रामचंद्र हिराजी सावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामचंद्र हिराजी सावे ह्यांचा जन्म २३ मे १९१८ रोजी पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील तारापूर गावी झाला. ते दीड वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांचे माध्यमिक शिक्षण सोशल सर्व्हिस लीग ह्या मुंबईतील संस्थेच्या रात्र शाळेत झाले.१९४१ साली ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले.सुरुवातीला त्यांनी प्राथमिक शिक्षक आणि बँकेत कारकून म्हणून नोकरी केली.काही काळानंतर त्यांनी फळे, फुले, भाजीपाला ह्याचा व्यापार करण्यासाठी सावे,गावडे,चौघुले आणि कंपनी स्थापन केली.पुढे त्यांनी पराग इंजिनीअरिंग प्राडक्टस् प्रा.लि.कारखाना चालू केला. मुंबई महापालिकेत त्यांनी १९६१ ते १९६७ पर्यंत मार्केट व गार्डन समिती, वर्क्स समिती, लेबर समिती, हॉकर्स समिती, लॉ आणि रेव्हेन्यू समिती, बेस्ट समिती, अश्या विविध समित्यांवर काम केले. मार्केट व गार्डन समितीचे ते उपाध्यक्ष व अध्यक्ष होते.आपल्या जन्मगावी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन तारापूर एज्युकेशन सोसायटी,स्थानिक ग्रंथालय, सहकारी पतपेढी, इत्यादी संस्था नावारूपाला आणल्या. त्यांनी तारापूर माध्यमिक विद्यालयासाठी इमारत निधी उभा केला. त्यांच्या मौलिक योगदानाबद्दल तारापूर शाळेला त्यांचे नाव रामचंद्र हिराजी सावे विद्यालय देण्यात आले.त्यांनी संस्थेची सभासद, सचिव, अध्यक्ष, विश्वस्त अश्या पदावर कार्यरत राहून सेवा केली. त्यांनी पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालय आणि मुंबईतील अनेक शैक्षणिक संस्थामध्ये कार्य केले. नंतरच्या काळात त्यांनी रा.ही.सावे विश्वस्त संस्था निर्माण करून सर्वसामान्य गरीब बालकांच्यासाठी क्रीडा, मनोरंजन, वक्तृत्व इत्यादीसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या.तारापूर येथे पूर आपत्तीमध्ये त्यांनी आर्थिक मदत केली. तारापूर येथे ज्येष्ठ नागरिक भवन निर्माण केले. अण्णांचे जीवन हे संस्थामय झाले होते. विविध शैक्षणिक संस्था, विविध व्यापारी संघटना, भायखळाचा साधनाश्रम,वानखेडे स्टेडियम, चेंबर ऑफ कॉमर्स,इत्यादी क्षेत्रात ते शेवटपर्यंत कार्यरत राहिले.[१]

  1. ^ #महाराष्ट्र टाईम्स, मुंबई टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक २५ मार्च २०२३.