Jump to content

श्रीरामवरदायिनी (चोरवणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीरामवरदायिनी, चोरवणे या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रीरामवरदायिनी देवी,चोरवणे

श्रीरामवरदायिनी देवी ही चोरवणे, रत्‍नागिरी या गावाची ग्रामदेवी आहे.

स्थलविषयक

[संपादन]

चोरवणे हे गाव रत्‍नागिरी जिल्हातील खेड तालुक्यात येते. चोरवणे गावात खेड आणि चिपळूण, दोन्हीकडून जाता येते. चिपळूण पासून चोरवणे हे गाव, साधारणपणे ४०-४२ कि.मी. अंतरावर आहे. हे गाव सह्याद्री पर्वतरांगेतील श्रीनागेश्वर आणि शिवकालीन ’वासोटा[] किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. वासोटा किल्ल्याचा कोकणातील पायथा म्हणजेच चोरवणे गाव. दुर्गप्रेमी, गिरिविहार करण्याऱ्या मंडळींना ’चोरवणे’ हे गाव नवीन नाही. ’वासोटा’ किल्ल्याच्या डोंगर रांगेतील एका सुळक्यावर एक प्राचीन ’शिवगुंफा’, श्रीशंकराचे स्थान आहे त्यास ’नागेश्वर’, ’नागेश्वरचा डोंगर’ म्हणतात. चोरवणे ते नागेश्वर हा ट्रेक साधारण दोन ते चार तासांचा आहे, चढाई खूप सरळ असल्याने, एका आख्‍ख्या डोंगराला अर्धप्रदक्षिणा घालून, मग ’नागेश्वराच्या’ अरुंद वाटेकडे जाता येते.

चोरवणे गावातील श्रीरामवरदायिनी देवीची कथा अशी सांगितली जाते : रावणाने सीताहरण केल्यानंतर प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेत जंगलामध्ये फिरत होते. त्यांना बघून पार्वती शंकराला म्हणली,"राम सीतेच्या शोधात फार व्याकूळ झाले आहेत, त्यांची ती अवस्था मला पहावत नाही, तेव्हा मी त्यांची सीता बनून त्यांच्याकडे जाते, जेणेकरून ते ह्या दुःखातून सावरतील". तेव्हा शंकर म्हणाले "तसे काही करू नकोस ते तुला ओळखतील, ते परम पुरुष असून, एकवचनी, एकबाणी आहेत. शिवाय ते विष्णूचाच अवतार आहेत. परंतु पार्वतीला त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही., तिने सीतेचे रूप घेतले आणि श्रीरामासमोर प्रकट झाली, श्रीरामाला म्हणाली "नाथ! आपण का इतके का व्याकूळ झालात, मी तर इथेच आहे, तेव्हा माझा स्वीकार करा". परंतु प्रभूरामचंद्राने पार्वतीला ओळखले, आणि त्या सीतेच्या रूपातील पार्वतीला म्हणाले, ’माते! तू कशाला एवढे कष्ट घेतलेस आणि इकडे आलीस?". तेव्हा पार्वतीने आपले मूळ रूप प्रकट केले आणि श्रीरामाला वरदान दिले की, "ज्या कार्यासाठी आपण जन्म घेतलात, ते कार्य सफल होईल". तेव्हा रामाने पार्वतीला विनवले, ’देवी! तू एवढे कष्ट घेतलेस आणि ह्या जागी आलीस, तर तू या जागेवर ’श्रीरामवरदायिनी’ नावारूपाने रहा आणि भक्तांचे कल्याण कर’, तेव्हा पासून श्रीरामवरदायिनी देवीचे जागृत देवस्थान या गावामध्ये आहे.

देवालय परिसर

[संपादन]

देवळासमोर येताच, प्रथम दर्शनी दिसतो तो देवळाचा घुमट आणि परिसरातील दीपमाळेसारखा मनोरा. प्रवेशद्वाराशीच कोरलेले दोन स्तंभ आहेत. इतिहासाच्या पुसट झालेल्या खुणा जपत जपत ते अजूनही उभे आहेत. बहुधा ते स्तंभ नसून ’वीरगळ’[]असावेत. देवीमंदिराच्या बाजूलाच एक प्राचीन कौलारू ’हनुमान’ मंदिर आहे. श्रीसमर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ व लगतच्या परिसरात अकरा मारुतींच्या मू्र्ती स्थापल्या. त्यापैकी त्यांनी स्थापलेल्या एखाद्या ’वीर हनुमानाची’ ही प्रतिकृती असावी, इथे पूर्वी देवळाबरोबर तालीम असावी असे वाटते. देवीच्या देवळाच्या प्रवेशद्वाराबाहेर एक अष्टकोनी चौथरा दिसला. आत शिरताना एक छोटा सभामंडप लागतो, नंतर गाभारा. तिथून पुढे आल्यावर गृहगर्भात देवीचे दर्शन होते. देवीची मूर्ती ही अश्वारूढ आहे, घोड्यावर स्वार झालेली ह्या चतुर्भुज देवीचे नाव आहे, ’श्रीरामवरदायिनी’, तिला ’श्रीरामवरदान देवी’ असेसुद्धा म्हणतात.

देवीचे मूळ स्थान

[संपादन]

श्रीरामवरदायिनी देवीचे मूळ स्थान हे डोंगरात होते, तसेच हे गाव सुद्धा डोंगरात होते, साधारण शंभर वर्षांपूर्वी पावसाळ्यात ढगफुटीने किंवा अतिवृष्टीने डोंगरात पूर आला आणि सर्व गाव डोंगरातून खाली नदीकाठी स्थलांतरित झाले. तेव्हा देवीचे स्थान पण खाली आणण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला. पण देवीला खाली स्थान नव्हते. तेव्हा खाली असलेल्या श्रीनवशेरीदेवी, श्रीमानारादेवी आणि श्रीझोलाईदेवी यांपैकी श्रीझोलाईदेवीने आपले स्थान ’श्रीरामवरदायिनी’ला दिले, आणि डोंगरातील देवी ही खाली स्थानापन्न झाली. येथील श्रीनवशेरीदेवी तसेच श्रीमानारादेवी यांच्या मूर्ती चतुर्भुज आहेत, देवींची वाहने बहुधा अश्व किवा वाघ असावीत. पण मूर्तींची बऱ्यापैकी झीज झाल्याने, त्या कोणत्या वाहनावर स्वार झालेल्या आहेत हे नीटसे कळत नाही.

श्रीरामवरदायिनीचे स्तोत्र

[संपादन]

देखिली तुळजा माता । निवालो अंतरी सुखे ॥ तुटली सर्वही चिंता । थोर आधार वाटला ॥ १ ॥

आघात संकटे वारी । निवारी दुष्ट दुर्जन ॥ संकटी भरवसा मोठा । तत्काळ काम होतसे ॥ २ ॥

सर्वही बालके जिची । त्रैलोक्य जननी पहा ॥ साक्षिणी सर्व लोभाळू । मर्यादा कोण रे करी ॥ ३ ॥

सर्वांची मूळ हे माया । मूळमाया म्हणोनिया ॥ सृष्टीची आदिशक्ती हे । आदिशक्ती म्हणोनिया ॥ ४ ॥

राम उपासना आहे । हे रामवरदायिनी ॥ सख्य ते चालते सर्वे । प्रवृत्ती-निवृत्तीकडे ॥ ५ ॥

शक्तीने मिळती राज्ये । युक्तिने टिकतीसयें ॥ शक्तीयुक्ति आम्हा देणे । श्रीरामवरदायिनी ॥ ६ ॥


जत्रा आणि उत्सव

[संपादन]

या पंचक्रोशीत एप्रिल महिन्यामध्ये प्रत्येक देवस्थानच्या जत्रा भरत असतात, त्या जत्रेची सुरुवात या देवीच्या जत्रेपासून होते. पहिली यात्रा ही चैत्र महिन्यात पौर्णिमेला, हनुमान जयंतीच्या दिवशी होते. त्यानंतर सर्व देवस्थानच्या जत्रा एक एक करून होतात. श्रीरामवरदायिनी देवी नवसाला पावते, अशी येथील प्रत्येक भाविकाची श्रद्धा आहे.. पंचक्रोशीतील भक्तमंडळी आपल्या प्रापंचिक दुःखाबद्दल, आधिभौतिक, दैविक कृत्यांची गाहाणी देवीसमोर कौल रूपाने मांडून त्याचा उलगडा करून घेतात आणि त्या प्रमाणे आपले आचरण ठेवतात. ह्या देवीच्या दर्शनाला वर्षभर भाविक येत असतात. देवीचा सोहळा पहायला भक्त हे नियमितपणे वार्षिक जत्रेला आणि होळीला आवर्जून येतात, आणि देवीचे तसेच तिच्या पालखीचे दर्शन घेतात. चोरवणे गावातील माहेरवाशिणी देवीची ओटी भरायला जत्रेला किंवा होळीला येतातच. देवीची पालखी गावातील आपल्या मानकऱ्याबरोबर आणि पारंपरिक स्थानांवरून निघते.

जीर्णोद्धार

[संपादन]

सध्या चोरवणे गावातील ह्या ’श्रीरामवरदायिनी’ देवीच्या देवळाच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या दोन वर्षांपासून चालू आहे. सर्व भक्तांचा देवीचे भव्य पाषाणी मंदिर बांधायचा प्रयास चालू आहे. त्यासाठी लागणारे पाषाण आणि त्यावर काम करणारे कारागीर हे कोल्हापुरातून आलेले आहेत. कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आहे तसे ’श्रीरामवरदायिनी देवीचे’ संपूर्ण पाषाणी मंदिर बांधायचे असे प्रत्येक भक्ताचे मनोरथ आहे. प्रस्तावित मंदिराची प्रतिकृती ही मंदिरात ठेवलेली आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ ’वासोटा’ किल्ला अतिशय निबिड आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे, त्याला ’व्याघ्रगड’ सुद्धा म्हणायचे, त्याची प्रचिती गिरिविहार करताना अजून येते. गेल्या काही वर्षात तेथे बिबट्यांचा वावर पहायला मिळाला. आजही कित्येक दुर्गप्रेमी, गिरीविहारप्रेमी ह्या किल्ल्याला भेट देतात, ह्याचा दुसरा भाग, बामणोळी-मेटइंदवली हा सातारा जिल्हातील ’शिवसागर’ ह्या कोयना नदीवरील धरणाच्या अतिविशाल जलाशयाच्या खोऱ्यात येतो. हा सर्व परिसर ’कृष्णा व्याघ्र प्रकल्प’ म्हणून वनक्षेत्रातील संरक्षित भाग आहे. त्या भागातून जाण्यासाठी वनखात्याची विशेष परवानगी, सातारा कार्यालयातून घ्यावी लागते.
  2. ^ ’वीरगळ’ म्हणजे ’युद्धशिळा’.हिच्यावर लढाईचे विविध प्रसंग कोरलेले असतात. वीर कधी एकाचवेळी दोन तर कधी अनेकांशी लढतो, त्यांच्या हातात विविध आयुधे असतात. इस्लामी आक्रमकांशी अथवा युद्धात संघर्ष करताना जे वीर धारातीर्थी पडले, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ’वीरगळ’ ठेवलेले आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सापडतात. हे ऐतिहासिक पराक्रमाची स्मारके किंवा पुरावे आहेत.