संशयकल्लोळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(संगीत संशयकल्लोळ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर, इ.स. १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.

या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग इ.स. १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात ३० पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्कराचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते.

कथानक[संपादन]


अत्यवस्थता
खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.

अश्विनशेठ आणि रेवती हे या नाटकाचे नायक-नायिका आहेत. फाल्गुनराव आणि कृत्तिका या भूमिका थोडीफार खलनायकी स्वरूपाच्या आहेत. नायक-नायिकेत गैरसमज करून देण्यामागे त्यांचा सहभाग आहे. याशिवाय अश्विनशेठचा मित्र वैशाखशेठ, रेवतीची आई मघा नायकीण, तसेच भादव्या, रोहिणी, आषाढ्या, स्वाती, तारका आदी दुय्यम पात्रेही नाटकात कथानकाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे नाटकाच्या रंजकतेमध्ये अधिक भर पडली आहे.

फाल्गुनराव हा संशयी स्वभावाचा आहे. तो आपली बायको कृत्तिकावर संशय घेतो. तीही संशयग्रस्त आहे.या संशयाच्या जाळ्यात ते नकळत अश्विनशेठ-रेवती या नायक-नायिकेलाही ओढतात. ही गुंतागुंत शेवटी सर्व संशय फिटेपर्यंत वाढतच जाते, आणि नाटक, बघणाऱ्याची उत्सुकता ताणत ताणत अखेरपर्यंत मनोरंजक राहते.

पद्यरचना[संपादन]

बोलता बोलता गायचे आणि गाता गाता बोलायचे, हा देवल आणि किर्लोस्कर यांच्या संगीत नाटकांचा आत्मा संशकल्लोळमध्येही राखला गेला आहे.

संगीत संशयकल्लोळमधील काही पदे[संपादन]

 • अधमा केली रक्षा मम
 • कर हा करीं धरिला
 • कुटिल हेतू तुझा फसला
 • कोण जगिं मला हितकर
 • खोटी बुद्धि केवि झाली
 • चिन्मया सकल हृदया
 • जा करा कृष्णमुख
 • तनुविक्रय पाप महा
 • धन्य आनंददिन पूर्ण मम
 • नष्ट कालिकाल हा
 • नाट्यगाननिपुण कलावतिची
 • निंद्य जीवनक्रम अमुचा
 • प्रथम करा हा विचार
 • भोळि खुळीं गवसति जीं
 • मंगलदिनि तन मन
 • मजवरी तयांचें प्रेम
 • मानिली आपुली तुजसि
 • मृगनयना रसिक मोहिनी
 • लग्‍नविधींतील खरें मर्म
 • शिणवू नको कंठ असा
 • सदय किती कोमलमति
 • संशय का मनि आला
 • साम्य तिळहि नच दिसत
 • सुकांत चंद्रानना पातली
 • सौख्यसुधा वितरो
 • स्वकर शपथ वचनिं
 • हा खचित दिसे मम
 • हा नाद सोड सोड
 • ही बहु चपल वारांगना
 • हृदयि धरा हा बोध

पदे गाणारे गायक-गायिका[संपादन]

1सुकांत चंद्रानना(प्रभाकर कारेकर] 2धन्य आनंद दिन(शरद जांभेकर) 3कर हा करि धरिला(वसंतराव देशपांडे) 4ही बहु चपल वारांगना(प्रकाश घांग्रेकर) 5 ह्रदयी धरा बोध खरा (रामदास कामत)6 मृगनयना रसिक मोहिनी (वसंतराव देशपांडे) 7हेतू तूझा फसला (प्रभाकर कारेकर)8 हा नाद सोड सोड (प्रभाकर कारेकर)