संजय कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संजय दिनकर कुलकर्णी (जन्म : इ.स. १९५०; - सासवड, २५ मार्च, २०१४) हे एक मराठी पत्रकार आणि लेखक होते. पत्रकारितेमध्ये संजय दिनकर अशी ओळख असलेले कुलकर्णी हे अनेक वर्षे दैनिक केसरीमध्ये उपसंपादक म्हणून काम करीत. केसरीत येण्यापूर्वी ते दैनिक देशदूतविशाल सह्याद्रीत होते. चित्रपट क्षेत्रावरील त्यांचे लेखन विशेष गाजले. जुन्या चित्रपटांविषयी समीक्षा लेखनाबाद्दल त्यांची विशेष ख्याती होती.

पुणे परिसरात दिवाळी अंकाच्या स्पर्धा संयोजनात त्यांचा मोठा सहभाग होता.

संजय दिनकर यांचे बालपण[संपादन]

संजय यांचे आईवडील शिक्षक होते. त्यांची जेजुरी येथे बदली झाली. त्यामुळे संजय यांना वयाच्या चौथ्या वर्षी जेजुरीला यावे लागले. दिलीपकुमार-वैजयंतीमाला यांच्या ‘नया दौर’चे चित्रीकरण त्यावेळी तिथे चालू होते. वडील दिनकरराव कुलकर्णी यांनी दिलीपकुमार यांचा सत्कार शाळेत घडवून आणला. ‘नया दौर’मधील दिलीपकुमार-अजित यांच्यातील टांग्याची शर्यत, त्यांची टेकडीवरील मारामारी या जेजुरीच्या परिसरातील झालेल्या चित्रीकरणाचा प्रभाव संजय यांच्या मनावर कायमचा कोरला गेला. त्याच्याच जोडीला, त्यांना दैनिकांत येणाऱ्या चित्रपटांच्या जाहिराती पाहण्याचा छंद जडला. त्यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ट्रान्झिस्टरवर चित्रपटांची गाणी ऐकणे, संधी मिळेल तेव्हा तंबूतील चित्रपट पाहणे हेही सुरू झाले.

ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. त्यांनी स.प. महाविद्यालयाच्या कला शाखेत प्रवेश घेतला. दरम्यान, वडिलांचे निधन झाले. संजय यांच्या आईवर कुटुंबाची जबाबदारी आली. संजय वृत्तविद्येच्या कमी खर्चातील अभ्यासक्रमासाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. सुधाकर पवार तिथे शिक्षणप्रमुख होते. त्यांनी शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांना औरंगाबाद, नाशिकला नेले. संजय यांना तेथून परतताना नाशिक येथे नव्याने सुरू झालेल्या ‘देशदूत’मध्ये उपसंपादकाची नोकरी लागली. त्याचवेळी नाशिकमध्ये राजेश खन्नाच्या ‘दुश्मन’चे चित्रीकरण चालू होते. त्याबद्दल स्थानिक वार्ताहराने आणलेल्या बातम्यांना शीर्षक देण्याचे पहिले काम त्यांना करावे लागले. चित्रपटविषयक मजकुराशी तेथेच, पत्रकारितेच्या पहिल्या दिवसापासून त्यांची मैत्री जमली. ती पुढे कायम टिकली.

संजय दिनकर यांची पुस्तके[संपादन]

  • असे चित्रपट अशा आठवणी (चित्रपटविषयक)
  • झंझावात (आचार्य अत्रे यांच्या जीवनावरी कादंबरी)
  • झुंज (लघुकथासंग्रह)
  • नगर वधू (कादंबरी)
  • बंटी दि ग्रेट (बालगीते)
  • बडबडगाणी बंट्याची (बालकवितासंग्रह)

संजय कुलकर्णी यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • सासवडच्या आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार.