Jump to content

विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई/संदर्भ हवे असलेले लेख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मनोहर आंबानगरी[संपादन]

"नगरीच्या मधोमध गगनचुंबी लंबोदराचं देवालय, सकलेश्वर, अमलेश्वर, केदारेश्वर, माणकेश्वर यासारख्या देखण्या उत्तुंग मंदिरावर डोलणाऱ्या मणीघंटीका व ध्वज , तोरणे, विशाल वृक्षांत नटलेली नगरी... जिच्या सभोवताली विविध संपन्न जनपद वसलेली आहेत! नगरी अशी की, ती अनेक भवनाने बहरलेली आहे...." अंबाजोगाई शहरातील चौबारा गणेश मंदिरातल्या शिलालेखावरील हे वर्णन आहे. तर नगरीच्या विशालतेच स्वरूप सकलेश्वर मंदिराच्या शिलालेखातून येते.

अंबाजोगाईच्या रचना काळाबद्दल निश्चित सांगता येत नाही. पण पुराणकालात देवीचा अवतार झाला तेव्हा देखील हे शहर अस्तित्वात असल्याचा उल्लेख योगेश्वरी महात्म्यात आला आहे. योगेश्वरी देवीच्या अवतार काळापूर्वी देखील निराळे नाव असले तरी येथे लोकवस्ती होती असे म्हणण्यास हरकत नाही. कारण अंबाजोगाई शहराचे नाव प्राचीन काळापासून एकच एक असे राहिलेले नाही.

'योगेश्वरी महात्म्य' या पौराणिक ग्रंथात अंबाजोगाई शहरास चार युगातील चार वेगवेगळी नावे दिली आहेत. प्रत्यक्षात मात्र ठीकठिकाणी 'जयंती नगर' किंवा ' जयंतीका ' या नावाचा उल्लेख दिसतो. ' जयंती ' नदीच्या काठावर असल्यामुळे शहरास ही नावे असावीत. त्याचप्रमाणे चौबारा शिलालेखात शहराचा उल्लेख ' आम्रपुर ' तर सकलेश्वर मंदिराच्या शिलालेखात ' आम्रदेश ' असा उल्लेख आढळतो. क्वचित ठिकाणी अंबाजोगाई चा उल्लेख ' अंबाक्षेत्र ' असा आढळतो. तर लीळाचरित्रात चक्रधर स्वामींनी खोलेश्वराच्या प्रभुत्वामुळे अंबाजोगाई चा उल्लेख ' खोलनायकाचे अंबे ' असा केला आहे. तसेच 1903 च्या दरम्यान निजामाने या नगरीचे नाव ' मोमिनाबाद ' ठेवले. पुढे महाराष्ट्र राज्य स्थापने सोबतच पूर्ववत 'अंबाजोगाई ' नाव ठेवल्या गेले.

शिवभक्त दंतासूर राक्षसाच्या त्रासाला कंटाळून अनेक साधू ऋषींनी देवीची उपासना केली. देवी सैन्यानिशी दंतासूरास लढण्यासाठी सज्ज झाली. त्यामुळे गुप्तहेरांनी दंतासुरास ही बातमी सांगितले त्यावेळी त्याने प्रश्न केला ' कोण ही अंबा ? ' तोपर्यंत देवी त्याच्यापर्यंत येऊन पोहोचली. घनघोर युद्धात दंतासुराचा पराभव झाला. ज्या ठिकाणी दंतासुराचा वध झाला त्याच्या ' अंबा ' या उच्चारामुळे त्या क्षेत्रास ' अंबाजोगाई ' हे नाव पडले.हा झाला अंबाजोगाईच्या नावाचा इतिहास. या अंबाजोगाई ला मुकुंदराज, दासोपंत यांसारख्या संतांचा तर खोलेश्वर यासारख्या योद्ध्यांचा देखील वारसा आहे.

अंबाजोगाई परिसरात एकूण आठ शिलालेख सापडतात जे अंबाजोगाईच्या प्राचीन मध्ययुगीन व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतात.

अंबाजोगाई आरंभीच्या काळापासून आजतागायत एक महत्वाचे शिक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. कारण मराठी काव्याची पहिली ओळ मुकुंदराजांनी लिहिली ती याच नगरीत. दासोपंतांनी पाच ओळी लिहिली ती याच नगरी दासोपंतांनी पासोडी वर नवीन काव्यप्रकार निर्माण करून एक प्रकारे काव्यलेखन शैलीत क्रांतीच केली. मध्ययुगापासूनच धार्मिक वातावरणामुळे ही नगरी भारावली आहे या धार्मिकतेला साहित्य आणि कलेचा स्पर्शाने संस्कारित केल्याने हे शहर शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र बनणे अपरिहार्य होते.

