वनस्थळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र ही निर्मलाताई पुरंदरे यांनी इ.स. १९८१मध्ये स्थापन केलेली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शैक्षणिक काम करणारी एक संस्था आहे.

सरकारने मुलांना वयाच्या सातव्या वर्षापासून शिक्षण देण्याची जबाबदारी पत्करली असल्याने, ३ ते ६ या वयांतील मुलांसाठी बालवाड्या उघडून त्यांच्या शिक्षणाची सोय ही संस्था करते. त्यासाठी बालवाडी चालविण्याचे ६ महिन्याचे शिक्षण ही संस्था ग्रामीण स्त्रियांना त्यांच्याच गावी जाऊन देते.

वनस्थळीतून बालवाडी चालविण्याचे शिक्षण घेतलेल्या स्त्रिया आपल्या कुटुंबाची संमती मिळवून अन्य ग्रामस्थांच्या सहकार्याने आपल्याच गावी बालवाडी काढतात. या स्त्रियांचा पगार आणि त्यांना लागणारी शैक्षणिक साधने यांची व्यवस्था वनस्थळी करते. ज्या स्त्रियांना अधिक शिक्षण घ्यायचे असेल त्यांसाठी ही संस्था मदत करते.

ही वनस्थळी संस्था वर्षातून एकदा बालवाडी शिक्षकांचे एक शिबिर भरवून त्यांच्या अन्य शिक्षकांशी भेटीगाठी घडवून आणते आणि आरोग्य, कुटुंबनियोजन आदी विषयांत मार्गदर्शन करते.

मुलांच्या पालकांशी संवाद साधून या बालवाडीच्या शिक्षिका गावातील निरक्षरांना साक्षर करण्याचे वर्गही चालवतात.

वनस्थळी दर महिन्याला एक पुस्तिका प्रकाशित करते. तिच्याद्वारे शिक्षकांचे अनुभव आणि नवीन कल्पना यांची देवघेव होते.

वनस्थळी संस्था आपल्या सभासदांना सायकली/स्कूटरी मिळवून देते, आणि त्यांचा कामासाठी इकडेतिकडे फिरणे सुलभ करते. त्यांना शिवणयंत्रे मिळवून देऊन अर्थार्जनाचे एक नवीन साधन उपलब्ध केले जाते.

६ ते १२ वर्षाच्या मुलांसाठी वनस्थळी, सुटीकाळातली शिबिरे भरवते.

वनस्थळीचे शिक्षक महाराष्ट्रातील सरकारी आणि खासगी अनाथालयांतील सुमारे २००० अनाथ मुलांना अभ्यासात मदत करत आहेत.

वनस्थळीचे कार्यकर्ते बिडी कामगारांसाठी वाचनवर्ग चालवतात. अनेक गावांत छोटी ग्रंथालये आणि वर्तमानपत्रांची सोय ही संस्था करत असते.

वनस्थळी ही आपल्या खर्चासाठी भारतातील आणि परदेशांतील देणगीदारांवर जवळजवळ पूर्णपणे अवलंबून आहे.

वनस्थळी आणि निर्मलाताई पुरंदरे यांच्या कार्याची माहिती करून देणारे ’आत्मसिद्धा’ नावाचे पुस्तक माणिक कोतवाल यांनी लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन प्रतापराव पवार यांच्या हस्ते ५ जानेवारी २०१५ रोजी झाले.