शेर
शेर ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
नांग्या शेर (यूफोर्बिया तिरूकाली) : [शेर, निवळ, नेवाळी शेर, कांडया शेर हिं. सेहुंद, कोनपाल, सैंड क. मोंडुकळ्ळी गु. परदेशी शेर (थोर) सं. त्रिकंटक, वजद्रूम, गंदेरी इं. मिल्क बुश, इंडियन ट्री स्पर्ज लॅ. यूफोर्बिया तिरूकाली कुल-यूफोर्बिएसी]. फुलझाडांपैकी [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग ]. हा सु. ६ मी. उंचीचा, बिनकाटेरी, लहान वृक्ष असून त्याचे मूलस्थान आफ्रिका आहे. भारतात बहुतेक सर्वत्र व इतरत्र रूक्ष प्रदेशात तो आढळतो. नांग्या शेर कुंपण म्हणून लावतात. याच्या प्रजातीत सु. २,००० जाती असून भारतात त्यांपैकी सु. ६० जाती आढळतात.
या शेराची साल भुरी किंवा हिरवट रंगाची व भेगाळ असून फांद्या पसरट कांड्यासारख्या हिरव्या व बहुधा पर्णहीन असल्यामुळे यास ‘ कांड्या शेर ’ (नांग्या शेर) हे नाव पडले असावे. सर्वच भाग गुळगुळीत असून त्यात पांढरा ⇨ चीक असतो. याला प्रथम लहान, अरूंद व लांबट पाने येतात परंतु लवकरच ती गळून पडतात. फुले एकलिंगी व अपूर्ण असतात. ऑगस्ट-सप्टेंबरात लहान फांद्यांमध्ये पेल्यासारखे (चषकरूप) फुलोरे [→ पुष्पबंध] येतात त्यात स्त्री-पुष्पे अधिक असतात (प्रत्येक नर-पुष्प हे एक केसरदल प्रत्येक स्त्री-पुष्प हे देठावरचे तीन किंजदलांचे मंडल). फुलोरा व फुले यांची संरचना व इतर लक्षणे ⇨ यूफोर्बिएसी अगर एरंड कुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शेराच्या झाडांपासून लाल रंग मिळतो. शेराचा चीक अंगाला लागल्यास कातडी लाल होते व फोड येतात. हा चीक रेचक व कफनाशक असून दातदुखी, कानदुखी, दमा, कावीळ, उपदंश, संधिवात इत्यादींवर उपयुक्त आहे. पोटात घेतल्यास तो दाहक आणि वांतिकारक ठरतो. चामखीळ, संधिवात, तंत्रिका शूल व दातदुखी यांवर बाहेरून तिळाच्या तेलातून हा चीक लावतात. कोवळ्या फांद्या व मुळे यांचा काढा जठरशूलावर गुणकारी ठरतो. ही वनस्पती मत्स्यविष असून उंदीर-घुशींनाही ती विषारी असते. बिहारमध्ये आंब्याच्या लहान रोपट्यांना प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण देण्याकरिता ती वापरतात. लाकूड हलके, कठीण व बळकट असते. ते किडीपासून सुरक्षित असून तराफे, खेळणी व कोळसा करण्यास वापरतात. कोळसा बंदुकीच्या दारूस उपयुक्त असतो. फांद्यांचे फाटे लावून नवीन लागवड करतात.
यूफोर्बिएसी कुलातील या वनस्पतीचे नांग्या शेर (Euphorbia tirucalli) व विलायती शेर (Euphorbia tithymaloides) असे दोन प्रकार आहेत.