक झालो. धरणाच्या पाण्याखाली गेलेलं गाव, गावाचं वैभव, संपन्नता शोधक नजरेने शोधावं लागत होतं. तिथल्या स्थितीगतीवर ज्ञानेश्वरीने विचारलेल्या बालबोध प्रश्नांनी मात्र मला पुरते निरुत्तर केले होते..... जुन्या गावातल्या अमूल्य ठेव्यासाठी मी मात्र सैरभैर झालेला असतो. प्रा. एकनाथ शिंदे, धारकल्याण-पीरकल्याण /धुळपाटी