आज या शहरात नावाजलेल्या शिक्षणसंस्था, शाळा आहेत त्याचप्रमाणे सांस्कृतिक वैचारिक सामाजिक जाणिवेचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे उत्तम प्रशासकीय व्यवस्था या सर्वांमुळे अंबाजोगाईला वेगळा दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळेच इतिहासाने प्रेरित झालेले हे शहर प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.

योगेश्वरी मंदिर[संपादन]

' योगेश्वरी माता ' हे एक अंबाजोगाईचे भूषण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिच्या दर्शनासाठी यात्रेकरूंची सारखी रीघ लागलेली असते. योगेश्वरी ही सर्वांचीच देवता असली तरी विशेषतः कोकणस्थ लोकांची कुलस्वामिनी आहे. अंबाजोगाई ला जसे अंबेचे शक्तीपीठ असण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणे योगेश्वरी देवी ला देखील इतर ठिकाणच्या देवी पेक्षा एक खास वैशिष्ट प्राप्त झाले आहे. योगेश्वरी देवीने आपल्या हातात जी निरनिराळी आयुध धारण केली आहेत; त्यात तिने एका हातात ' परडी ' धारण केली आहे. इतर शक्तिपीठाचे ठिकाणी असलेल्या कोणत्याही देवीच्या हातात तिच्या भक्तांनी स्वीकार केलेले हे आयुध दिसून येत नाही. योगेश्वरी देवीचे हे एक वैशिष्ट्य मुद्दाम उल्लेख करण्यासारखे आहे. योगेश्वरी देवीच्या स्थापना काळाबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. तरीपण इतिहास संशोधकांच्या तर्कानुसार सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी मूर्ती स्थापनेच्या काळापासूनच योगेश्वरी देवीची स्थापना झाली असावी. अंबाजोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या जयंती नदीच्या पश्चिम तीरावर योगेश्वरी देवीचे मंदिर पुराण काळापासून अस्तित्वात आले आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी स्वरूपाची आहे. मुख्य मंदिर उत्तराभिमुख असून मुख्य मंदिरास पूर्व पश्चिम उत्तर बाजुने दरवाजे आहेत. पश्चिम दरवाजा सामान्यपणे बंद असतो. मंदिराचे कलात्मक शिल्प फार अप्रतिम आहे. मंदिराच्या उत्तर द्वाराने बाहेर पडताच समोर एक होमकुंड दृष्टीस पडते. उत्सव प्रसंगी येथे हवन होते. मंदिराच्या अग्नेय बाजूस धर्मशाळा आहे. महाद्वाराच्या पश्चिम बाजूस तटबंदीच्या आतल्या बाजूने अनेक प्रशस्त खोल्या बांधल्या असून त्या खोल्यातून ' योगेश्वरी नूतन विद्यालयाचे ' वर्ग चालतात. योगेश्वरी देवी ' आजन्म कुमारिका का राहिली? ' व ' अंबाजोगाईची योगेश्वरी शेकडो मैल दूर असणाऱ्या कोकणस्थांची कुलस्वामिनी कशी? ' या दोन प्रश्नांच्या उत्तरासाठी लोकांमध्ये एक अख्यायिका पसरली आहे. त्याच प्रमाने समर्थनासाठी पुराव्यांची उपलब्धता आहे. ती लोक कथा म्हणजे योगेश्वरी देवीचा विवाह परळी येथील वैद्यनाथ याबरोबर होण्याच्या प्रसंगावर आधारित आहे. योगेश्वरी देवी ' त्रिपुरसुंदरी ' या नावाने देखील ओळखली जाते. असे सांगतात की, या त्रिपुरसुंदरी चे बालपण कोकणात गेले. तेथील लोकांची ती कुलदैवता होती. उपवर झाल्यावर तिचे लग्न परळीच्या वैद्यनाथाशी ठरले. ती लहानपणापासून योगसाधना करीत असल्यामुळे तिला आपल्या स्वतःचे आणि वैद्यनाथाचे पूर्वीचे जन्म आठवत होते. त्यापैकी एका जन्मात ती पार्वती असताना तिचा विवाह महादेवाशी झाला होता. महादेव म्हणजेच ' वैद्यनाथ ' होय. रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर दीनवाणी रामाला फसवण्यासाठी महादेवाशी पैज लावून ती सीतेच्या रूपात रामापाशी गेली. पण रामाने तिला लगेच ओळखले. त्यावेळी राम काकुळतीने म्हणाला, "माते कशाला हे श्रम घेतले?" त्यामुळे पार्वती पैज हरली. पण महादेवाने पार्वतीला सीता रूपात पाहिल्यामुळे तो तिला पत्नी मानत नव्हता. त्यामुळे पार्वतीचा अपमान झाला. त्या अपमानाचा बदला या जन्मी घेण्याचे त्रिपुरसुंदरी ने ठरवले. लग्न मुहूर्त पहाटेचा ठरला. अंबाजोगाई येथील देवीच्या मंदिरापासून वायव्येस तीनशे मीटर अंतरावर असलेली हत्तीखाना लेणी हे लग्न स्थळ ठरले. पण त्रिपुरसुंदरी ने आवरण्यात मुद्दामच वेळ लावला. त्यामुळे लग्न मुहूर्त टळला. त्रिपुरसुंदरी ने बदला घेतला. पण क्रोधीत वैद्यनाथाने लग्न मंडपातील सर्व मंडळींना पाषाणमय होण्याचा शाप दिला. लगेच लग्नमंडपात असलेले महादेवसुद्धा नंदी सकट पाषाण रूप झाले. अशाप्रकारे योगेश्वरीचे कुमारिका असणे व कोकणस्थ भक्त या रहस्यंवरचा पडदा उघडला जातो. योगेश्वरी देवी अंबाजोगाईचे ग्रामदैवत आहे. इथे येणारा प्रत्येक श्रद्धाळू मनुष्य त्यांचे इतर कोणतेही ही कुलदैवत असलेले तरी योगेश्वरी देवीची स्वतःच्या कुलदेवता इतकीच आराधना करतो आणि उत्सव समारंभात सहभागी होतो. योगेश्वरी देवीचे वार्षिक उत्सव अश्विन व मार्गशीर्ष महिन्यात साजरे केले जातात. अश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना होऊन नवरात्रोत्सव आरंभ होतो. शुद्ध पंचमी पासून विजयादशमी पर्यंत दररोज अलंकार पूजा होते. नवमीच्या दिवशी महाभोगी केली जाते. या उत्सवात शहरातील प्रत्येक घटक सहभागी होतो. हे योगेश्वरी मंदिर अनेकांचे श्रद्धास्थान आहे.

