व्याख्या : भाषेचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे भाषाविज्ञान होय. जगातील सर्वच भाषांचा अभ्यास सुरु झाल्यावर सर्वच भाषांमागे काही समान तत्त्वे असतात, असे अभ्यासकांच्या लक्षात आले. त्यानंतर ही विद्याशाखा अधिक विकसित होत गेली.
प्रारंभ : विल्यम जोन्स या अभ्यासकामुळे भाषाविज्ञानाचा पाया रचला गेला. लॅटिन आणि ग्रीक भाषांचा अभ्यासक असणारी ही व्यक्ती इंग्रजांच्या प्रशासनात सहभागी होती. भारतात आल्यावर त्यांनी संस्कृतचाही अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांना संस्कृत, लॅटिन आणि ग्रीक भाषांमधील विलक्षण साम्य प्रत्ययास आले. त्यामुळे कोलकाता येथे बोलताना १८८७ मध्ये त्यांनी या तीनही भाषांमधील साम्यस्थळे उलगडून दाखवली. त्यामुळे भाषांच्या तौलनिक आणि ऐतिहासिक अभ्यासाला वेगाने चालना मिळाली. एशियाटीक सोसायटीची स्थापना झाली. पूर्वी केवळ व्याकरणाचा अभ्यास म्हणजेच भाषेचा अभ्यास असे मानले जात होते. जोन्स यांच्यामुळे आधुनिक दृष्टिकोनातून भाषेचा अभ्यास सुरु झाला. एका अर्थाने आधुनिक काळातील भाषाविज्ञान शाखेचे जनक म्हणून विल्यम जोन्स यांचे नाव घेतले जाते.