वेंकटेश बापूजी केतकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वेंकटेश बापूजी केतकर (जन्म : १८ जानेवारी इ.स.१८५४; - ३ ऑगस्ट इ.स. १९३०) हे भारतातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिषाचार्य होते.

पूर्वोक्त परंपरा[संपादन]

वेंकटेश यांच्या वडिलांचे नाव रामकृष्ण ऊर्फ बापूशास्त्री केतकर असे होते. तॆ स्वतः ज्योतिःशास्त्रज्ञ होते. मात्र त्यांनी ज्योतिर्विज्ञानाचा अभ्यास कोणापाशी केला यांची नोंद नाही. त्याकाळातील आणि त्या अगोदरच्या काळातील पाश्चात्त्य पंडितांनी गणिताच्या आणि ज्योतिर्गणिताच्या नवनवीन शाखा शोधून त्यांत नवे शोध लावल्यामुळे या शास्त्राचा अधिक विकास झाला होता. अर्थातच त्यामुळे ग्रंथलाघवासारख्या भारतीय ग्रंथांवरून आलेल्या ग्रह-ताऱ्यांच्या भ्रमण, ग्रहण आदी गोष्टींच्या वॆळांचा पाश्चात्त्याच्या ग्रंथांनुसार येणाऱ्या वेळांशी मेळ बसत नसे. हे पाहून बापूशास्त्री केतकर यांनी ज्योतिःशास्त्रसुबोधिनी नावाच्या एका नव्या ग्रंथाची रचना केली.[१] इ.स. १८६० मध्ये प्रा. केरूनाना छत्रे यांनी ग्रहसाधना नावाचा ज्योतिर्गणितासंबंधीचा एक उत्तम ग्रंथ मराठीत रचला. संशोधनाच्या कार्यात ह्या ग्रंथांची उपयुक्तता जाणून रामदुर्गकर संस्थानिकांच्या विनंतीवरून बापूशास्त्री यांनी त्याचे संस्कृत भाषेत रूपांतर केले होते. बापूशास्त्री इ.स. १८४१ पर्यंत पैठण येथे होते, त्यानंतर ते रुद्रवीणा या वाद्यात पारंगतता मिळविण्यासाठी तंजावरला निघाले. पण नरगुंदपर्यंत पोहोचल्यावर तेथे त्यांना रुद्रवीणानिष्णात रा. वेंकाबुवा म्हैसकरांसारखे गुरू लाभल्याने तेथेच त्यांनी वास्तव्य केले. नरगुंद येथेच पौष शुद्ध चतुर्दशी शके १७७५ ( १८जानेवारी इ.स.१८५४) रोजी वेंकटेश यांचा जन्म झाला. [२]

शिक्षण[संपादन]

इ.स. १८७० साली वेंकटेश हे बेळगांवातील सरदार हायस्कूल येथे इंग्रजी शिक्षण घेत होते. त्यासुमारास त्यांच्या वडलांचे निधन झाले. त्यानंतर दारिद्ऱ्याशी झगडत वेंकटेश यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. इ.स. १८७४ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होणाऱ्यांत त्यांचा तिसरा क्रमांक होता. त्यांना बाई माणिकबाई बैरामजी जीजीभाय पारितोषिक मिळाले.[३]गरिबीमुळे त्यांना त्यापुढील उच्च शिक्षण घेता आले नाही.

नोकरी[संपादन]

इ.स.१८७५ साली वेंकटेश शाळाखात्यात नोकरीला लागले. इ.स.१९११ साली ते ३६ वर्षांची सरकारी नोकरी बजावून फर्स्ट असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर या पदावरून निवृत्त झाले.[४]

ज्योतिषाध्ययन[संपादन]

इ.स.१८६८ साली झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात पहावयास मिळालेल्या नैसर्गिक गंमतीमुळे तोे प्रसंग वेंकटेश यांच्या मनावर बिंबला गेला. त्यातूनच त्यांच्या मनावर ज्योतिषशास्त्राध्ययनाचे महत्त्व पटले. सुरुवातीला त्यांनी ज्योतिःशास्त्रविषयक अभ्यास त्यांचे वडील बापूशास्त्री यांनी रचलेल्या ग्रंथांवरूनच सुरू केला, मात्र सूर्यसिद्धान्तादी प्राचीन व अर्वाचीन ज्योतिषग्रंथांचे आकलन त्यांना वडील बंधू बाळशास्त्री केतकर यांच्याकडून झाले. बाळशास्त्री केतकर हे स्वतः ज्योतिषशास्त्र शिकण्याकरिता पुण्यात केरूनाना छत्रे यांच्याकडे एक वर्षभर होते. बाळशास्त्र्यांकडून मिळालेले हे ज्ञान वेंकटेश यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणखी वाढविले.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ समा- ज्योतिषाचार्य वेंकटेश बापूजी केतकर, केतकर, द.वें, प्रका- द.वें केतकर,आ-१ली, १९३४, पान-२
  2. ^ समा- ज्योतिषाचार्य वेंकटेश बापूजी केतकर, केतकर, द.वें, प्रका- द.वें केतकर,आ-१ली, १९३४, पान-६
  3. ^ a b समा- ज्योतिषाचार्य वेंकटेश बापूजी केतकर, केतकर, द.वें, प्रका- द.वें केतकर,आ-१ली, १९३४, पान-९
  4. ^ समा- ज्योतिषाचार्य वेंकटेश बापूजी केतकर, केतकर, द.वें, प्रका- द.वें केतकर,आ-१ली, १९३४, पान-१०