आद्यकवी मुकुंदराज[संपादन]

संस्कृत भाषेतील वेदांत शास्त्र सारखे अवघड तत्वज्ञान सामान्य जनतेशी सोप्या मराठी भाषेत सांगणारा ग्रंथ घरात ' आद्यकवी ' पदाचा मान ' मुकुंदराज ' यांना मिळाला आहे. बालाघाट पर्वतरांगेत व शहराच्या वायव्येस दोन मैलांच्या अंतरावर असलेल्या डोंगरातील गुहेत मुकुंदराज यांची समाधी आहे. मुकुंदराज परिसर अत्यंत निसर्गरम्य व रमणीय आहे. अशा या रमणीय ठिकाणी असलेल्या समाधी स्थानाला मंदिराचे स्वरूप आणण्यात आले आहे. डोंगराच्या उतरणीवर एका गुहेत ते समाधिस्थान असल्यामुळे जाण्यासाठी सुमारे शंभर ते सव्वाशे पायऱ्या उतरून जावे लागते. आद्य कवी मुकुंदराज यांचा जन्म शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ रोजी झाला. देवगिरीच्या यादवांच्या राजवटीचा काळ. भिल्लमदेव यादवाने देवगिरीला स्वतंत्र सत्तेचा दर्जा देऊन स्वतः ला राजा घोषित केले. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ' जैत्रपाल ' राजा झाला. जैत्रपाल हा जैन धर्म मताचा प्रचारक होता. अंबानगरी च्या जयंत राजाचा याने पराभव केला. त्याला राज्य भ्रष्ट केले. त्याचप्रमाणे आमिष दाखवून लोकांना पदभ्रष्ट करीत असे. साधूप्रमाणे आपणाला देखील सिद्धी प्राप्त व्हावी अशी जैत्रपाला ची इच्छा होती. साधूंच्या म्हणण्यासाठी त्याने यज्ञ केला. साधूंची सेवा केली पण सिद्धी काही मिळेना. त्यामुळे चिडून त्याने सर्व साधूंना सश्रम कारावास केला. मुकुंदराजांबद्दल समजल्यावर त्याने मुकुंदराज यांना उद्धट निरोप पाठवला. निरोप ऐकून मुकुंदराज राजाकडे गेले व त्याचे गर्वहरण करून त्याला शरण येण्यास भाग पाडले. तेव्हा त्यांनी वेदांत शास्त्राचे सार असलेला ' विवेकसिंधु ' ग्रंथ सांगून राजाला जीवनोपदेश केला. मुकुंदराज यांच्या विवेकसिंधु ग्रंथास मराठी साहित्यात मानाचे स्थान आहे. त्यांनी हा ग्रंथ ११९० साली लिहिला. विवेकसिंधूचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग असून पूर्वार्धात ७७७ तर उत्तरार्धात ८९४ ओव्या आहेत. याशिवाय त्यांनी ' परमामृत, पवनविजय, मूळस्तंभ, पंचीकरण ' सारखे तत्त्वज्ञानावर आधारित ग्रंथ लिहून त्यांनी मराठी भाषेचा पाया घातला. स्वतःच्या बुद्धीच्या क्षमतेने वेदांचे तत्त्वज्ञान सांगणारा पहिला तत्त्ववेत्ता म्हणून मुकुंदराजा यांच्याकडे पाहिले जाते. मुकुंदराज केवळ संस्कृत चे महान विद्वान होते असे नाही तर आपल्या ज्ञानाने वास्तवतेची प्रचिती देण्याची त्यांच्या जवळ नैसर्गिक अद्भुत शक्ती होती. त्यांच्या ' स्थलकाल ' विषयाचा वाद मराठी साहित्यात चांगलाच गाजला. पण ' इतिहासकार तात्यासाहेब कानोले ' यांनी मुकुंदराज यांची अंबाजोगाई म्हणजेच बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हे सिद्ध केले. मराठी भाषेला साहित्याचा दर्जा प्राप्त करून देणाऱ्या मुकुंदराज यांचा मृत्यू इ.स. ११९८ मध्ये झाला. फक्त पहिली मराठी कविता लिहिली म्हणून नव्हे तर वेदांचे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे क्रांतिकारी काम केल्याबद्दल ही मराठी विश्वाच्या अंतापर्यंत मुकुंदराज यांचे नाव राहील.

सर्वज्ञ दासोपंत[संपादन]

