विकिपीडिया:सदर/जानेवारी १९, २००६
सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांत जून ३०, इ.स. १९०५ रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडला. त्या सिद्धांतामध्ये त्यांनी दाखवून दिले की सर आयझॅक न्युटन यांनी सांगितलेल्या गतीच्या नियमांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींची (ज्यामध्ये प्रकाशकिरणांचादेखील समावेश होतो) वागणूक स्पष्ट करता येत नाही आणि विशिष्ट परिस्थितीमध्ये सिद्धांत कोलमडून पडतो. त्या परिस्थितीचे विश्लेषण, स्पष्टीकरण आणि अनुमान आईन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाच्या विशेष सिद्धांतात केले. त्यानंतर काही वर्षांनंतर त्यांनी याच सिद्धांतामध्ये गुरूत्वाकर्षण बलाचा समावेश करून सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धांत सांगितला. त्यामुळे केवळ सापेक्षतावादाचा सिद्धांत असे म्हणणे बरोबर नाही तर सापेक्षतावादाचा सामान्य सिद्धांत किंवा सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांत अधिक योग्य आहे. या दोन्ही सिद्धांतांनुसार विद्युत-चुंबकीय लहरींचा वेग सापेक्ष परिस्थितीमध्ये नेहमी स्थिर असतो आणि निरीक्षकाच्या वेगावर आणि स्थळावर अवलंबून नसतो. थोडक्यात (न्युटनच्या गतीच्या नियमांनुसार) संदर्भाची निरपेक्ष चौकट (Frame of Reference (इंग्रजी आवृत्ती)) ही निरक्षकाकडे न राहता सापेक्षतेच्या सिद्धांतानुसार प्रकाशाचा निर्वात भागातील वेग ती निरपेक्ष चौकट बनला.