Jump to content

शेळीच्या भारतातील जाती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शेळी हा महत्त्वाचा पाळीव प्राणी आहे. भारतामध्ये विविध भागात मोठ्या प्रमाणात शेळीपालन केले जाते.

भारतातील बहुसंख्य शेळ्या संमिश्र जातींच्या आहेत. तथापि सर्वसाधारणपणे भारतात सुस्पष्ट अशा १३ प्रादेशिक जाती अस्तित्वात आहेत. हिमालयाच्या आसपासचा डोंगराळ भाग, भारताचा उत्तरेकडील भाग, मध्य भाग, दक्षिणेकडील भाग व पूर्वेकडील भाग असे पाच विभाग त्यांच्या वर्णनासाठी कल्पिले आहेत.[]

भारताच्या उत्तर आणि वायव्य भागात शेळीपालन

[संपादन]

हिमालयाच्या आसपासच्या भागात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशाचा काही भाग येतो. लोकरीसारख्या मऊ केसांसाठी येथील शेळ्या प्रसिद्घ असून त्यांचे केस बहुतांशी पांढऱ्या रंगाचे असतात. चंबा, गद्दी व काश्मीरी या स्थानिक नावांनी त्या ओळखल्या जातात आणि त्या हिमाचल प्रदेशातील कांगा, कुलू खोरे, चंबा, सिरमूर व सिमला आणि जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागांमध्ये आढळतात. काश्मीरी जातीच्या काही शेळ्या पश्म देणाऱ्या (पश्मिना) आहेत व त्या चणीने लहान, पांढऱ्या रंगाच्या आहेत. पश्म म्हणजे या शेळ्यांच्या अंगालगतची मऊ  लव असून या शेळ्या पश्मिना म्हणूनच जगप्रसिद्घ आहेत. या हिमालयातील ३ किमी. उंचीवरील प्रदेशांत, तिबेटच्या पठारावरील भागात तसेच  गिलगिट, लडाख व लाहोल आणि स्पिती खोऱ्यांमध्ये मोठया संख्येने आढळतात. श्रीनगर येथील पश्मापासून हातांनी विणलेल्या शाली प्रसिद्घ झाल्यामुळे या अतितलम धाग्याला इंग्रजीमध्ये काश्मेरे म्हणून संबोधतात. तिबेटमधील निर्वासित भारतामध्ये येण्यापूर्वी लडाखमध्ये या जातीच्या ५०,००० शेळ्या होत्या व त्यानंतर त्यांची संख्या १ लाख ८० हजारांवर गेली आहे. लडाखमधील चॅनथाँग भागामध्ये ३.६ ते ४.२ किमी. उंचीवरील प्रदेशांत या शेळ्यांचे कळप आढळतात. एका शेळीपासून २०० ते ३०० गॅम पश्म दर वर्षी मिळू शकते. केसांमध्ये ही अतितलम लव मिसळलेली असते व ती कष्टाने वेचून वेगळी करावी लागते. चेगू नावाची आणखी एक पश्म देणाऱ्या शेळ्यांची जात याकसर, स्पिती व काश्मीर या भागांतील हिमालयाच्या उंच पर्वतांच्या रांगांमध्ये आढळते.

भारताच्या वायव्य भागातील कोरडे हवामान असलेल्या प्रदेशामध्ये (पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशाचा काही भाग या ठिकाणी) जमनापारी, बीटल व बारबारी या महत्त्वाच्या जाती आहेत. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील भागात आणि यमुना व चंबळ या नदयांदरम्यानच्या भागात आढळणारी जमनापारी जात दुग्धोत्पादनासाठी प्रसिद्घ असली, तरी मांसोत्पादनातही सरस आहे. या जातीच्या शेळ्या थोराड, उंच (नर सरासरीने १२७ सेंमी. व मादी १०२ सेंमी.), लांबसडक पाय, बहिर्वक चेहरा, गरूडनाक, सुरळीसारखे लोंबते कान असे त्यांचे थोडक्यात वर्णन आहे. सामान्यपणे त्यांचा रंग पांढरा असून चेहरा व मान यांवरचा रंग तपकिरी असतो. कधीकधी यांच्या अंगावर तांबूस किंवा काळ्या रंगाचे मोठे डाग असतात पुठ्ठ्यावर व फऱ्यांवर लांब व दाट चमकदार केस असतात. एका दुग्धकालात (२५० दिवस) त्या ३.५% वसा असलेले ३६०४५० लि. दूध देतात. बोकड व शेळी यांचे वजन अनुकमे ६५ ते ८६ किग्रॅ. व ४५ ते ६१ किग्रॅ. असते. ब्रिटिश गोट सोसायटीच्या वार्षिकाप्रमाणे (१९४०) सेडगेमेर चॅन्सेलर व बुचेस्ट कॉस या आयात केलेल्या दोन जमनापारी (१८९६ व १९०४) बोकडांचा अँग्लो-न्यूबियन जात निर्माण करण्यात बराच सहभाग होता.

