युग (खगोलशास्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खगोलशास्त्रामध्ये युग (इंग्रजी: Epoch - एपॉक) म्हणजे असा एक क्षण आहे ज्याला खगोलीय निर्देशांक, एखाद्या खगोलीय वस्तूचे घटक किंवा त्यांचे कक्षेतील स्थान यासारख्या काळानुसार बदलणाऱ्या खगोलीय गोष्टी अथवा परिमाणांसाठी संदर्भ बिंदू म्हणून वापरतात. विश्वामध्ये सर्व वस्तूंमध्ये सतत बदल होत असतात. उदाहरणार्थ, ताऱ्यांमधील अंतर बदलत असते, त्यांची तेजस्विता कमी-अधिक होत असते, ग्रहांचा अक्षीय कल बदलत असतो ज्यामुळे खगोलीय निर्देशांक बदलतात. त्यामुळे अशी वेळ किंवा क्षण ठरवणे गरजेचे असते जेव्हा परिमाणांची मापे अचूक होती. अश्या क्षणाचा संदर्भबिंदू म्हणून वापर करून खगोलीय वस्तूंचा भविष्यातील वेग आणि स्थान यांचे भाकीत करण्यासाठी त्यांच्या गतिशी निगडीत प्राचलांची गणना करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.

खगोलशास्त्रज्ञांचा समुदाय वेळोवेळी सर्वसहमतीने एखाद्या तारखेला नवीन खगोलीय युग घोषित करतो व त्याचा वापर करतो. काळानुसार विश्व बदलते आणि एक वेळ अशी येते की त्या खगोलीय युगासाठी वस्तूंची जी स्थिती होती ती वर्तमान काळापेक्षा खूप वेगळी होती. अश्या वेळी आपापसातील सहमतीने पुन्हा नवीन खगोलीय युग घोषित केले जाते आणि सर्व खगोलीय परिमाणे नवीन युगानुसार अद्ययावत केली जातात.

युग विरुद्ध संपात[संपादन]

खगोलीय डेटा फक्त एखादे युग किंवा तारखेशी निगडित संदर्भावर आधारित नसतो, तर त्यामध्ये इतर प्रकारचे संदर्भसुद्धा असतात. उदा. खगोलीय निर्देशांक प्रणाली ही "संपात आणि विषुववृत्त" यांवर आधारित आहे.

निर्देशांक पद्धतीसाठी दिनांक संदर्भ[संपादन]

जेव्हा डेटा त्याच्या मूल्यासाठी एखाद्या निर्देशांक पद्धतीवर अवलंबून असतो, तेव्हा त्या निर्देशांक पद्धतीची तारीख थेट किंवा अप्रत्यक्षपणे सांगणे गरजेचे असते.

खगोलशास्त्रामध्ये खगोलीय निर्देशांक प्रणालीमधील विषुववृत्तीय निर्देशांक आणि क्रांतीवृत्तीय निर्देशांक सर्वाधिक वापरले जातात. हे निर्देशांक वसंतसंपात बिंदूच्या स्थानावर अवलंबून आहेत, जो स्वतःच पृथ्वीच्या परिवलन अक्षाची दिशा आणि पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेवर अवलंबून आहे. पृथ्वीच्या अक्षाची दिशा अयनामुळे (प्रिसेशनमुळे) हळूहळू बदलत असते. त्यामुळे निर्देशांक प्रणाली स्वतःच बदलतात आणि अशाप्रकारच्या अमर्याद प्रणाल्या असू शकतात. म्हणून खगोलशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या निर्देशांक प्रणालीला एखाद्या तारखेचा संदर्भ असणे गरजेचे असते.

निर्देशांक प्रणालीचे युग सारखे असणे गरजेचे नसते आणि प्रत्यक्षातसुद्धा अनेकवेळा निरीक्षण घेतले जाते तेव्हाचे युग हे निर्देशांक प्रणालीच्या युगापेक्षा वेगळे असते.

