युरोपीय मराठी साहित्य संमेलन
१९९८ मध्ये डॉरड्रेक्ट (नेदरलॅंड) येथे प्रथम युरोपियन मराठी संमेलन साजरे झाले. त्यानंतर दरवर्षी ईएमएस हे ब्रिटनमध्ये तसेच इतर युरोपियन देशात होत आले आहे. त्यानंतरची संमेलने :-
- ५वे संमेलन २००४ साली १६ ते १८ जुलै दरम्यान आॅस्लो (नाॅर्वे) येथे झाले.
- पॅरिसजवळ जुई ऑं जोझासमधील पुरातन शातोमध्ये सातव्या मराठी युरोपियन संमेलनाचे १८जुलै २००८ रोजी उद्घाटन झाले.
- १५ एप्रिल २०१0 रोजी झुरिचमध्ये युरोपियन मराठी संमेलन साजरे झाले.
- भारताबाहेर राहणाऱ्या युरोपीय मराठी समुदायाला जोडणारे नववे युरोपीय मराठी साहित्य संमेलन, ६ ते ८ एप्रिल २०१२ दरम्यान इंग्लंडमधील कार्डिफ (वेल्स) येथे, पंचतारांकित व्हेल हॉटेलमध्ये झाले. डॉ. निनाद ठाकरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते.
- १०वे युरोपियन मराठी संमेलन स्काॅटलंडमध्ये १८ ते २० एप्रिल २०१४ या काळात झाले.
- २०१६ मध्ये ॲमस्टरडॅम येथे ईएमएस झाले. झालेल्या संमेलनमध्ये पुढचे २०१८ सालचे संमेलन न्यू कॅसल येथे करण्याचे सर्वानुमते ठरले. ही बातमी आल्यानंतर मराठी न्यू कॅसलवासीयांमध्ये आनंदाची प्रचंड लाट उसळली. मूठवर मराठी माणसांत बारा हत्तींचे बळ संचारले.
- लंडन मराठी संमेलन ४ जून २०१७ रोजी साजरे झाले.
- २०१८ सालचे ईएमएस न्यू कॅसल येथे २९ जून ते १ जुलै दरम्यान टाईन नदीवर वसलेल्या हिल्टन हॉटेलमध्ये होणार आहे.
संमेलनाच्या हकिकती
[संपादन]पॅरिसजवळ जुई ऑं जोझासमधील पुरातन शातोमध्ये दीप प्रज्वलन आणि गणेशपूजा करून सातव्या मराठी युरोपियन संमेलनाचे १८जुलै २००८ रोजी उद्घाटन झाले. संमेलनाच्या सकाळच्या पहिल्या सत्रात जर्मनीमध्ये शिकणाऱ्या अनुष्का गोखले, निषाद फाटक आणि अक्षय जोशी यांनी मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. सतरा परदेशी भाषा अस्खलित बोलणाऱ्या मुंबईच्या अमृता जोशीची मुलाखत सर्वांनाच चक्रावून टाकणारी होती.
संध्याकाळच्या सत्रात डॉ. मोहन आगाशेंनी श्रोत्यांशी संवाद साधला होता. मनोरंजनाची भूल देऊन शिक्षणाची शस्त्रक्रिया करण्याचे तंत्र आपण राबवतो असे त्यांनी यावेळी सांगितले. परदेशातल्या मराठी रसिकांसमोर नव्या दमाची मराठी नाटके आणण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याकरिता सुरुवातीला पुण्यातील समन्वय या नाट्यसंस्थेच्या ’साठेचं काय करायचं' या नाटकाचा हा प्रयोग या उद्देशानेच युरोपियन मराठी मंडळींसमोर आणत आहोत असे ते म्हणाले.
त्यानंतर राजीव नाईक लिखित, संदेश कुलकर्णी दिग्दर्शित आणि अमृता सुभाष आणि निखिल रत्नपारखी अभिनीत नाटकाच्या प्रयोगाने संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
९वे मराठी युरोपीय साहित्य संमेलन
[संपादन]भारताबाहेर राहणाऱ्या युरोपीय मराठी समुदायाला जोडणारे नववे युरोपीय मराठी साहित्य संमेलन, ६ ते ८ एप्रिल २०१२ दरम्यान इंग्लंडमधील कार्डिफ (वेल्स) येथे, पंचतारांकित व्हेल हॉटेलमध्ये झाले. डॉ. निनाद ठाकरे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनासाठी खास उपस्थित असलेले श्री. सचिन पिळगावकर, सौ. सुप्रिया पिळगावकर यांनी दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन केले. सौ. सुप्रिया पिळगावकर यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
युरोपमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांना एकत्र आणणे आणि युरोपात वाढणाऱ्या नव्या पिढीला मराठी संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी हा सोहळा आयोजित केला होता. संमेलनात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम झाले.