Jump to content

वेदविद्याधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेदविद्याधान ही नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वर येथील संस्था आहे. रत्नाकर घैसास गुरुजी हे या संस्थेचे सध्याचे प्रमुख आचार्य आहेत. मानववंशाचे सातत्य कायम राहावे, त्यात उत्तमोत्तम संस्कारगुणांचे निरूपण व्हावे, या दृष्टिकोनातून कॅनडामधील ओटावा विद्यापीठातील संशोधक फ़ेब्रुवारी २०१३पासून त्र्यंबकेश्‍वरच्या या संस्थेत ’ब्राह्मणत्व’ या विषयावर संशोधन करीत आहेत. ब्राह्मण ही केवळ एक जात आहे की तो एक विचार आहे, आणि असेल तर त्या विचारामागे नेमकी कोणती सामाजिक आणि वैज्ञानिक अधिष्ठाने आहेत, याचाही अभ्यास यानिमित्ताने सुरू आहे. या अभ्यासात ब्राह्मण समाजाची उत्पत्ती, त्यांची कुळे, देवस्थाने, चालीरीती, परंपरा, संस्कार, नव्या पिढीचा उत्कर्ष अशा प्रत्येक पैलूचा सूक्ष्म धांडोळा घेतला जात आहे.

विविध देशांना आता तंत्रज्ञान व जागतिकीकरणाच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यात वंशसातत्य खंडित होणे, वंशावळींचे कोणतेच संदर्भ नसणे यासारख्या काही गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. भारतासारखा बहुआयामी सांस्कृतिक व सामाजिक परंपरा असणाऱ्या देशामधील ज्ञातींचा अभ्यास कोणत्या प्रकारे केला जातो, त्यांच्या नोंदी कशा ठेवल्या जातात, हे तपासण्याचा हा प्रयत्न आहे. या संशोधनातून जे निष्कर्ष पुढे येतील, ते त्यांच्या देशातील समूहजीवनास लागू केले, तर अनेक पिढ्यांचे दस्तऐवज सांभाळून ठेवण्यास मदत होईल, या उद्देशाने हे संशोधन हाती घेण्यात आले आहे

वेदविद्याधानकडे साडेतीनशेहून अधिक नामावळ्या आहेत. या नामावळींत संबंधित कुटुंबाचा उगम, त्यांचे मूळ आणि त्यांचे पूर्वज यांचे विस्तृत विवेचन आहे. त्यामुळे आपल्या मुळाच्या शोधात असणाऱ्या ब्राह्मणांसह अनेक ज्ञाती व संस्थांना याचा लाभ झाला आहे. ही पद्धत संशोधकांच्या अभ्यासात आदर्श मानली जाते. समाजाची बांधणी होत असताना त्याचे संस्कार आणि आनुवांशिकताही महत्त्वाची असते, असे मानले जाते. या आनुवांशिकतेमधून ज्ञातींचे संस्कार-बीज प्रवाहित होतात. नव्या पिढीच्या संस्कारित बांधणीसाठी ही विज्ञानावर आधारित डोळस दृष्टी महत्त्वाची असते. ही बैठक नेमकी काय आहे, याचाही अभ्यास हे संशोधक करीत आहेत.

कोणत्याही मोठ्या मानवी वा नैसर्गिक आपत्तीत एखादी ज्ञाती संपुष्टात आली तरीही त्याच्या नोंदी राहाव्यात यासाठी या साऱ्या संशोधनाचे दस्तऐवज वेगवेगळ्या देशांतील संबंधित संस्थांकडे ठेवण्यात येणार आहेत. सध्या हे संशोधन संस्कृत भाषेत सुरू असून, पुढील टप्प्यात देशातील विविध ज्ञाती संस्थांचाही अभ्यास करण्यात येणार आहे.

पहा : ब्राह्मण जातिधारकांच्या संस्था