सतसई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सतसई हा हिंदी काव्यरचनेचा एक प्रकार आहे. या रचनेत, कमीतकमी सतसई म्हणजे सातशे कडवी असतात. एका कडव्याच्या विषयाचा दुसऱ्या कडव्याशी काही संबंध असलाच पाहिजे असे नाही. त्या अर्थाने या रचना स्वैर(मुक्तक) समजल्या जातात.

सतसई या परंपरेची सुरुवात सातवाहन राजा हालने संग्रहित केलेल्या गाथा सप्तशतीपासून सुरू झाली. संस्कृतमध्ये गोवर्धनाचार्यांची आर्यासप्तशती प्रसिद्ध आहे. हिंदीमध्ये बिहारी नावाच्या कवीने ’बिहारी सतसई’ नावाचे काव्य लिहून ही परंपरा हिंदीत आणली. या ’बिहारी सतसई’ चे मराठी रूपांतर राजा बढे यांनी रसलीना या नावाने केले आहे.

हिंदीत ’बिहारी सतसई’नंतर, ’चंदन सतसई’, ’तुलसी सतसई’, भूपति सतसई, मतिराम सतसई, रसनिधि सतसई, रहीम सतसई, राम सतसई, विक्रम सतसई, वृंद सतसई, आदी सतसया लिहिल्या गेल्या.

आधुनिक काळातही हरिऔध कवीची ’हरिऔध सतसई’, वियोगी हरि कवीची ’वीर सतसई’ वगैरे सतसया आहेत.

सतसईची वैशिष्ट्ये[संपादन]

  • सतसईमध्ये ७०० किंवा ७००पेक्षा थोडी जास्त कडवी असतात. प्रत्येक कडवे दोन ओळींचे असते.
  • काव्याचा छंद बहुधा दोहा असतो. क्वचित अधूनमधून सोरठा किंवा बरवै हे छंद वापरलेले दिसतात.
  • सतसईंमध्ये प्रामुख्याने शृंगाररस असतो. कधीकधी भक्तिरस किंवा वैराग्यरस आढळतो. बिहारी सतसई शृंगारप्रधान आहे, तर वृंद सतसई नीतिप्रद आणि तुलसी सतसईमध्ये भक्ति, ज्ञान, कर्म आणि वैराग्यरसयुक्त दोहे आहेत.