वाघ्या-मुरळी नृत्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाघ्या मुरळी[१]

वाघ्या मुरळी हे महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत प्रसिद्ध असे लोकनृत्य आहे. महाराष्ट्रातील जेजुरी येथील खंडोबा या दैवताचे उपासक म्हणजे वाघ्या- मुरळी आणि त्यांच्याद्वारे केले जाणारे लोकनृत्य म्हणजे वाघ्या-मुरळी नृत्य होय. खंडेरायाचे हे भक्त देवापुढे जागरण करून खंडोबाची लीला वर्णन करतात. अनेक लोककलांची जननी म्हणूनही जागरणातील वाघ्या मुरुळी यांच्या कलेकडे बघितले जाते.


वाघ्या-मुरळी प्रथा :

अपत्य प्राप्तीसाठी देवाला नवस करणारे लोक मुले होताच पहिले मुल खंडोबाला अर्पण करत असत. त्यातील मुलगे ’वाघ्या’ आणि मुली ’मुरळी’ बनत. मुरळीचे लग्न खंडोबाशी लावून देण्याची प्रथा होती. वाघ्या-मुरळी आयुष्यभर खंडोबाची भक्ती करत असत.


नृत्य पद्धती -

पिवळं पातळ, कपाळावर भंडारा, पदराला बांधलेली घंटी वाजवत मुरळी नाचते आणि हातात दिमडीघाटी घेऊन मुठी-मुठीने भंडारा उधळत ’हब हब हब’ म्हणत नाचणारा वाघ्या तिला साथ करतो. रंगीत पाटावर वस्त्र मांडून त्यावर विड्याच्या पानांचा खंडोबा व देवाचे टाक ठेवले जातात. शेजारी बुधली दिवटी मांडतात. गणपती म्हणून सुपारी ठेवतात. टाळ, तुणतुणे, घाटी यांचा नाद घुमतो. पाच ऊसांच्या मखरात प्रतीकात्मक देवांची स्थापना करून वाघ्या मुरळी हे जागरण मांडतात. देवदेवतांना जागरणाला आवर्तन दिल्यावर खंडोबाची लीला वर्णन करणारी गाणी म्हटली जातात.

या सादरीकरणामध्ये आवाहन, गण, कथन व आरती अशी विभागणी असते. जागरणाची सुरुवात करताना सर्व देवतांना चौकावर येण्याचे आवाहन केले जाते.

“जेजुरीच्या खंडेराया जागराला या….या…

पालीच्या तुम्ही गणराया जागराला या….या…

अशा रितीने आवाहन झाल्यानन्तर गण म्हंटला जातो. त्यानंतर भाविक भक्तांनी मांडलेल्या जागरण विधीमध्ये वाघ्या मुरुळी भक्तांच्या वतीने मल्हारी मार्तंडाला विनवणी करतात.

येळकोट येळकोट जय मल्हार

हाब हाब हाब ।।

जेजुरीच्या खंडेरायाच्या  जागरणाला या या

वाईच्या तू गणराया  जागरणाला या या

बानूबाईच्या मल्हारराया जागरणाला या या ।।

येळकोट येळकोट जय मल्हार

मल्हार रायाचं नाव घेत हो

चढून जातो भक्त गडा

येळकोट येळकोट गजरामंदी वाजतो चौघडा ।।

नवलाख पायरी गडाला हो खंडोबा रायाला

मल्हारी मल्हारी देव हा मल्हारी

भक्तांचा देव हा कैवारी देव हा मल्हारी ।


वेशभूषा:

वाघ्या - धोतर, सदरा, जाकीट, गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी (त्यात भंडारा म्हणजे हळद)

मुरळी - नऊवारी पातळ, अंबाडा, गळ्यात कवड्यांची माळ

वाद्य : दिमडी, खंजीरी, तुणतुणं, टाळ, घाटी, डफ़

साहित्य : कोरंबा (वाघ्याचं भिक्षापात्र), तांबड वस्त्र, सव्वाशेर धान्य, दोन तांबे, नागवेलीची पानं, दोन नारळ, पाच ऊसफ़ुलांच्या माळा, पुऱ्या सोटाऱ्यां, कडाकणीचा फ़ुलोरा.

बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे वाघ्या-मुरळी संस्थेतही बदल होतो आहे. मुलं खंडोबाला अर्पण करण्याची प्रथा आता राहिलेली नाही. पण आजही वेगवेगळ्या ठिकाणी खंडोबाच्या जत्रांमधून वाघ्या - मुरळी नृत्य सादर केले जाते.


संदर्भ[संपादन]

  1. ^ "वाघ्या-मुरळी नृत्य".