मुकुंदराजानंतर जवळपास सव्वा चारशे वर्षानंतर कवितेच्या क्षेत्रात पासोडीद्वारे स्वतंत्र शैली विकसित केली ती महान कवी दासोपंतांनी तीही अंबाजोगाईच्या भूमीत! दासोपंत यांचा जन्म बिदर जिल्ह्यातील नारायण पेठ या गावी वैद्य ८ शके १४७३ सोमवार रोजी देशमुख घराण्यात झाला. आईचे नाव ' पार्वतीबाई ' व वडिलांचे नाव ' दिगंबरपंत ' असे होते. एका वर्षी नारायण पेठ परगण्यात फार मोठा दुष्काळ पडला. त्यावेळी दिगंबरपंत यांनी सरकारी गोदामातील सर्व धान्य लोकांमध्ये वाटून त्यात वाटून दिले. ही वार्ता ऐकताच बादशहाने चिडून दोन लाख रुपये दंड भरणा किंवा दासोपंत यांना ओलीस ठेवण्याची आज्ञा करण्यात आली. त्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदत दिली. ज्या दिवशी दासोपंतांना मुस्लिम करण्यात येणार होते तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने कर्ज फेडले. या प्रसंगानंतर दासोपंतांनी संन्यास स्वीकारला अंबाजोगाईस आले व भट गल्ली चौकात असलेल्या गणपतीच्या मंदिरात मुक्कामासाठी थांबले. त्यावेळी ' सीतोपंत देशपांडे ' यांनी दासोपंतांना गुरु मानले. ती घटना दासोपंतांच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी घडून आली. सितोपंतांनी दासोपंतांच्या योगक्षेमाची सर्व व्यवस्था लावून दिली. सर्व देशपांडे मंडळींनी दासोपंत यांचे शिष्यत्व पत्करले. दासोपंतांचे उर्वरित आयुष्य येथेच व्यतीत झाले. दासोपंतांनी अंबाजोगाईत सुमारे चाळीस वर्षे वास्तव्य केले. ते पंधराव्या शतकातील एक महान कवी, उत्कृष्ट चित्रकार आणि संगीतकार होते. त्यांनी लिहिलेला पासोडी वरून त्यांचे भाषेचे प्रभुत्व त्यांची चित्रकारिता या गोष्टींची ओळख पटते. ही पासोडी चाळीस फूट लांब व चार फूट रुंद आहे. चित्राद्वारे स्पष्टीकरण करण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही पासोडी होय. पासोडी प्रमाणेच त्यांनी गीतार्थ चंद्रिका, गीतार्णव, ग्रंथराज, पदार्णव, गीतार्थबोध, दत्तात्रय महात्म्य हे लिहिलेले ग्रंथ उल्लेखनीय आहेत. दासोपंतांच्या साहित्याचा परिघही अतिशय विशाल व सर्वसमावेशक आहे. त्यात धर्म, राजकारण, आचार, भक्ती, तत्त्वज्ञान, काव्य, कथा, भाषा, व्याकरण इ. चा समावेश झालेला आहे. दासोपंत वयाच्या ६४ व्या वर्षी शके १५३७ माघ वद्य षष्ठी रोजी विलीन झाले. दासोपंतांच्या निर्वाणानंतर त्यांच्या वंशज वाटणी संबंधाने ' थोरले देवघर ' व ' धाकटे देवघर ' ही देवघरे निर्माण झाली आहेत. दरवर्षी मार्गशीर्ष मासि दत्त जयंती उत्सव नऊ दिवस पर्यंत साजरा करण्यात येतो. मार्गशीर्ष शुद्ध सातव्या दिवशी घटस्थापना होऊन उत्सवास प्रारंभ होतो. त्या दिवसापासून काहीना काहीतरी कार्यक्रम येथे सुरू असतात. एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता पालखी निघते. द्वादशी त्रयोदशी च्या दिवशी संध्याकाळी सात वाजता व रात्री बारा वाजता पालखी निघते. चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी यावेळी गुरु पूजा होते. त्या दिवशी पहाटे च्या दुसऱ्या दिवशी पहाटे दत्त जन्माचा कार्यक्रम होतो नंतर ललित होऊन महाप्रसादाने उत्सवाची सांगता होते. दासोपंतांची समाधी त्यांच्या व्यक्तिमत्त्वप्रमाणे शांत व रम्य ठिकाणी आहे. दासोपंतांची समाधी शहराच्या वायव्येला मुकुंदराज मार्गावरील नृसिंह तीर्थ येथे आहे. दासोपंतांचे नाव घेतल्याविना साहित्य पूर्ण होणार नाही.

खोलेश्वर मंदिर[संपादन]

