Jump to content

विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १/जाहिरातीचे ईमेल १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार!

विकिपीडिया हा मुक्त (= वाचायला, लिहायला, आधी भरलेल्या माहितीत नव्याने भर घालायला/दुरुस्त करायला सर्वांना खुला असलेला आणि मोफत :) ) ज्ञानकोश प्रकल्प आहे. मराठीसह इंग्लिश व जगभरातील २६०+ भाषांमध्ये विकिपीडिया प्रकल्प चालू आहेत. इंग्लिश विकिपीडिया (http://en.wikipedia.org/) हा सध्याच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मोठा व आशयसंपन्न ज्ञानकोश असून त्यात ३५ लाखांहून अधिक लेख उपलब्ध आहेत. मराठी विकिपीडिया तुलनेने अशक्त :) आणि बाल्यावस्थेत असून त्यात सध्या ३२,०००+ लेख आहेत. मराठी विकिपीडियावर तुम्ही खाली नोंदवलेल्या कोणत्याही मार्गाने सहभाग घेऊन जमेल तसा हातभार लावू शकता :

  • उपलब्ध लेखांमधील माहितीत अधिक भर घालणे/ माहिती अद्ययावत करणे
  • नवीन लेख बनवणे
  • लेखांमधील संपादनाच्या चुका दुरुस्त करणे व लेखांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने यथायोग्य बदल करणे.
  • लेखांमध्ये सचित्र स्पष्टीकरणे देण्यासाठी विकिमीडिया कॉमन्स (http://commons.wikimedia.org) या सामायिक रिपॉझिटरीतून विषयानुरूप चित्रे/फोटो लेखात जडवणे
  • मराठी विकिपीडियाबाबत आपल्या मित्रमंडळींना, कुटुंबियांना माहिती देऊन प्रकल्पाची खबरबात अन्य मराठीजनांपर्यंत पोचवणे.
  • ब्लॉग पोस्टी, ऑर्कुट/फेसबुक अश्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवरील किंवा मराठी भाषेतील मायबोली, मनोगत, मिसळपाव, उपक्रम इत्यादी सार्वजनिक फोरम संकेतस्थळांवरील गप्पांमध्ये, ऑनलाइन चर्चा/वाद-विवाद, ईमेल इत्यादी माध्यमांतून मराठी विकिपीडियावरील माहितीचे/लेखांचे संदर्भ, दाखले नोंदवत मराठी विकिपीडियाची उपयुक्तता अप्रत्यक्षपणे इतरांसमोर मांडणे.

अर्थात हे सर्व तुम्ही तुमच्या सवडीनुसार, आवडीनुसार आणि अगदी खारीचा वाटा उचलत केलेत, तरी हरकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आठवड्याभरात वृत्तपत्रांत वाचलेल्या माहितीवरून रविवारी १५ मिनिटांत संबंधित लेखांमध्ये भर घातली/नवीन लेख बनवले, तरीही हरकत नाही - या सार्वजनिक प्रकल्पात तुमचा कोणत्याही प्रकारचा सहभाग स्वागतार्हच आहे. फक्त दोन-तीन पथ्ये तेवढी पाळावीत :

  • मराठी विकिपीडिया हा ज्ञानकोश (एन्सायक्लोपीडिया) प्रकल्प असल्यामुळे व्यक्तिगत अनुभवकथन/ टीकाटिप्पणी/ प्रवासवर्णन किंवा वृत्तांतपर ललित ढंगाने माहिती न मांडता त्रयस्थ वाचकांना डोळ्यांसमोर ठेवून लिहावी.
  • हा प्रकल्प मराठी भाषेत असल्यामुळे प्रमाण मराठी भाषेत व देवनागरी लिपीतच मजकूर लिहिणे अपेक्षित आहे.
  • हा प्रकल्प मुक्त असल्यामुळे कुणाचाही सहभाग विनामूल्यच धरला जातो (पगार/मानधन मिळत नाही :). मात्र या ज्ञानकोशाचा वापर सर्वांना मोफत करता येतो, हा पैशातील मूल्यापेक्षाही मौल्यवान असणारा मोबदला जरूर मिळतो.

मराठी विकिपीडियाबद्दल ही झाली नमनाची माहिती. आता सुरुवात नेमकी कशी करावी, याबद्दल माहिती जाणून घ्यायला खालील दुवे चाळून बघा :

आणखी काही मदत लागल्यास, व्यक्तिशः मला ईमेल करू शकता किंवा 'विकिपीडिया:चावडी' (http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:चावडी) येथे आम्हां मराठी विकिपीडियनांना भेट देऊ शकता.

क.लो.अ.,
--- आपले नाव लिहावे ---