विठ्ठल नागेश शिरोडकर,

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विठ्ठल नागेश शिरोडकर (जन्म : २७ एप्रिल, १८९९; मृत्यू : इ.स. १९७१) हे जागतिक कीर्तीचे भारतीय स्त्रीरोगतज्ज्ञ व शल्यक्रियाविशारद होते.. त्यांचा जन्म गोव्यातील शिरोडे गावी झाला. त्यांचे सुरुवातीचॆ शिक्षण हुबळी व पुणे येथे झाल्यावर ते पुढे मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम्.बी.बी.एस्. (१९२३) आणि स्त्रीरोगविज्ञान व प्रसूतिविज्ञान या विषयांत एम्.डी. (१९२७) झाले. परदेशी जाऊन त्यांनी एफ्.आर.सी.एस्. (इंग्लंड), एफ्.ए.सी.एस्., एफ्.आर.सी.ओ.जी. व अन्य पदव्याही संपादन केल्या. इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी १९३५–५५ या काळात ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये, व नंतर १९६२–६९ या काळात परदेशात अध्यापन केले.

कुटुंबनियोजनासाठी फॅलोपिअन नलिकेवर म्हणजे अंडवाहिनीवर [अंडाशयातून गर्भाशयापर्यंत अंडे नेणारी नलिका; → अंडवाहिनी] शिरोडकर यांनी केलेल्या विविध शस्त्रक्रिया चित्रफितीद्वारे दाखवून या तंत्राचा परदेशातही प्रसार झाला. नेहमीच्या स्थानावरून खाली घसरणाऱ्या म्हणजे भ्रंश गर्भाशयावरील शस्त्रक्रियेतही त्यांचा हातखंडा होता. कर्करोगावरील त्यांच्या शस्त्रक्रियांची संख्याही लक्षणीय आहे.

काँट्रिब्यूशन टू ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनाकॉलॉजी (१९६०) हा त्यांचा ग्रंथ वैद्यकाच्या अभ्यासकांना उपयुक्त ठरला आहे.

मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या नावे संशोधन संस्था व प्रयोगशाळा उभारून मुंबई व पुणे येथे त्यांची उचित स्मारके उभी करण्यात आली आहेत.