"लक्ष्मण विनायक परळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: लक्ष्मण विनायक परळकर (जन्म : २२ नोव्हेंबर १८७१; मृत्यू : ७ मे १९५५) ह... |
(काही फरक नाही)
|
२३:२६, १८ जानेवारी २०२० ची आवृत्ती
लक्ष्मण विनायक परळकर (जन्म : २२ नोव्हेंबर १८७१; मृत्यू : ७ मे १९५५) हे मराठी लेखक संत वाङमयाचे अभ्यासक, अनुवादक आणि चरित्रकार होते.
मुंबईच्या एल्फिन्स्टन शाळेत माध्यमिक शिक्षण घेतल्यावर ते त्यांच्याच महाविद्यालयातून बी.ए. झाले. पदवी संपादन केल्यावर ते वकिलीची परीक्षा पास झाले. याच सुमारास सन १८९६ च्या सुमारास महाराष्ट्रात आलेल्या प्लेगच्या साथीमुळे ते बंगालमध्ये राहत असलेल्या आपल्या वडिलांकडे गेले. तेथे ते उत्तम बंगाली भाषा शिकले.
त्या काळात ब्राम्हो समाजाच्या व प्रार्थना समाजाच्या विचारांचा पगडा परळकरांवर बसला. विविध ज्ञानविस्तार, किर्लोस्कर, नवपुत्र अशा नियतकालिकांकडून तसेच प्रार्थना समाजाच्या सुबोधपत्रिका या मुखपत्रातून त्यांनी धर्मविषयक लेखन केले. याशिवाय देवेंद्रनाथ टागोरांच्या 'ब्राम्हो धर्म' ह्या ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला. 'प्रार्थना समाजाचा परिचय ' हा ग्रंथ प्रार्थना समाजाच्या प्रेमापोटी त्यांच्या हातून साकारला गेला. त्यांनी बंगाली कवी नवीनचंद्र सेन यांच्या ईश्वर गुणवर्णनात्मक चार कवितांचे गद्य अनुवादही केले.
ल.वि. परळकर यांची संत तुकारामांवर गाढ श्रद्धा होती. 'मराठी संत आणि राज्याची स्थापना' या ग्रंथातून त्यांनी रामदासांपेक्षा संत तुकाराम हे पुरोगामी विचारांचे होते असे मत मांडले. संत तुकारामाचे निवडक अभंग 'अमृतधारा ' या पुस्तकात त्यांनी संग्रहित केले. याशिवाय 'तुकाराम चरित्र' या ग्रंथातून त्यांनी तुकारामाच्या विजिगीषु व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला आहे. 'हिंदुधर्म प्रदीप ' या ग्रंथातून परळकरांनी हिंदू धर्माचे व्यामिश्र रूप, त्याचा विकास, तसेच वेद, उपनिषदे, गीता यांतून व्यक्त झालेल्या तत्त्वज्ञानाची व्यापक अशी विस्तृत मांडणी केली आहे. त्यांच्या अन्य ग्रंथ संपदेत 'महात्मा गांधींची शिकवण', 'परळकरकृतं सारधर्म ,' 'सतीसावित्री ' ही पुस्तके आहेत. 'कथागुच्छ' या मासिकातून व तत्कालीन अन्य वृत्तपत्रांतून त्यांचे बुद्धिनिष्ठ व पुरोगामी धर्मविषयक विचार मांडणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत.