Jump to content

विठ्ठल बाळकृष्ण गांधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्ही.बी. गांधी या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. व्ही.बी. गांधी, पूर्ण नाव विठ्ठल बाळकृष्ण गांधी, हे भारतातील एक मराठी अर्थतज्ज्ञ आणि उद्योजक होते. राहणारे मूळचे रत्‍नागिरीचे. वडील तिथलेच एक भाजीविक्रेते आणि खूप मोठ्या कुटुंबाला पोसणारे. लहानग्या विठ्ठलाला शिक्षणाची आवड दिसल्यामुळे वडिलांनी काही सग्यासोयऱ्यांबरोबर त्याला १९०० साली मुंबईला पाठविले. काही दानशूर मंडळींच्या मदतीने व्ही.बी. गांधी विल्सन कॉलेजमधून पदवीधर झाले. नंतर एक शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेत गेले. तेथे न्यू यॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास्टरची पदवी मिळविली. कोलंबिया विद्यापीठातील अर्थशास्त्री एडविन सेलिगमन यांचे ते आवडते विद्यार्थी होते.

अमेरिकेत शिक्षणाच्या खर्चासाठी व्ही.बी. गांधींनी हॉटेलांमधून कपबशा विसळल्या, एका भारतीय उपाहारगृहात वेटरचे काम केले आणि प्रसंगी वाहनांमध्ये कोळसा भरण्याचे कामही केले. कॉलेजच्या वेळांव्यतिरिक्त ते एरवी, एका इमारतीमध्ये लिफ्टमनचे काम करीत. अमेरिकेत असतानाच त्यांनी लाला लाजपत राय यांनी चालू केलेल्या ’यंग इंडिया’च्या संपादनाचे काम केले. अमेरिकेतील आयुष्य जगताना ते थोड्या बाबतीत ’पाश्चिमात्य’ झाले. डॉ. व्ही.बी. गांधी तिथेच पाईप ओढायला शिकले.

अमेरिकेत स्त्रियांना मिळणारी बरोबरीची वागणूक पाहून व्ही.बी. गांधी फार प्रभावित झाले. पुढे भारतात येऊन एका डॉक्टर मुलीशी लग्न झाल्यावर त्यांनी आपल्या पत्‍नीला संसारात समान दर्जा दिला. स्त्रिया पुरुष करीत असलेले कोणतेही काम करू शकतात, फक्त पाईप ओढू शकत नाहीत’ असे गांधी यांनी एके ठिकाणी लिहिले आहे. १९२४मध्ये मुंबईत परतल्यावर व्ही.बी. गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली. मोर्च्यांमध्ये दाखल होणे, पत्रके वाटणे, कामगारांच्या हक्कासाठी झगडणे, वर्तमानपत्रांतून लेख लिहिणे, आणि हे सर्व करीत असताना आपल्या रत्‍नागिरी येथील गरीब आणि मोठ्या कुटुंबाला पोसणे ह्या सर्व गोष्टी गांधी करीत असत.

पुढे व्ही.बी. गांधी यांनी भारत-अमेरिकेदरम्यान मालाच्या आयात निर्यातीचा व्यवसाय सुरू केला. पुरेसे पैसे जमा झाल्यावर त्यांनी USV लिमिटेड नावाची औषधिनिर्माण कंपनी काढली. आजही (२०१३ साली) ती कंपनी चालू आहे. भारताला आर्थिकदृष्ट्या आणि औद्योगिकदृष्ट्या समर्थ करणे यासाठी त्यांचा सदैव प्रयत्‍न होता. ते आधी मुंबई नगरपालिकेचे नगरसेवक झाले. १९४४साली मुंबईच्या गोदीत झालेल्या झालेल्या भीषण स्फोटात १३७६ लोक मृत्युमुखी पडले. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत करण्यासाठी त्यांनी आपत्ती साहाय्यक समिती बनविली, आणि गरजूंना मदत मिळवून देण्याचे कार्य केले. पुढे ते काँग्रेस पक्षातर्फे निवडून येऊन संसदेत गेले. भारताच्या पहिल्या आणि तिसऱ्या लोकसभेत व्ही.बी. गांधी खासदार होते.

लोकसभेत चर्चांमध्ये सतत सक्रिय भाग घेत असल्याने व्ही.बी. गांधी सभेत नेहमीच उठून दिसत. १९५०साली ते संसदेच्या लोक लेखा समितीचे (PAC - Public Accounts Committeeचे) सदस्य झाले. भारताच्या राजकारणात, अर्थकारणात आणि समाजकारणात डॉ. व्ही.बी. गांधी यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.

चरित्र

[संपादन]

डॉ. व्ही.बी. गांधी यांची अमेरिकेत स्थायिक झालेली नात लीना गांधी तिवारी हिने त्यांचे ’Beyond Pipe & Dreams' या नावाचे चरित्र लिहिले आहे. मुंबईतील म्युझियमच्या मागच्या बाजूला असणाऱ्या फोर्बस स्ट्रीटला आता डॉ. व्ही.बी. गांधी रोड असे नाव देण्यात आले आहे.

गांधी नावाच्या संस्था