"यमुनाबाई वाईकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यमुनाबाई वाईकर (जन्म: ३१ डिसेंबर १९१५) या महाराष्ट्रातील सुप्रसि...
(काही फरक नाही)

१५:०२, ३१ मे २०१३ ची आवृत्ती

यमुनाबाई वाईकर (जन्म: ३१ डिसेंबर १९१५) या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणी गायिका आहेत. त्यांना लावणीसम्राज्ञी म्हणून ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव यमुना विक्रम जावळे. त्या रहात असलेली वाईची ही कोल्हाटी समाजाची वस्ती म्हणजे एक लोककलेचे माहेरच होते. यमुना, तारा, हिरा या तीन बहिणी. आईचे नाव गीताबाई. त्याही गायच्या. यमुनाबाई दहा वर्षाच्या असतानाच आपल्या दोन लहान बहिणींना घेऊन गावोगाव तमाशाच्या फडाबरोबर हिंडू लागल्या. रंगू-गंगू सातारकर यांच्याकडे त्यांना तमाशातले गाणे आणि अभिनयाची अदाकारी याचे धडे मिळत राहिले.

पुणे, मुंबई, नाशिक, बार्शी, सोलापूर, पंढरपूर, नागपूर ते थेट बेळगाव आणि कोकण असा सारा उभा-आडवा महाराष्ट्र यमुनाबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालथा घातला आहे. त्यांच्या या तमाशाफडात दडलेले नाट्य आणि संगीत गावोगावच्या रसिकांना अनुभवायला मिळाले आहे. कासू-वारू आणि यमुना-हिरा-तारा-वाईकर असे एकेकाळचे गाजलेले फड होते.

अभिनय हा अंगभूत गुण असल्याने लोकनाट्यातून यमुनाबाई नाटकांकडे वळल्या. त्यांनी ‘भावबंधन’, ’मानापमान’ आदी संगीत नाटके सादर केली. त्यांची ‘संशय कल्लोळ’ नाटकातली भूमिका नाट्यवेड्या रसिकांच्या खास पसंतीस उतरली होती. त्यांनी ‘धर्मवीर संभाजी’, ‘मोहित्यांची मंजुळा’ आणि ‘महाराची पोर’ या अन्य नाटकांमध्ये भूमिका केल्या. ’महाराची पोर’ नाटक बघावयास साने गुरुजी आले होते. या प्रयोगाचे सर्व उत्पन्न यमुनाबाईंनी गुरुजींच्या समाजकार्याला दिले.

गावागावांतून पोटासाठी कलाप्रदर्शन करणाऱ्या आपल्या कोल्हाटी समाजाला स्थैर्य यायला हवे याची जाणीव यमुनाबाईंना सतत सतावत राहिली. वाईच्या मध्यभागातली आणि कृष्णातीरावरची पाले उठली पाहिजेत, आपल्या समाजबांधवांना भिंतींचे घर हवे असे विचार मनात येत राहिले. आणि यमुनाबाई वाईकरांनी समाजासाठी हौसिंग सोसायटी निर्माण केली. पोटासाठी भीक मागणाऱ्या आणि रस्तो-रस्ती-गल्ली-बोळांत गाण्यांची तान मारत हिंडत राहिलेल्या आपल्या भगिनींना यमुनाबाईंनी घरे दिली.

पुरस्कार

  • यमुनाबाईंना मध्य प्रदेश शासनाचा राष्ट्रीय देवी अहिल्या सम्मान हा इ.स. १९९९-२००० सालचा पुरस्कार मिळाला.(एक लाख रुपये रोख + प्रशस्तीपत्र वगैरे)
  • यमुनाबाईंना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार २०१२ साली मिळाला.
  • लोककलेसाठी आयुष्य वेचणाऱ्या... प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एकेकाळी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या... पैशांपेक्षा कलेला अधिक महत्त्व देणाऱ्या... प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या; पण सध्या दुर्लक्षित असलेल्या वीसहून अधिक कलावंताचा सत्कार, ’पवळा-पठ्ठे बापूराव संगीत लोककला आणि साहित्य अकादमी यांच्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या राज्यमंत्री फौजिया खान यांच्या हस्ते, १५ मे २०१२ रोजी, करण्यात आला. त्या समारंभामध्ये पद्मश्री पुरस्कारविजेत्या लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यावेळी अनेक ज्येष्ठ कलावंतांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी देण्यात आला.
  • संगीत नाट्य अकादमीचा रवींद्रनाथ टागोर पुरस्कार
  • संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' २०१२ सालचा लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला गेला. (नोव्हेंबर २०१२). (पुरस्काराचे स्वरूप : दोन लाख रुपये रोख + मानपत्र + शाल +श्रीफळ)


चरित्र

यमुनाबाई वाईकर यांचे प्रभाकर ओव्हळ यांनी लिहिलेले चरित्र, ’(लावणीसम्राज्ञी) यमुनाबाई वाईकर’ या नावाने कोल्हापूरच्या ’पारस’ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.