पंजाब

[संपादन]

जमनापारीसारख्या दिसणाऱ्या परंतु चणीने लहान असलेल्या बीटल जातीच्या शेळ्या पंजाबमध्ये आढळतात. नरांना बहुधा दाढी असते. या जातीच्या शेळ्यांच्या पांढऱ्या रंगावर तांबड्या किंवा तांबूस रंगाचे मोठे ठिपके असतात. सरासरीने त्या रोज १.८ लि. दूध देतात. एका दुग्धकालात (१८० दिवस) या जातीच्या शेळीने जास्तीत जास्त ५९० लि. दूध दिल्याची नोंद आहे. शेळीचे सरासरी वजन ४५ ते ५० किग्रॅ. व बोकडाचे ५६ ते ८० किग्रॅ. असते.

बारबारी ही  पूर्व  आफिकेतील  सोमाली  प्रजासत्ताक  राज्यामधील बरबोआ येथील मूळची जात आहे. या शेळ्या चणीने लहान असून त्यांच्या अंगावरील केस आखूड असतात. उभी शिंगे व सामान्यत: पांढऱ्या, पांढऱ्या रंगावर तांबडे किंवा तांबूस रंगाचे ठिपके असलेल्या या शेळ्या दिहल्ली, आग्रा, अलिगढ, मथुरा व हरयाणा राज्यातील गुरगाव, कर्नाल व पानिपत या भागांमध्ये सर्रास आढळतात. यांच्या दुधामध्ये  ५ टक्क्यांपर्यंत वसा असू शकते व त्या रोज १ ते १ ५ लि. दूध देतात. शेळीचे सरासरी वजन २५ ते ३० किग्रॅ. व बोकडाचे ३५ ते ४५ किग्रॅ. असते. या शेळ्यांना चरण्याला न सोडता दावणीला बांधून ठेवले तरी चालते, यामुळे शहरी वस्तीमध्ये त्या पाळता येण्यायोग्य असतात.

मध्य भारत

[संपादन]

मध्य भारतामध्ये राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेशाच्या काही भागांत आढळणाऱ्या मारवाडी, मेहसाण व झेलवाडी या शेळ्या जमनापारी व स्थानिक डोंगराळ भागातील शेळ्या यांच्या संकराने तयार झालेल्या  जाती आहेत. या चणीने लहान असून विविध रंगी असतात व रोज त्या पाऊण ते एक लिटर दूध देतात. जोधपूर येथे स्थापन झालेल्या सेंट्रल एरीडझोन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्राणी अध्ययन विभागाने वाळवंटी प्रदेशा-तील शेळ्यांचा सखोल अभ्यास हाती घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्याची क्षमता इतर कुठल्याही जनावरांपेक्षा शेळीत सरस असल्याचे दिसून आले आहे आणि म्हणूनच १९५० नंतरच्या २५ वर्षांत राजस्थानात शेळ्यांच्या संख्येमध्ये १६० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. नागूर जिल्ह्याच्या परबटसर तालुक्याच्या आसपासच्या ५० किमी.च्या परिसरात असलेल्या शेळ्या दुधाच्या बाबतीत मारवाडी या माहित असलेल्या जातीपेक्षा सरस असल्याचे आढळून आले आहे. या जातीला परबटसर असेच नाव देण्यात आले आहे. या भागातील शेळ्यांना आठवडयातून दोनदा पिण्याचे पाणी मिळाले तरी त्यांच्या वजनामध्ये घट होत नाही तसेच त्यांची प्रजननक्षमताही नेहमीप्रमाणे राहते. बेरारी व काठियावाडी या आणखी दोन जातींच्या शेळ्या या भागात आढळतात. महाराष्ट्राच्या नागपूर व वर्धा जिल्ह्यांमध्ये बेरारी शेळ्या आढळतात. या उंच असून रंगाने काळ्या आहेत व त्या रोज अर्धा लिटर दूध देतात. काठियावाडी शेळ्याही काळ्या रंगाच्या असून त्या कच्छ, गुजरातचा उत्तरेकडील भाग व राजस्थानमध्ये आढळतात. या शेळ्या रोज १ ते १.२५ लि. दूध देतात.

