Jump to content

वडगाव दर्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वडगाव दर्यादेवी या पानावरून पुनर्निर्देशित)

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगांव दर्या या ठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही बहिणींचे देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. कान्हूर पठार जवळ हे गांव वसलेले आहे. नगर-कल्याण रोडवर टाकळी ढोकेश्वर जवळ वाफारेवाडी फाट्यापासुन या तीर्थाच्या ठिकाणी पोहचता येते.

श्रीक्षेत्र वडगांव दर्या हा एक रमणीय परिसर असुन तो वृक्ष वल्लरींनी वेढलेल्या निसर्ग रम्य एका दरीत वसलेला आहे. याचठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही देवीचे मंदिर आहे. वडगांव दर्या हे गांवच मुळी दरीत वसलेले आहे. देवीचे देवालय हे डोंगराच्या कपारीत कोरलेले आहे. दोन्ही देवीच्या मुर्ती या प्राचीन व स्वयंभू आहेत असे तेथील देवीचे पुजारी सर्वश्री मधुकर व दत्तात्रय बळवंत कांबळे गुरुजी यांनी सांगितले.

दाट झाडीत खाली दरीत देवीच्या मंदिरात जाण्यासाठी शंभर सव्वाशे पायरी उतरून जावे लागते. पायरी उतरतांना परिसरातील माकडांची टोळी भक्तांजवळ प्रसाद ग्रहण करण्याकरीता येतात. त्यांना फुटाणे शेंगादाणे केळी आदि घेऊन जावे. माकडांपासुन सावध रहावे कारण तुमच्या हातातील वस्तु ते लांबवतात. लहान मोठ्या माकडांच्या चित्कारांचा आवाज परिसरात घुमत असतो.

पायरी उतरून आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारीत दर्याबाई व वेल्हाबाई यांची कळस विरहित शेजारी शेजारी मंदिरे आहेत. मंदिराजवळ डोंगर कपारीतुन वाहणारे झुळझुळ पाण्यात भाविक चिंब होतात. पावसाळ्यात डोंगर कपारीतुन अंखड पाणी झिरपत असते. मंदिरासमोर भले मोठे पटांगण व शेजारी प्रशस्त पडवी विश्रांती करीता देवस्थानने बांधली आहे. डाव्या बाजुला एक कुंड असुन ते शक्तीतीर्थ नावांने प्रसिद्ध आहे. स्नान कुंडात स्नान केल्याने खरुज नायटा सारखी त्वचेचे विकार दूर होतात अशी देवीची ख्याती आहे. देवीच्या मंदिरास दरवाजे नव्हते परंतु माकडांचा उपद्रव टाळण्याकरीता आता तेथे लाकडी दरवाजे लावले आहेत.

आत मंदिरात प्रवेश करताच दर्याबाई व वेल्हाबाई देवीच्या तांदळाकृती स्वयंभू मुर्ती आहेत. देवीच्या शेजारी महादेवाची पिंड आहे. मंदिरात सदैव पाणी झिरपत असते. तेथे पाणी साचवण्यासाठी मोठा ड्रम ठेवला आहे जो नेहमीच भरून वाहत असतो. दर्याबाईच्या शेजारी वेल्हाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे. तेथुन वाकुन जावे लागते. दोन्ही देवा बहिणी असुन मोठ्या बहिणीने दर्या बाईने कोपराने तो दरवाजा निर्माण केला आहे अशी ख्याती आहे. मंदिराच्या डावीकडे भैरवनाथाचे मंदिर आहे. तेथे लवणस्तंभाचे प्रचंड उभे रांजण निसर्गाने तयार केलेले आहे.

या देवस्थानाचे एक कतुहल व विशेष म्हणजे दरीच्या वरील भागात एक मोठे शेत दिसते. ही शेती गांवकरी सहभागाने व देवीच्या भक्तीने करतात. या शेतातील उत्पन्न देवीला व तेथील वास्तव्य करणाऱ्या वानर सेने करीता आहे. सर्व गांवकरी आनंदाने व भक्तीने या शेतीची मशागत करतात. या कामात कुचराई करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीची नासाडी ही वानरसेना करते अशी ख्याती आहे. ही वानरसेना चांगलीच माणसाळलेली आहेत. गांवात लग्न व अन्य धार्मिक कार्यात या वानरसेनेतील प्रमुख वानराला मानाचा फेटा मुंडासे बांधण्याचा रिवाज आहे. वानरसेनेला पंगतीत जेवण्यासाठी आमंत्रित केले जाते. मानाचा फेटा नंतर हे वानर तुकडे तुकडे करून आपल्या वानर बांधवात वाटुन घेतात. या परिसरात सिताफळ, चिंच, जांभळ, करंजी, आंबा, बाभुळ, वड, पिंपळ आदि झाडांचा सामावेश आहे. हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. धबधब्याजवळ एक भुयार तयार झाले आहे. या भुयारात एक किलोमीटर पर्यंत सर्व प्राणी संचार करतात. 1958 मध्ये हे भुयार दगड मातीने बुजले गेले आहे. परंतु अद्याप 150 फुटापर्यंत गुहा आहे.

नवरात्रात दहा दिवसाचा उत्सव असतो. तसेच माघ शुद्ध पोर्णिमेस मोठी यात्रा भरते. वडगांव दर्या येथील शुक्ल यजुर्वेदीय शाखेचे ब्राह्णण मधुकर व दत्तात्रय कांबळे गुरुजी यांचेकडे देवीची पुजा अभिषेक आदि धार्मिक कार्य करण्याची जबाबदारी पुर्वपंरपरेने चालत आलेली आहे.