Jump to content

"मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रात सुरुवातीला ग्रंथालये स्थापन झाली, तेव्हा ग्रंथाल...
(काही फरक नाही)

००:२१, १५ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्रात सुरुवातीला ग्रंथालये स्थापन झाली, तेव्हा ग्रंथालयांतील बहुतांशी पुस्तके इंग्रजी असत. त्यामुळे मराठीला प्रोत्साहन मिळावे, आणि त्या भाषेतील ग्रंथांचा सार्वजनिक उपयोग व्हावा म्हणून, ठाणे शहरातील नागरिकांनी महाराष्ट्र सारस्वतकार विनायक लक्ष्मण भावे आणि विष्णू भास्कर पटवर्धन यांच्या पुढाकाराने या मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना १ जून १८९३ रोजी केली.

ग्रंथसंग्रह

सुरुवातीला वि.ल.भावे यांनी जमा केलेले जुन्या मराठी कवींचे काव्यसंग्रह आणि इतर ग्रंथ संस्थेला देऊन ठाण्यातील हे मराठी ग्रंथसंग्रहालय चालू केले. आजमितीला(इ.स.२०१२) येथली ग्रंथ संख्या १,२९,५२६ इतकी आहे. संदर्भ ग्रंथांची संख्या ४,७३४ आणि अतिदुर्मीळ ग्रंथ १,७१० आहेत. संस्थेच्या नौपाडा शाखेत २६,९३१ ग्रंथ आहेत. सर्व संदर्भ ग्रंथ इ.स. १९०० सालापूर्वीचे आहेत. अतिदुर्मीळ ग्रंथ हिंदुस्थानात प्रेस ॲक्ट लागू करण्यापूर्वीचे, म्हणजे इ.स.१८६७ पूर्वीचे आहेत. संस्थेने ४२ दुर्मीळ पुस्तकांचे लॅमिनेशन केले आहे. ठाण्याच्या या ग्रंथसंग्रहालयाकडे जुन्या नियतकालिकांचाही संग्रह आहे. संस्थेच्या साधारण सभासदांची संख्या १,७१० व आजीव सभासदांची १,२४२ आहे. संस्थेचे एकूण १०२ आश्रयदाते आहेत. संस्थेच्या संदर्भ शाखेचा वापर जनतेसाठी खुला आणि नि:शुल्क आहे. ग्रंथालयाच्या वाचनालयाची गणना महाराष्ट्र राज्यातल्या जिल्हा अ-वर्ग मुक्तद्वार सार्वजनिक वाचनालयांत होते.

सांस्कृतिक आणि संघटनात्मक कार्य

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयात दरवर्षी किमान १५ ते २० व्याख्याने आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होतात. शिवाय दरवर्षी होणाऱ्या वार्षिकोत्सवातली भाषणे म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच असते. या मराठी ग्रंथसंग्रहालयाने इ.स. १९६८मध्ये जिल्ह्यातील ग्रंथालयांचा संघ स्थापन करून, संघातील अन्य संग्रहालयांनीही सांस्कृतिक कार्यक्रम करावेत, यासाठी त्यांना होईल तितकी मदत ही संस्था करते. हा ग्रंथालय संघ १९७४ सालापासून अव्याहत ग्रंथपालन वर्ग आयोजित करत आला आहे. संस्थेतर्फे १२ सप्टेंबर हा वि.ल.भावे यांचा स्मृतिदिन, दरवर्षी सन्मानपूर्वक पाळला जातो.

ठाण्याच्या या मराठी ग्रंथसंग्रहालयाने जिल्ह्यातील ग्रंथालयांचे पहिले अधिवेशन १९४४मध्ये भरवले होते. इ.स.१९६० आणि २०१० साली ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रायोजकत्व ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे होते.

संस्थेचा पत्ता

मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे,
सरस्वती मंदिर, सुभाष पथ, स्टेशन रोड,
जिल्हा परिषदेसमोर,
ठाणे (पश्चिम), ४००६०१.

ईमेल पत्ता : info@mgst.in
संकेतस्थळ : www.mgst.in