संतांप्रमाणेच शूर योद्धे यामुळेही अंबानगरी मध्ययुगात प्रसिद्ध होती. सिंघणदेव यादवाचा सेनापती खोलेश्वर हा त्यापैकी एक! योगेश्वरी मंदिरानंतर अंबाजोगाई येथील प्रसिद्ध मंदिर म्हणजे खोलेश्वर मंदिर. खोलेश्वर हा मुळात विदर्भातला. त्याने अंबाजोगाईत आपली मुख्य छावणी केली होती. खोलेश्वर शिवभक्त व कलाप्रेमी सेनापति होता. त्याच्या काळात उभारलेल्या मंदीराहून याचा प्रत्यय येतो. अंबाजोगाई च्या परिसरात खोलश्वराने अनेक मंदिरे उभारली. पण खोलेश्वर मंदिर मुळात खोलेश्वरने बांधलेलेच नाही. या मंदिरावर एक शिलालेख आहे. यावरून त्या मंदिराचा कालखंडही समजतो. त्या शिलालेखाचा लेखनकाल शके ११६२ शालिदी संवत्सर कार्तिक शुद्ध १० शनिवार म्हणजे २७ ऑक्टोबर १२४० असा आहे. ' खोलेश्वर यांची मुलगी लक्ष्मीने तिचा भाऊ म्हणजे खोलेश्वर यांचा मुलगा राम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ब्रह्मपुरीत हे मंदिर उभारले ' याची नोंद आहे. हा शिलालेख सुव्यवस्थित असून तो मंदिरात जाताना डाव्या बाजूस आहे. गावाच्या दक्षिणेस जैत्रपालाच्या गढी जवळ पूर्वाभिमुख हे हेमाडपंथी मंदिर ' खोलेश्वर मंदिर ' म्हणून ओळखले जाते. वास्तविक हे ' शिवमंदिर ' आहे. खोलेश्र्वराच्या अंबानगरी वरील प्रभावामुळे त्याचे नाव मंदिरास पडले असावे. खोळेश्र्वर मंदिर चबुतऱ्यावर उभे असून मंदिराचे प्रवेश द्वार म्हणजे सुंदर नक्षीकाम केलेला दगडी मंडप होय. शैलीच्या दृष्टीने हे मंदिर तेराव्या शतकाचे प्रतिनिधित्व करते. पण, आता या मंदिराने आपला बाह्य भागावरील आकर्षकपणा गमावला आहे. जवळपास मंदिर शिल्पाच्या ऱ्हासाचेच प्रकटीकरण खोलेश्वर मंदिरावर झाले आहे. पण खोलेश्वर स्तंभाच्या कलाकुसरी तील बदल प्रशंसनीय आहे. खोलेश्वर मंदिरातही बाह्य भिंतींनी निर्गममनाची आणि भिंती बाहेर काढून तिची आकर्षकता कायम ठेवण्याची परंपरा दिसते. खोलेश्वराचे छत वर्तुळाकार आणि घुमटाकार असून कंकालेश्वर मंदिराशी त्याचे साधर्म्य आहे. मंदिर एकूण ४६×३० आकाराचे आहे. त्यात मुख्य मंडप १८×१८ आहे. खोलेश्वर मंदिर हे मुख्यतः शिवाचे मंदिर आहे. पण सेनापती खोलेश्वर याच्या प्रभुत्वामुळे त्याला खोलेश्वर मंदिर हे नाव पडले. पण या गोष्टीमुळे खोलेश्वर हा शिवाचा अवतार आहे असा भ्रम लोकांमध्ये झाला. खोलेश्वर आणि त्याच्या कारकिर्दीत अनेक मंदिरे बांधली होती. त्यामध्ये बाराव्या शतकातील अमलेश्वर महादेव मंदिर याचे प्रामुख्याने नाव घेता येईल. खोलेश्वराच्या प्रभुत्वामुळे चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रात अंबाजोगाई चा उल्लेख ' खोलनायकाचे अंबे ' असा केला आहे. अशा या अंबाजोगाईचा सेनापतीचे नाव अंबाजोगाईच्या इतिहासात अजरामर राहील.

