राजाराम महाविद्यालय (कोल्हापूर)
राजाराम महाविद्यालय हे एक शासकीय महाविद्यालय असून ते कोल्हापूर शहरातल्या शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहे. कोल्हापूरच्या पूर्व प्रवेश मार्गावर वसलेले हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाच्या इमारतींपासून फार लांब नाही.
सध्या महाविद्यालयात विज्ञान विषयातील स्नातक स्तरावरील व कला विभागातील स्नातकोत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. राजाराम महाविद्यालयाच्या स्वतंत्र अशा १३ इमारती आहेत. त्यामध्ये एक २,००० प्रेक्षक क्षमतेचे सभागृह, किमान १,२५,००० पुस्तकांचे ग्रंथालय आणि सुसज्ज अशा प्रयोगशाळांचा समावेश आहे.
राजाराम महाविद्यालयास प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. अनेक दिग्गज ह्याच राजाराम महाविद्यालयात घडवले गेले आहेत. त्यांना "ख्यातकीर्त राजारामीयन" असे संबोधले जाते. महाविद्यालयात प्रवेश केल्यावर मुख्य इमारतीत यापैकी काही लोकांची नावे आपल्याला पाहायला मिळतील.
प्रस्तावना
[संपादन]राजाराम महाविद्यालय ह्याची स्थापना सन १८८० मध्ये झाली. त्यावेळी हे महाविद्यालय कोल्हापूरच्या मध्यस्थानी असलेल्या भवानी मंडप परिसरातील राजवाड्यामध्ये भरवण्यात येत असे. त्याकाळी महाविद्यालयास राजाश्रय होता. सन १९२७ला महाविद्यालयाने विज्ञान विभाग सुरू केला. त्याची इमारत राजवाड्यापासून दूर (जिथे आता शिवाजी तंत्रशिक्षण संस्था आहे) येथे होती. महाविद्यालयाच पसारा वाढत चालल्या मूळे एका प्रशस्त परिसराची गरज वाटू लागली. भारत स्वतंत्र झाल्यावर महाविद्यालय त्याच्या आत्ताच्या परिसरात स्थलांतरित करण्यात आले. हा परिसर कोल्हापूर शहरापासून थोडा दूर पूर्व माथ्यावर वसलेला आहे. येथून कोल्हापूर शहराच्या पूर्व-उत्तर भागाचा छान नजारा पाहायला मिळतो. महाविद्यालयाच्या शेजारी सध्या शासकीय शेतकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन, शिवाजी विद्यापीठ तसेच सायबर अशा शैक्षणिक संस्था आहेत. पूर्वेकडे राजाराम तलाव व पुणे - बेंगळूरू राष्टीय महामार्ग आहे.