"नानासाहेब गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: गंगाधर विश्वनाथ उर्फ नानासाहेब गोखले (जन्म : कोल्हापूर, २१ डिसेंब... |
(काही फरक नाही)
|
१५:०२, २४ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
गंगाधर विश्वनाथ उर्फ नानासाहेब गोखले (जन्म : कोल्हापूर, २१ डिसेंबर १८८९; मृत्यू : २ ऑक्टोबर १९६०) हे क्रांतिकारक आणि मराठी नाटककार होते.
१९०९ च्या बॉम्ब कट खटल्यात गोखले यांना सक्तमजुरी भोगावी लागली होता. त्यानंतर काही काळ ते टिळकांसोबत होते. याच सुमारास ब्राह्मण - ब्राह्मणेतर वादाला तोंड फुटले तेव्हा 'साप्ताहिक संग्राम' व 'विजय धर्म' अशी दोन वृत्तपत्रे चालवून त्यांनी 'सत्यवादी'करांवर हल्ला चढवला. याशिवाय त्यांनी विविध वृत्तपत्रांतून मार्मिक लिखाण केले. ह्यातले बरेचसे लिखाण त्यांनी कृष्णद्वैपायन, शिवगंगाधर या टोपणनावांनी केले.
नानासाहेब गोखले यांनी पत्रकारितेबरोबरच नाट्यलेखन केले. त्यांनी ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक मिळून २५ नाटके लिहिली. त्यांपैकी काही रंगभूमीवर गाजली. 'संगीत प्राणप्रतिष्ठा' हे स्वराज्याचे तोरण बांधण्याच्या ऐतिहासिक प्रसंगावर, तर संगीत सैरंध्री हे कीचकवधावरील प्रसंगावरचे नाटक त्यांचे गाजले. याशिवाय विद्यार्थी, कॉलेजकुमारी, महारवाडा, बुवाबाजी, बहीणभाऊ, निर्वासित ही सामाजिक विषयांवरील त्यांची नाटकेही लोकप्रिय झाली होती. बालमोहन, अरुणोदय अशा नाटक कंपन्यांही त्यांनी काढल्या. रंगभूमी, नाटके आणि लोकनाट्य हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता.
गोखल्यांच्या नाटकांची संख्या पुष्कळ आहे पण त्यांतील काहीच रंगभूमीवर आली. त्यांचे लिखाण चुरचुरीत आणि आकर्षक होते. त्यांच्या नाटकांमध्ये 'सं. विद्यार्थी' हे सद्वर्तनी विद्यार्थ्यांच्या विरोधावर बेतलेले तर 'कॉलेज कुमारी' हे नाटक फॅशनच्या आहारी गेलेल्या तरुणीच्या जीवनशैलीचे चित्रण करणारे नाटक होते. 'नवे राज्य या नाटकातून त्यांनी एका प्राथितयश साहित्यिकाच्या कलेच्या व पुरोगामीपणाच्या नावावर चालणाऱ्या ढोंगी व्यवहाराचे चित्रण रेखाटले आहे. या सामाजिक नाटकांशिवाय त्यांचे 'सैरंध्री' हे पौराणिक नाटक आहे. उत्तर पेशवाईतील शाहीरावरही त्यांचे एक नाटक आहे. नाटकांचे एकूण स्वरूप पारंपरिक आहे. २ ऑक्टोबर १९६० रोजी त्यांचे निधन झाले.
क्रांतिकारक व पत्रकार असून पारंपरिक आणि त्याचवेळी अभिनव नाटके लिहिणारे नानासाहेब गोखले ह्यांच्यासारखी व्यक्ती एकूण दुर्मीळच.