शैला लोहिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. शैला द्वारकादास लोहिया -माहेरच्या शैला शंकरराव परांजपे. (जन्म : धुळे,इ.स.१९४०; मृत्यू : अंबाजोगाई २४ जुलै२०१३). या मूळच्या धुळ्याच्या. आईचे नाव शकुंतला शंकर परांजपे. शैलाबाईंच्या आईवडिलांनी ध्येयवाद आणि सामाजिक चळवळीसाठी खूप खस्ता खाल्या. मूळ शेतकरी कामकरी पक्षात असलेले शंकरराव नंतर समाजवादी पक्षात गेले. उत्तम वाचन, अभ्यासपूर्ण युक्तिवाद, सामाजिक भान ठेऊन राजकारणाचे गणित ओळखणे व ते इतरांना समाजावून देणे या गोष्टी शैलाबाई वडिलांकडून शिकल्या, तर आईकडून त्यांना अपार श्रमाचा वारसा मिळाला. त्यांचे लग्न १९६२साली डॉ. द्वारकादास लोहिया यांच्याशी झाले. त्यांच्या अंबाजोगाई येथील घराचे नावच ’किनारा’ होते. डॉ.शैला लोहिया यांचे लोकभाषा अहिराणीवर प्रभुत्व होते.

लग्नानंतर डॉ. शैला लोहिया आपल्या डॉक्टर पतीबरोबर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईयेथे आल्या. ग्रामीण भागातच आणि तोही खासगी नव्हे तर सार्वजनिक वैद्यकीय व्यवसाय करावयाचा हा द्वारकादासांचा आग्रह होता. त्यांना अनुसरून, डॉ. शैला द्वारकादास लोहिया यांनी अंबाजोगाई ही आयुष्यभर आपली कर्मभूमी मानली. लग्नानंतर, शैला लोहिया अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात इ.स. १९७०पासून मराठीचे अध्यापन करू लागल्या. जमीन आणि स्त्री यांच्या नातेसंबंधावर बरेच लेखन केल्यावर, त्यांना 'भूमी आणि स्त्री’ या वेगळ्याच विषयावर प्रबंधलेखन करून पीएच.डी मिळाली. वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या.

चौथ्या बीजिंग आंतरराष्ट्रीय महिला परिषदेसह पाच विदेशी महिला परिषदांमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपले प्रबंध सादर केले होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक मूल्यांचा आग्रह धरला.

शैला लोहिया यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी १९६३ व १९७५ दरम्यान काम केले. याच काळात भुलाबाईची गाणी, भोंडल्याची गाणी आणि लोकसाहित्यातील अनेक रचनांचा संग्रह शैलाबाईंनी केला. त्यांनी १९७३च्या सुमारास अंबाजोगाईत ५० मुलामुलींचा एक सांस्कृतिक गट स्थापन केला, आणि राष्ट्र सेवा दलाच्या त्या पथकाचे मनोरंजक आणि बोधप्रद कार्यक्रम शैलाबाईंनी गावोगावी सादर केले. कार्यक्रमात एक वगनाट्य आणि त्यानंतर प्रबोधनपर रचना सादर केल्या जात. लोकरंजनातून लोकशिक्षण ही संकल्पना त्यांनी बीड, लातूर आदी भागात राबवली.

डॉ. शैला लोहिया यांचे समाजकार्य[संपादन]

 • 'भारत जोडो’ या चळवळीत सहभाग (१९८४-८५)
 • आंतरराजीय विवाहांना सक्रिय पाठिंबा आणि त्यासाठी आवश्यक तितकी समजावणी
 • कौटुंबिक ताणतणावांत समुपदेशन करण्याचे कार्य
 • घरातच कार्यालय असलेल्या ’मानवलोक’ संस्थेची उभारणी (इ.स.१९८२)
 • 'मनस्विनी’ आणि ’धडपड’ याही संस्था उभारल्या.(इ.स.१९८४). 'मनस्विनी’तर्फे गृहपदार्थांची निर्मिती आणि 'धडपड’तर्फे पापड
 बनविण्याचा व्यवसाय अंबाजोगाईच्या स्त्रिया आजही व्यवस्थित सांभाळत आहेत.
 • 'युक्रांद-संघर्ष वाहिनी’, 'राष्ट्र सेवा दल’, 'दलित युवक आघाडी’ या सर्वच संस्थांमध्ये सहभाग
 • १९६७मध्ये 'अभाविप’च्या विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या युवक काँग्रेसच्या टग्यांविरुद्ध काढलेला मोर्चा.
 • डॉ.लोहिया यांच्याकडे १२ अनाथ मुलांचे पालकत्व होते.

डॉ शैला लोहिया यांची ग्रंथरचना[संपादन]

कादंबऱ्या[संपादन]

 • 'इत्ता इत्ता पाणी'
 • 'जगावेगळा संस्कार'
 • ‘शोध अकराव्या दिशेचा’ (२०१३)
 • 'बाबाचा प्रासाद'
 • 'सात रंग सात सूर' (किशोर कादंबरी)(परिमल प्रकाशन, औरंगाबाद)
 • 'सुखाची वाट'
 • 'होईन मी स्वयंसिद्धा' (बाल-कादंबरी)

कथासंग्रह[संपादन]

 • 'आपलं आभाळ पेलताना' (१९९७) (कथासंग्रह)
 • 'कथाली' (कथासंग्रह)
 • 'मनतरंग' (कथासंग्रह)
 • 'तिच्या डायरीतील पाने' (२०१०)

कविता संग्रह[संपादन]

 • ‘कविता गजाआडच्या’

अन्य ललित वाङ्मय[संपादन]

 • गजाआडच्या कविता (भारतावर इंदिरा गांधीयांनी लादलेल्या आणीबाणीनंतरचा काव्यसंग्रह)
 • जगावेगळा संसार (१९८२)
 • देशपरदेश प्रवास वर्णन
 • रुणझुणत्या पाखरा
 • वाहत्या वाऱ्यासंगे
 • स्वरान्त (अक्षर प्रकाशन, औरंगाबाद, प्रथमावृत्ती -१९८१)
 • हादगा-भोंडला, विधी आणि गाणी

संशोधन / समीक्षा ग्रंथ[संपादन]

 • ‘भूमी आणि स्त्री’ (२०००)

स्फुट लेखन[संपादन]

 • स्थानिक ते मुंबई-पुण्यापर्यंतच्या वृत्तपत्रांतून कसदार स्फुट लेखन, वगैरे.

पुरस्कार[संपादन]

 • डॉ. शैला लोहिया यांना किमान १२ राज्य आणि राष्ट्र पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत.
 • एक राष्ट्रीय पुरस्कार 'जगावेगळा संसार’ या पुस्तकाला १९८२साली मिळाला आहे.
 • २०१० साली त्यांना अखिल भारतीय मारवाडी युवा मंचाचा साहित्य पुरस्कार मिळाला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.