ल.मो. बांदेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लक्ष्मण मोतीराम बांदेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

आर्यचाणक्यकार म्हणून ओळखले जाणारे सावंतवाडीचे लक्ष्मण मोतीराम बांदेकर (१४ डिसेंबर, इ.स. १९४० - १२ फेब्रुवारी, इ.स. २०१५) हे मराठीतले एक नामवंत नाटककार होते.

ल.मो. बांदेकरांचे वडील नाट्यप्रेमी होते. त्यांच्यासोबत वयाच्या सातव्या-आठव्या वर्षांपासूनच लमो नाटके पाहू लागले. राम गणेश गडकर्‍यांच्या नाटकांचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला. गडकर्‍यांची नाटके लमोंना मुखोद‍्गत होती. पुढे सावंतवाडीत 'नाट्यदर्शन' नाट्यसंस्थेत नाटककार म्हणून वावरताना ते गडकर्‍यांच्या नाटकांतले उतारे संस्थेतल्या कलावंतांना म्हणून दाखवत. ल.मो. बांदेकरांच्या नाटकांनी नाट्यदर्शन या सावंतवाडीतील मान्यवर नाट्यसंस्थेतील कलावंतांची पिढी घडली.

सावंतवाडीच्या जिल्हा बँकेत नोकरी करताना दिनकर धारणकर हा अट्टल नाट्यवेडा माणूस ल.मो. बांदेकरांच्या जीवनात आला आणि लमोंचे नाट्यलेखन अधिकच बहरले. धारणकर हे अत्यंत कल्पक दिग्दर्शक होते. लमो त्यांना गुरू मानीत.

ल.मो. बांदेकर यांनी सुमारे सुमारे १५ नाटके लिहिली. इ.स. १८८५ ते १९४० या कालखंडातील वीस निवडक ऐतिहासिक, सामाजिक, संगीत नाटकांतील भागांची एकत्रित गुंफण करून 'रंगदर्शन' हा अभिनव कार्यक्रम त्यांनी सादर केला होता. महाभारतातील पाच स्त्रियांची स्वगते असलेली 'व्यासकन्या' नावाची संहिताही त्यांनी लिहिली होती.

नाटककार ल.मो. बांदेकर यांचे गाजलेले नाटक म्हणजे ’आर्य चाणक्य’. मुंबईत 'आविष्कार' या नामवंत प्रायोगिक नाट्यसंस्थेने त्यांचे हे नाटक सादर केले होते. त्याचे दिग्दर्शन आणि त्यातील प्रमुख भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी केली होती. 'आर्य चाणक्य'चे प्रयोग महाराष्ट्रात सर्वदूर झाले. पाचशेहून अधिक प्रयोगांचा पल्ला या नाटकाने गाठला.

ल.मो. बांदेकर यांनी 'अंबा' या नाटकातून पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध बंड करणार्‍या महाभारतातील स्त्रीचे धारदार चित्रण केले.

ल.मो. बांदेकर यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

  • अंबा
  • आर्य चाणक्य
  • कापूसकोंड्याची गोष्ट
  • केला कलकलाट काकांनी
  • निर्णय
  • पुत्रवती मी संसारी
  • संगीत लीला गौरीहराच्या
  • व्यासकन्या
  • सेकंड लिअर

पुरस्कार[संपादन]