रघुनाथ नारायण हणमंते
शहाजीराजे व शिवाजीराजे यांच्या वेळचा एक स्वामिनिषठ मुत्सद्दी. हणमंते भोंसल्याचें पिढीजाद नोकर असून, रघुनाथ नारायण यास शहाजीनें आपल्या कर्नाटकांतील जहागिरीचा इ. स. १६५३ मध्यें दिवाण नेमिलें. त्याप्रमाणें तें काम त्यानें मरेतोंपर्यंत केलें. व्यंकोजीच्या अयोग्य वर्तनास कंटाळून मध्यंतरी हा शिवाजीराजें कडे आला होता व यानेंच छ.शिवाजीला कर्नाटकावर स्वारी करून येण्याबद्दल प्रोत्साहन दिलें होते. ह्या स्वारीमध्यें रघुनाथ नारायण हणमंते याचें शिवाजीस अप्रतिम साहाय्य झालें, म्हणून त्यानें त्यासच नवीन जिंकलेल्या सर्व प्रांतावर आपल्या वतीनें मुख्य, कारभारी नेमिलें; आणि त्याचे बंधु जनार्दनपंत हणमंते यांस पंतसुमंत हा अधिकार देऊन त्यांची आपल्या अष्टप्रधानांमध्यें योजना केली.
शिवाजी राजेंच्या सांगण्यावरून रघुनाथपंतानें 'राजव्यवहार कोश, रचिला. छ.शिवाजीच्या मृत्यूनंतर सर्वत्र अव्यवस्था व गोंधळ माजला, त्यावेळीं रघुनाथपंतानें आपल्या वजनानें व दरा-याने, संभाजी राजेंच्या कारकिर्दीत देखील तिकडील प्रांतांचा उत्तम बंदोबस्त करून व सुरळीत रीतीनें वसूल करून पुष्कळ द्रव्य खजिन्यांत शिल्लक ठेविलें. छत्रपती संभाजीच्या गैरवर्तनाची बातमी रघुनाथपंताच्या कानावर गेली तेव्हां त्याची कानउघाडणी करण्याकरितां इ. स. १६८१ मध्यें तो रायगडावर आला. पंताच्या कळकळीच्या झणझणीत उपदेशाचा संभाजी राजावर क्षणभर तरी अनुकूल परिणाम होऊन, त्यानें त्यास जुन्या प्रधानमंडळास बंधमुक्त करण्याचें वजन दिलें व त्याचप्रमाणें त्याचे बंधु जनार्दनपंत हणमंते व पेशवे मोरोपंत पिंगळे यांस लागलीच सोडून दिलें. रघुनाथपंत हणमंते संभाजी राजाचा निरोप घेऊन कर्नाटकामध्यें परत येण्यास निघाला; परंतु वाटतें चंदी मुक्कामीं पोंचण्यापूर्वीच त्याचा मध्येंच शेवट झाला (१६८२) राजारामाच्या कारकिर्दीत रघुनाथपंताचा भाऊ जनार्दनपंत याजकडे अमात्यपद होतें. यांचें वंशज तंजावरकडे असावेत. रघुनाथपंत ह्याच्या शहाणपणाचा लौकिक कर्नाटक प्रांतीं अद्यापि देखील ऐकू येतो.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ केतकर ज्ञानकोशातील माहिती