हत्तिखाना लेणी[संपादन]

अंबाजोगाई परिसरात खडक कोरून उभारलेली काही लेणी मंदिर आहेत अशी मंदिरे जिल्ह्यात अन्यत्र कोठेही सापडत नाहीत. अंबाजोगाई शहरातील योगेश्वरी मंदिराच्या वायव्येला अवघ्या अर्धा कि.मी. अंतरावर असणारे ' भूचरणात ' सध्याचा ' हत्तीखाना ' ही ' शिवलेणी ' उल्लेखनीय आहे. ही लेणी मुख्यतः शिवमंदिर आहे. या लेणीत मूळ हत्तीप्रमाणे हत्तींची भव्य शिल्पे असल्याने ही लेणी हत्तीखाना या नावाने प्रसिद्ध आहे. योगेश्वरी माता या भागात उल्लेख केलेल्या दंतकथेमुळे हे मंदिर ' जोगाई चे माहेर ' म्हणूनही ओळखले जाते. या लेणी मंदिराच्या शिलालेखानुसार ' परमारवंशीय उदयदित्य राजा ' याने शके १०६६ अश्विन शुद्ध प्रतिपदेस म्हणजे ३१ ऑगस्ट ११४४ रोजी भूचरनाथ हे मंदिर उभारले. या शिलालेखात देवळाचे धार्मिक कृत्य करण्यासाठी ज्या देणग्या दिल्या त्यांचा उल्लेख आहे. भूचरनाथ ( हत्तीखाना ) मंदिराच्या दैनंदिन विधीसाठी व धार्मिक उपक्रमांसाठी दिलेल्या दानाचाही त्यात उल्लेख आहे. यात अंबाजोगाईच्या परिसरातील विविध स्थळनामाचा उल्लेख आला आहे. हत्तीखाना शिलालेख प्राचीन मराठी शिलालेख पैकी एक ठरतो. हत्तीखाना हे लेणी मंदिर जयंती नदीच्या उत्तर काठावर खडकात कोरलेले असून ते चौकोनी आकाराचे आहे. त्यात १३.७१×२७.४३ मी. चा भव्य सभामंडप आहे. याला ३२ स्तंभ असून हजार लोक त्यात बसतील अशी व्यवस्था आहे. या लेणीत पश्चिमेस खडकात कोरलेला एक लहानसा बोगदा असून तेच या लेणी मंदिराचे प्रवेशद्वार आहे. त्यातून खाली गेले की लहान मंडप आहे. त्यात हत्तीची चार भव्य शिल्प आहेत. या हत्तीवरूनच या लेणीला ' हत्तीखाना ' नाव पडले आहे. त्याच्या समोरच भव्य सभामंडप आहे. हा या लेणी मंदिराचा मुख्य भाग ठरतो. त्यात विविध छोटी कक्षागारे असून उजव्या बाजूला गणपती व त्याचा भाऊ सदानंदाची शिल्पे जी आता पूर्णतः नष्ट झालेली आहेत. यातील खडकावर तांडव नृत्य करणाऱ्या शंकराचे भव्य शिल्प आहे. या लेणीच्या सभामंडपाचे वैशिष्ट्य म्हणजे हा भव्य सभामंडप इतका सुंदर केला आहे की हवा आल्यानंतर कापडी मंडप ज्याप्रमाणे हवेत हलतो तसे या सभामंडपाचे छत हवेमुळे ह हलण्याचा भास पाहणाऱ्यांना होतो. हे शिल्प अंबाजोगाईचे भूषण आहे.