एखाद्या निरीक्षणाचा/डेटाचा संदर्भ म्हणून फक्त युग देणे आणि एखाद्या संपाताचा विषुववृत्त किंवा क्रांतीवृतासोबत संदर्भ देणे यातील फरक असा की, युग हे खगोलीय प्राचलांच्या किंमतीची तारीख स्पष्ट करते; आणि एखाद्या तारखेच्या संपाताचा विषुववृत्त किंवा क्रांतीवृत्तासोबतचा संदर्भ हा खगोलीय प्राचल स्वतः ज्या निर्देशांक प्रणालीमध्ये दर्शवले आहेत ती प्रणाली किंवा त्यामधील बदल दर्शवतो.

एखाद्या दिलेल्या तारखेचा संपात विषुववृत्त/क्रांतीवृत्ताच्या सोबतीने कोणती निर्देशांक प्रणाली वापरली जात आहे हे स्पष्ट करतो. आजकाल वापरले जाणारे अनेक मानक निर्देशांक २००० जानेवारी १.५ टीटी (म्हणजे टेरेस्ट्रिअल[मराठी शब्द सुचवा] वेळेप्रमाणे १ जानेवारी २००० रोजी दुपारी १२ वाजता) या वेळेचा संदर्भ घेतात. १९८४ पूर्वी, सामान्यत: १९५० किंवा १९००चा संदर्भ घेणाऱ्या निर्देशांक प्रणाल्या वापरल्या जात होत्या.

निर्देशांक प्रणालीची तारीख आणि स्वतः खगोलीय प्राचलांचे युग सारखे असणे गरजेचे नाही. अशा वेळी डेटासोबत दोन तारखा दिल्या जातात:

एक तारीख प्राचलांचे युग असते, तर दुसरी तारीख निर्देशांक प्रणालीची असते ज्यामध्ये प्राचलांची किंमत दर्शवली जाते.

युग किंवा संपात दर्शवणे[संपादन]

युगं आणि संपात हे वेळेतील काही क्षण असतात, त्यामुळे त्यांना तसेच दर्शवले जाते, जसे इतर क्षणांना दर्शवले जाते. युग आणि संपात दर्शवण्याच्या पुढील काही पद्धती प्रसिद्ध आहेत:

ज्युलियन वर्षे आणि J2000[संपादन]

ज्युलियन वर्ष म्हणजे ज्युलियन दिनदर्शिकेतील एका वर्षाचा सरासरी कालावधी म्हणजे ३६५.२५ दिवस. हा कालावधी स्वतः कोणतेही युग दर्शवत नाही. आजकाल मानक युग "J" या उपसर्गाने दर्शवले जाते आणि त्यापुढील वर्ष हे नेहमिच्या ग्रेगरीय दिनदर्शिकेतील साल आहे. "J2000" म्हणजे १ जानेवारी २००० रोजी दुपारी १२ वाजताचा क्षण.[१]

पूर्वी वेगवेगळे खगोलशास्त्रज्ञ किंवा खगोलशास्त्रज्ञांचे गट त्यांच्या सोयीप्रमाणे वेगवेगळे युग वापरायचे. पण आता आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघामार्फत आंतरराष्ट्रीय सहमतीने मानक युग ठरवले जाते, ज्यामुळे वेगवेगळे खगोलशास्त्रज्ञ जास्त प्रभावीपणे एकमेकांच्या सहयोगाने काम करू शकतील.

सध्या प्रमाण म्हणून वापरले जाणारे "J2000" युग आंतरराष्ट्रीय सहमतीने पुढील गोष्टींशी समतुल्य आहे:

  1. जानेवारी १, २००० या ग्रेगरीय तारखेच्या १२:०० जीएमटी (ग्रीनिच प्रमाणवेळ) वाजता.
  2. ज्युलियन दिनांक २४५१५४५.० टीटी (टेरेस्ट्रिअल वेळ).[२]
  3. १ जानेवारी, २०००, ११:५९:२७.८१६ टीएआय (आंतरराष्ट्रीय आण्विक वेळ).[३]
  4. जानेवारी १, २०००, ११:५८:५५.८१६ युटीसी (जागतिक समन्वित वेळ).[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ See NASA Jet Propulsion Laboratory 'spice' toolkit documentation, function J1900.
  2. ^ Seidelmann, P. K., Ed. (1992).
  3. ^ Seidelmann, P. K., Ed. (1992).
  4. ^ This article uses a 24-hour clock, so 11:59:27.816 is equivalent to 11:59:27.816 AM.