Jump to content

विष्णुदास नामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विष्णूदासनामा (सोळावे शतक) (एकनाथकालीन शके १५०२ (इ.स.१५८०) ते शके १५५१ (इ.स. १६२९) हे एक मराठी संत होते. त्यांनी महाभारताचे मराठी भाषेत पहिले भाषांतर केले. मराठी काव्याला त्यामुळे कलाटणी मिळाली. विष्णूदासनामा पंढरपूरचे होते असे मानले जातो. त्यांचे काव्य गोव्याच्या परंपरांमध्येही लोकप्रिय आहे. संत नामदेव व विष्णूदास नामा अगदी निराळे होते पण पुष्कळांनीं ते एकच समजून बऱ्याच चुका केल्या आहेत. विष्णूदासांचे कांहीं अभंग नामदेवांच्या गाथेत गैरसमजुतीमुळे पडले आहेत. उदा. शुकाख्यान. या आख्यानाच्या शेवटच्या (३७०-७१) ओव्यांमध्ये कवीचें नांव व काव्यसंपूर्णतेचा काल दिला आहे. मन्मथनामसंवत्सर पौष्यमासीं । सोमवार अमावास्येच्या दिवशी । पूर्णता आली ग्रंथासी. मन्मथनामसंवत्सराची पौष अमावस्या सोमवारीं शके १५१७ मध्यें पडते.[] विष्णूदासांचा उल्लेख महिपतीनें मुक्तेश्वराबरोबर केला आहे. यांच्या ओव्या फार गोड व रसाळ आहेत. यांच्या महाभारताची ओवीसंख्या १८-२० हजार असावी.

विष्णूदासनामा यांनी लिहिलेल्या प्राकृत महाभारताच्या अठरा पर्वांची ओवीसंख्या सुमारे २०,००० आहे. महाभारताखेरीज विष्णूदासनामा यांनी लिहिलेली अन्य स्फुट आख्याने :

  • अनंतव्रतकथा
  • उपमन्यूचे चरित्र
  • एकादशी माहात्म्य
  • कथाभारती
  • कृष्णकथा
  • गरुडाख्यान
  • चक्रव्यूहकथा
  • तुलसी आख्यान
  • नलोपाख्यान
  • नामदेवाची आदि
  • बुधबावणी
  • मुळकासुरवध
  • म्हाळसेनकथा
  • लवकुशाख्यान
  • शुकाख्यान
  • संतावळी आख्यान (कमळाकर ब्राह्मणांची कथा)
  • स्वर्गारोहणपर्व
  • हरिश्चंद्रपुराणकथा

याशिवाय विष्णूदासनामा यांचे पुढील ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात आहेत :

  • अंगदशिष्टाई
  • अभंग
  • कपोताल्ह्यान
  • कामाईची आरती
  • चंद्रहास आख्यान
  • द्रौपदीस्वयंवर
  • सीतास्वयंवर, वगैरे.

येई ओ विठ्ठले ह्या घराघरात म्हटल्या जाणाऱ्या आरतीची रचना ह्यांनीच केली. पूर्ण आरती अशी :-

येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर, निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे, पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ येई० ॥ १ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ येई० ॥ २ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णूदास नामा, विष्णूदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ येई हो० ॥ ३ ॥

संदर्भ

[संपादन]