कृष्णदयार्णव[संपादन]

कृष्णदयार्णव: (? १६७४–१३ नोव्हेंबर १७४०). प्राचीन मराठी कवी. सातारा जिल्ह्यातील कोपर्डे (कोपारूढ) ह्या गावी जन्म. आईचे नाव बहिणा वडिलांचे नारायण. ह्याचे मूळ नाव नरहरी असे होते. महाराष्ट्रातील तत्कालीन राजकीय अस्थिरतेमुळे तो कोपर्डे सोडून मराठवाड्यातील आंबेजोगाई येथे आला. तेथे गोविंद चौधरीनामक आनंदसंप्रदायी पुरुषाकडून त्याने दीक्षा घेतली. घरोघरी भिक्षा मागताना तो ‘कृष्णदयार्णव’ ह्या नामाचा मोठ्याने घोष करीत असल्यामुळे त्याच नावाने तो ओळखला जाऊ लागला, असे सांगतात. वयाची चाळिशी उलटल्यानंतर त्याला महारोग झाला. त्यावर उपाय म्हणून त्याच्या गुरूने आणि इतर अनेक संत सज्जनांनी त्यास भागवताच्या दशमस्कंधावर मराठी भाष्य लिहिण्याचा उपदेश केला. त्यास अनुसरून त्याने हरिवरदा हा ग्रंथ लिहावयास घेतला. ह्या ग्रंथाच्या पूर्वार्धातील सर्व, म्हणजे ४९ व उत्तरार्धातील ३७ अध्याय त्याने स्वतः पूर्ण केले आहेत. ३८ व्या अध्यायाच्या काही ओव्या पूर्ण केल्यानंतर पैठण येथे तो निवर्तला. उरलेले तीन-साडेतीन अध्याय त्याचा शिष्य उत्तमश्लोक ह्याने पूर्ण केले (१७४३).

हरिवरदा ओवीबद्ध असून (एकूण ४२,४८७ ओव्या) त्यातील ओवी एकनाथांच्या ओवीसारखी साडेचार चरणी आहे. भागवताच्या दशमस्कंधावरील श्रीधरी टीकेचा मुख्य आधार ह्या ग्रंथासाठी घेण्यात आला असून तसे ग्रंथात नमूदही केले आहे. अर्थात, इतरही अनेक टीकांचे सार त्यात आणले आहेच. कृष्णदयार्णवाची काव्यरचना काही ठिकाणी पाल्हाळिक झाली असली, तरी अनेक ठिकाणी वेधक वर्णनांनी नटलेली आहे. ह्या ग्रंथातून त्याच्या विद्वत्तेचाही प्रत्यय येतो. आपल्या ग्रंथात फार्सी-अरबी शब्दांचा प्रवेश होऊ नये म्हणून त्याने अनेक संस्कृत प्रतिशब्द घडविले. हा संपूर्ण ग्रंथ आता आठ खंडांत प्रसिद्ध झालेला आहे (१९५५–६१). ह्याशिवाय तन्मयानंदबोध, चिन्मयानंदबोध हे श्लोकबद्ध लहान ग्रंथ, सु. १५० पदे, ६५ स्फुट कवने, काही अभंग व मुकुंद राजावरील एक आरती अशी त्याची रचना उपलब्ध आहे.

