Jump to content

वेडा राघू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेडा राघू

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: एव्हीज
वर्ग: पॅसरीफॉर्मेस

वेडा राघू (इंग्लिश: Little Green Bee-eater) शास्त्रीय नाव :Merops orientalis) हा एक किडे खाणारा पक्षी आहे. उष्ण कटिबंधातील बहुतेक सर्व देशांत याचे वास्तव्य आहे. भारतात हा मोठ्या प्रमाणात दिसतो. तरी देखील पक्षी-निरीक्षकांच्या मते गेल्या काही वर्षात याची संख्या खूपच कमी झाली आहे. हा पक्षी हिरव्या रंगाचा असून शेपटी एका रेषेप्रमाणे असते. संध्याकाळच्या वेळात हे पक्षी मोठ्या थव्याने विजेच्या तारांवर ओळीने बसलेले आढळतात. हा पक्षी तारेवर बसलेला असताना उडून जातो, आणि भक्ष्य पकडून पुन्हा तारेवर येऊन बसतो. परत परत त्याच जागी येत असल्यामुळे त्याला ‘वेडा राघू’ असे नाव पडले आहे.

हा त्याच्या वास्तव्याच्या भागात मोठ्या संख्येने आढळणारा सर्वपरिचित पक्षी आहे.

त्याचे प्रजनन गवताळ भागात होते. आफ्रिका आणि अरेबियामध्ये तो कोरड्या भाग आढळतो, पण अजून पूर्वेला गेल्यावर तो वेगवेगळ्या अधिवासात दिसतो. हा पक्षी साधारण एक मीटर किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या तारांवर / फांद्यावर बसून शिकार करतो. कुंपणाच्या तारा किंवा विजेच्या तारांवर हे पक्षी ओळीने बसलेले आढळतात. या प्रजातीतील इतर पक्षी (बी-इटर) पाण्याजवळ आढळतात, वेडे राघू मात्र पाण्यापासून लांबसुद्धा आढळतात.  

धूली स्नान करताना

सामान्यपणे, हे मैदानी प्रदेशात राहतात, मात्र कधीकधी हिमालयात ५००० किंवा ६००० फूट उंचीवरसुद्धा आढळले आहेत. दक्षिण आशियात ते स्थानिक रहिवासी आहेत, पण काही पक्षी हंगामानुसार स्थलांतर करतात, पण त्यांची नेमकी पद्धत अजून लक्षात आलेली नाही, ते पावसाळ्यात कोरड्या भागात जातात आणि हिवाळ्यात अधिक उबदार भागात स्थलांतर करतात. स्थलांतर करून पाकिस्तानच्या काही भागांत ते उन्हाळ्यात येतात.  

वेडे राघू मुख्यत: मधमाशी, मुंग्या, चतुर असे कीटक हवेत सूर मारून पकडून खातात. भक्ष्य खाण्यापूर्वी ते त्याच्या नंग्या काढतात आणि फांदीवर ते पुन्हा पुन्हा आपटतात. हे पक्षी सकाळी मंद हालचाली करतात आणि अनेकदा तारांवर समूहाने बसलेले दिसतात. ते धूलि-स्नान करतात आणि कधीकधी उडता उडता पाण्यात सूर मारून स्नान करतात. सामान्यपणे ते लहान गटात दिसतात, रात्र थाऱ्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने (२००-३००) आढळतात. हा पक्षी आता शहरी आणि निम-शहरी भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतो  आणि टी.व्ही. अँटेनावर बसलेला दिसतो.

वेड्या राघूचा प्रजननाचा काळ मार्च ते जून महिन्यामध्ये असतो. सामान्यपणे ते एकेकट्याने घरटे बांधतात. हे घरटे वाळू असलेल्या काठावर एक बोगदा करून तयार केलेले असते. त्याने तयार केलेले घरटे ५ फूट लांबीचेसुद्धा असू शकते. बोगद्याच्या टोकाशी थेट मातीवर तीन ते पाच अंडी घातली जातात. ही अंडी अगदी गोल आणि चकचकीत पांढरी असतात. अंड्यांचे प्रमाण पावसाचे मान आणि कीटकाची उपलब्धता यावर अवलंबून असते. नर आणि मादी दोघेही अंडी उबवतात. साधारण १४ दिवसांनी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात.[२]

एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की मानवी निरीक्षकांच्या वर्तनाचा अंदाज वेडे राघू वर्तवू शकतात. एका विशिष्ट ठिकाणी असलेली माणसे आपले घरटे शोधू शकतील का याचा अंदाज करण्याची त्यांची क्षमता असते आणि त्याप्रमाणे ते घरट्याची जागा लपवण्याचा प्रयत्न करतात.[३]

दक्षिण भारतात, नद्यांच्या जवळ खूप मोठ्या संख्येने वेडे राघू आढळतात. (१५७ पक्षी प्रती चौ.किमी.) तर शेती असलेल्या भागात १०१ पक्षी प्रती चौ.किमी. आढळले आहेत आणि मानवी वस्त्यांजवळ ४३-५८ पक्षी आढळले आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ बर्डलाईफ इंटरनॅशनल. "मेरॉप्स ओरिएन्टॅलिस्". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१३-२. ३१-०३-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)
  2. ^ "वेडा राघू पक्ष्याच्या घरट्याचा अभ्यास" (PDF).
  3. ^ Watve, Milind; Thakar, Juilee; Kale, Abhijit; Puntambekar, Shweta; Shaikh, Imran; Vaze, Kaustubh; Jog, Maithili; Paranjape, Sharayu (2002-12-01). "Bee-eaters (Merops orientalis) respond to what a predator can see". Animal Cognition (इंग्रजी भाषेत). 5 (4): 253–259. doi:10.1007/s10071-002-0155-6. ISSN 1435-9448.