दक्षिण भारत

[संपादन]

दक्षिण भारतामध्ये मध्य व दक्षिण महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, आंध प्रदेश, तमिळनाडू व केरळ या भागांत सुरती, दख्खनी, उस्मानाबादी व मलबारी या शेळ्यांच्या जाती आढळून येतात. अरबस्तानातील लहान चणीच्या दुधाळ शेळ्यांपासून सुरती शेळ्यांची उत्पत्ती झाली  असावी. मुंबईच्या आसपासच्या भागात, नासिक व सुरत या भागांमध्ये आढळणाऱ्या या शेळ्या बेरारी शेळ्यांसारख्या दिसतात. त्यांचे पाय आखूड व पांढरे असतात. या शेळ्या दुग्धोत्पादन करणाऱ्या असून त्या रोज २.२५ लि. दूध देतात. मलबारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व केरळ राज्याच्या उत्तरेकडील भागात आढळणाऱ्या शेळ्या सुरती  शेळ्यांपासून उत्पन्न झाल्या असाव्यात. त्यांचा ठराविक असा रंग असत नाही व दिवसाला त्या १ ते २.८ लि. दूध देतात. दख्खनी व उस्मानाबादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेळ्या सपाटीवर आढळणाऱ्या अनेक जातींच्या संकराने उत्पन्न झाल्या असाव्यात. पांढऱ्या काळ्या, पांढऱ्या तांबड्या अशा रंगांच्या या शेळ्या चांगल्या दूध देणाऱ्या असून  त्या दिवसाला २.२५ लि. दूध देतात.

पूर्व भारत

[संपादन]

भारताच्या पूर्व भागामध्ये (यात बंगाल, आसाम, त्रिपुरा, ओरिसा व बिहार राज्याचा काही भाग यांचा समावेश आहे) बंगाली शेळी म्हणून ओळखली जाणारी एकच जात प्रामुख्याने आढळते. या शेळ्या काळ्या, पांढऱ्या व तपकिरी रंगांच्या असून मुख्यत्वे मांसोत्पादन व कातडी यांसाठी पाळल्या जातात. यांची कातडी ‘ बेंगॉल गोटस्किन ’ म्हणून प्रसिद्घ आहे व त्यांना पादत्राणे बनविण्यासाठी परदेशातूनही मागणी आहे. नरांचे वजन १४ ते १६ किग्रॅ. तर माद्यांचे ९ ते १४ किग्रॅ. असते. काळ्या रंगाच्या बंगाली शेळ्यांमध्ये (ब्लॅक बेंगॉल) जुळी व तिळी जन्मण्याचे प्रमाण बरेच आहे. आसामच्या डोंगराळ भागातील शेळ्यांचे कांग्रा व कुलू खोऱ्यांतील शेळ्यांशी साम्य आहे, तरी आसाम हिल ब्रीड (गोट) ही स्वतंत्र जात आहे असे मानतात.

हिमालयाच्या आसपासच्या भागात जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तर प्रदेशाचा काही भाग येथे चंबा, गद्दी व काश्मीरी, पश्मिना, चेगू,

पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेशाचा काही भाग या ठिकाणी जमनापारी, बीटल व बारबारी या जाती आहेत.

जमनापारी

[संपादन]

जमनापारी ही देशातील सर्वात उंच शेळीची जात आहे.

उगमस्थान :- आग्रा, इटावा, मथुरा उत्तर प्रदेश या प्रदेशात मूळ स्थान आहे

वैशिष्टे

या शेळीचे शिंगे 8 ते 9 सेंटीमीटर लांब असतात

नर व मादी दोघांमध्ये शिंगे आढळून येतात

शेळयांचे कान चपटे , लांब व लोंबकळणारे असतात

रंग मुख्यता पांढरा असून डोक्यावर व मानेवर तपकिरी रांगाचे ठिपके असतात .

या शेळीची कास मोठी व सड लांब असतात

प्रौढ नराचे वजन 44 किलो तर मादीचे वजन 38 किलो पर्यंत असते

एक करडू जन्मन्याचे प्रमाण 69 टक्के असते

जुळ्याचे प्रमाण 27.5 टक्के असते

तीलयाचे प्रमाण 3.5 टक्के असते

या शेळीचे एका वेतातील दूध 200 लिटर पर्यंत असते

बीटल

[संपादन]

मूळस्थान

पंजाब मधील गुरुदास हे आहे

ही शेळी दुधासाठी चांगली मानली जाते

या शेळ्या आकाराने मोठ्या असतात

रंग काळा असून अंगावर पांढरे ठिपके असतात

कान आत वलेलेल असून लांब व लोंबकळणारे असतात

मादीचे वजन - 40 ते 50 किलो

नराचे वजन - 50 ते 80 किलो



मध्य भारतात राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेशाच्या काही भागांत मारवाडी, मेहसाण, झेलवाडी, बेरारी व काठियावाडीया शेळ्याच्या जाती आहेत.



महाराष्ट्र, गुजरात, आंध प्रदेश, तमिळनाडू व केरळ या भागांत सुरती, दख्खनी, उस्मानाबादी व मलबारी या शेळ्यांच्या जाती आढळून येतात.

बंगाल, आसाम, त्रिपुरा, ओरिसा व बिहार राज्यात बंगाली शेळी म्हणून ओळखली जाणारी एकच जात प्रामुख्याने आढळते. आसाम मध्ये आसाम हिल ब्रीड (गोट) ही स्वतंत्र जात आहे असे मानतात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "शेळी". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-07-04. 2022-01-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-05 रोजी पाहिले.