दत्तजननोत्साहवर्णन, विचारचंद्रिका, सिद्धान्तसार, शिवरात्रिकथा अशी काही ग्रंथरचना कवि काव्यसूचिकार चांदोरकर कृष्णदयार्णवाच्या नावावर देतात. त्याचे एक गीतासार असल्याचे डॉ. शं. गो. तुळपुळे सांगतात. सदर ग्रंथांपैकी दत्तजननोत्साहवर्णन हा ग्रंथ कृष्णदयावर्णाचा नसून त्याचा शिष्य उत्तमश्लोक ह्याचा असल्याचे आता अधिक संशोधनान्ती दिसून आले आहे.

शिवकल्याण[संपादन]

शिवकल्याण : (सु. १५६८–१६३८). मराठी संतकवी. मराठवाड्यातील आंबेजोगाई हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव. हे घराणे नाथसंप्रदायी आणि विठ्ठलभक्त होते. शिवकल्याणांनी नित्यानंदैक्यदीपिका ह्या ग्रंथात आदिनाथापासून सुरू असलेली आपली गुरुपरंपरा सांगितली असून, ती पाहता मुक्ताबाईपासून शिवकल्याण हे चौदावे पुरुष येतात. त्यांचे वडील त्रिमल ऊर्फ नित्यानंद हे त्यांचे गुरूही होते. भागवताच्या दशमस्कंधावरील शिवकल्याणी ही विवरणात्मक टीका (अध्याय ९० ओव्या ४४,१५३) आणि नित्यानंदैक्यदीपिका ही श्रीज्ञानदेवांच्या अनुभवामृतावरील (अमृतानुभव) ६,४१० ओव्यांची सविस्तर टीका (रचना १६३५) ही त्यांची ठळक ग्रंथरचना होय.

आपल्या शिवकल्याणी ह्या ग्रंथात त्यांनी श्रीकृष्णावताराचे रहस्य सांगितले असून कृष्णलीलांचा परमार्थपर अर्थ लावला आहे. ‘शृंगाररसचि शांतिरसे मांडिला’ अशी भूमिका त्यांनी घेतलेली असून प्रापंचिकांचे मन परमेश्वराकडे वळवावे, कामक्रोधांपासून परावृत्त होऊन त्यांना नित्यानित्यविवेक सुचावा आणि ब्रह्मात्मैक्य वृत्तीचा अनुभव यावा, असा हेतू त्यांनी मनाशी बाळगलेला आहे. ह्यातील तत्त्वचिंतनावर आणि भाषेवर ज्ञानेश्वरीचा प्रभाव आहे. ह्या ग्रंथातील ‘कृष्णजन्म’, ‘रासपंचाध्यायी’ आणि ‘वेदस्तुति’ एवढा भाग छापून प्रसिद्ध झाला आहे. ह्या ग्रंथाची एक समग्र हस्तलिखित प्रत डॉ. वि. म. कुलकर्णी ह्यांना प्राप्त झाली आहे.

शिवकल्याणकृत नित्यानंदैक्यदीपिका ही कथाकल्पतरू ह्या प्रसिद्ध ग्रंथाचे कर्ते कृष्णयाज्ञवल्की ह्यांचे पुत्र गोपाळ ह्यांच्या प्रेरणेने लिहिली गेली. आपला ग्रंथ लिहिण्याच्या कामी शिवकल्याणांना गोपाळ ह्यांचे काही मार्गदर्शनही मिळाले. शिवकल्याणांनी श्रीज्ञानदेवांचे हृद्गत समरसतेने विशद करून अनुभवामृताचे रहस्य स्पष्ट केल्यामुळे श्रीज्ञानदेवांच्या परंपरेला उजाळा देण्याचे श्रेय एकनाथांबरोबर शिवकल्याणांनाही दिले जाते.

उपर्युक्त ग्रंथांखेरीज श्रीशंकराचार्यांच्या अपरोक्षानुभूति ह्या ग्रंथावर एक संस्कृत टीकाही त्यांनी लिहिली असून, तीस त्यांनी ‘हरिकीर्तन’ असे म्हटले आहे.