वृत्तपत्रांचे अनमोल योगदान
व्रुत्तपत्र हे जनजागृतीचे एक प्रभावी साधन असल्याचे सुशिक्षित भारतीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जनतेवरील अन्यायास वाचा फोडण्यासाठी व राजकीय असंतोष प्रकट करण्यासाठी हे माध्यम निवडले. प्रारंभी भारतातील वृत्तपत्रे इंग्र्जी लोकांनी सुरू केली होती. ही वृत्तपत्रे प्रमुखाने शासनाच्या धोरणाची तरफदारी करीत असत . इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये झालेली चर्चा व घेतलेले निर्णय याविषयीच ही वृत्तपत्रे माहिती देत. ब्रिटिश प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची तरफदारी करणे हेच जणू या वृत्तपत्राचे कार्य होते . त्यामुळे राष्ट्रवाद, उदारमतवाद यासारख्या तत्त्वाचा भारतात प्रसार करण्यासाठी आपणच वृत्तपत्रे सुरू केली पाहिजेत , हे येथील उच्चविद्याविभूषित सुशिक्षित तरुणांच्या लक्षात आले. हिंदी विचारवंतानी सुरू केलेल्या वृत्तपत्रामधून शासनाच्या अयोग्य धोरणावर कोरडे ओढणे व आपल्या बांधवाना जागृत करणे , समाजात राष्ट्रवादाचा प्रसार करणे शक्य होऊ लागले . प्रारंभीच्या काळात इंग्रजी भाषेतून भारतीयांनी सुरू केलेल्या ' दि इंडियन मिरर ',' बॉम्बे समाचार' ,' दि हिदू' , व 'ट्रिब्युन ' यासारख्या वृत्तपत्रांनी लोकजाग्र्तीचे महत्त्वपूर्ण कार्य केले. पुढील काळात राजा राममोहन राॅय यांनी ' संवाद - कौमुदी ', देवेन्द्र्नाथानी ' तत्त्वबोधिनी - पत्रिका ', अरविंदबाबू यांनी ' वंदेमातरम् ', सुरेंद्रनाथानी ' बंगाली ' , व लोकमान्य टिळकांनी ' केसरी' ही वृत्तपत्रे सुरू करून मातृभाषेच्या माध्यमातून नवविचारांचा व राष्ट्रवादी विचारसरणीचा समाजात प्रचार-प्रसार सुरू केला. ब्रिटिश शासनाच्या दोषावर प्रखर टीका करन्याबरोबरच समाजात आत्मविश्वास वाढविण्याचे व सामाजिक समता , उदारमतवाद , मानवता , स्वातंत्र्य यासारख्या विचारांचे बीजारोपण करण्याचे कार्य या वृत्तपत्रांनी केले .