"दिनकर नीलकंठ देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: दिनकर देशपांडे किंवा दिनकरराव देशपांडे (जन्म: १७ जुलै १९३३; मृत्य... |
(काही फरक नाही)
|
२३:३२, ३१ मार्च २०१२ ची आवृत्ती
दिनकर देशपांडे किंवा दिनकरराव देशपांडे (जन्म: १७ जुलै १९३३; मृत्यू १८ मार्च २०११) हे एक मराठीतले पत्रकार आणि साहित्यिक होते. त्यांचे शालेय शिक्षण जबलपूर येथून, आणि माध्यमिक शिक्षण वर्ध्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले होते. शालेय जीवनात ते उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून नावाजले गेले होते. त्यांनी तेथे एक सुवर्णपदकही मिळाले होते. शिक्षण संपल्यावर ते काही दिवस मुलताई नावाच्या गावात ग्रामसेवक म्हणून नोकरीला होते. नोकरीवर असतानाच त्यांना लिहिण्याचा छंद लागला. त्यांच्यातील कलंदरपणा आणि बालरंगभूमीचा जबरदस्त ओढा त्यांना त्या नोकरीत रममाण होऊ देणारा नव्हता. दिनकरराव १९५१मध्ये नागपुरात परत आले. विदर्भातले नाटककार मो.दा.देशमुख यांच्याकडून त्यांनी बालनाट्याचे धडे घेतले आणि पत्रकारितेबरोबरच बालवाङ्मयनिर्मितीत त्यांनी स्वत:ला गुंतवून घेतले. मराठी बालरंगभूमी, बालसाहित्य, पत्रकारिता, लेखन, दिग्दर्शन अशा अनेकविध क्षेत्रांत ठसा उमटविलेले विविधरंगी व्यक्तिमत्त्व म्हणून दिनकर देशपांडे यांचे नाव घेतले जाते.
दिनकर देशपांडे यांनी नागपूरला अशोक प्रकाशन व उद्यम प्रकाशन या संस्थांत काही दिवस नोकरी केली आणि नंतर, नागपूर पत्रिका, लोकमत आणि दैनिक महाराष्ट्र या वृत्तपत्रांसाठी पत्रकारिता केली. दिनकर देशपांडे विदर्भातील साहित्य आणि वृत्तपत्र क्षेत्रातील एक रसिक व्यक्तिमत्त्व होते. दिनकर‘राव’ जेवढे रसिक तेवढेच कलंदर. साहित्य असो की पत्रकारिता, एका कलंदर वृत्तीनेच त्यांनी शेवटपर्यंत वाटचाल केली. स्वत:च स्वत:च्या नावाच्या शेवटी ‘राव’ हा शब्द जाणीवपूर्वक लावायचा, तो तेवढ्याच जाणीवपूर्वक खास वैदर्भी ठसक्यात उच्चारायचा हे दिनकर‘रावां’चे खास वैशिष्ट्य होते. त्यातून त्यांचा वऱ्हाडी मोकळा ढंग आणि उमदा खेळकर स्वभावही दिसायचा. मिष्किली हा त्यांचा स्वभाव होता. तो त्यांच्या वृत्तपत्रीय लिखाणातून, सदरांतूनही उतरला. अर्थात, त्याचा वापर कुणाला दुखावण्यासाठी त्यांनी कधी केला नाही. त्यांची बालनाट्यावर अविचल निष्ठा होती. त्यामुळेच ते शंभराहून अधिक बालनाट्ये लिहू शकले. नाटकाच्या आवडीपोटी त्यांनी नागपूरला अभिनयाची नाट्यशाळा चालवली होती. त्यांची बहुसंख्य बालनाट्ये सुधा करमरकर यांच्या लिटिल थिएटर (बालरंगभूमीने) रंगमंचावर सादर केली आणि बालरंगभूमी गाजवली. त्यांनी याशिवाय प्रौढांसाठी विनोदी लेखसंग्रह, कथासंग्रह आणि दोन कादंबऱ्या लिहिल्या आहेत. याशिवाय त्यांनी अन्य बालसाहित्याचीही निर्मिती केली आहे.
बालसाहित्य आणि बालरंगभूमीतील भरीव योगदानाची पावती म्हणूनच दिनकर देशपांडे यांना ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवडण्यात आले होते. बालनाट्य लेखनासाठी राज्य शासनासाठी देण्यात येणारा राम गणेश गडकरी पुरस्कार दोनदा मिळविण्याचा बहुमान मिळवणारे दिनकरराव हे एकमेव बालसाहित्यिक आहेत.