यशवंत चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

कॉम्रेड यशवंत चव्हाण (१९२१- २३ जानेवारी, २०१८) हे एक मराठी स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ कामगार नेते होते. कोल्हापूर संस्थानातील चव्हाण यांचा जन्म. त्या संस्थानात त्यांचे वडील रावबहाद्दूर चव्हाण हे न्यायाधीश होते. पण यशवंत हे संस्थानविरोधी चळवळीत सक्रिय होते. तरुणपणीच त्यांचा संघर्ष सुरू झाला.[ संदर्भ हवा ]

भारतात स्वातंत्र्य चळवळीने वेग घेतला असतानाच कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. रशियन राज्यक्रांतीनंतर साम्यवादाकडे आकर्षित होऊन यशवंत चव्हाण भारतीय कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले. चलेजाव आंदोलनात सहभागी व्हावे की नाही, यावरून कम्युनिस्ट पक्षात मतभेद निर्माण झाले होते. चलेजाव आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या काही नेत्यांसह कॉ. चव्हाण यांना १९४२ मध्येच भारतीय कम्युनिस्ट पक्षातून पडावे लागले. ‘चलेजाव’ चळवळीत सक्रिय भाग घेतल्यामुळे काही काळ त्यांना भूमिगत राहावे लागले. पक्षाची भूमिका वास्तवापासून फारकत घेणारी असेल किंवा जनभावनेची दखल घेणारी नसेल, तर त्याविरोधात स्पष्टपणे बोलणारी, भूमिका घेणारी माणसे फार कमी असतात. त्यातील श्रमिकांच्या चळवळीत अग्रभागी असणारे आणि वास्तववादी राजकीय भूमिका घेणारे, पुरोगामी - डाव्या विचारांची पाठराखण करणारे कॉ. यशवंत चव्हाण हे एक होते.[ संदर्भ हवा ]

पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला. चव्हाण यांना नेमस्त नेते मानले जायचे. केंद्रीय नेत्यांची मने वळवून हा प्रश्न सोडवावा, अशी त्यांची भूमिका आक्रमक नेत्यांना पसंत पडली नव्हती. डॉ. आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा मिळविण्यासाठी ज्या नेत्यांनी प्रयत्न केले, त्यात यशवंत चव्हाणही होते.[ संदर्भ हवा ]

कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडल्यानंतर चव्हाण यांनी नवजीवन संघटना, सेवा श्रमिक संघ, एनटीयूआय (न्यू ट्रेड युनियन इनिशिएटिव्ह) या कामगार संघटनांची स्थापना केली. लाल निशाण या पक्षाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. गिरणी कामगार संपातही सहभाग असल्याने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.[ संदर्भ हवा ]

राजकीय पक्षात असूनही त्यांनी रस्त्यावरच्या चळवळीला, जनआंदोलनाला महत्त्व दिले. १९७८ चा सरकारी कर्मचाऱ्यांचा संप असो की १९८२ चा गिरणी कामगारांचा संप, कॉ. चव्हाण कामगारांच्या आंदोलनात अग्रभागी राहिले. राजकीय भूमिका घेतानाही त्यांनी वास्तवाचाच विचार केला. १९९० च्या मंडल आणि राम मंदिराच्या आंदोलनाने भारतातील राजकारणाने वेगळेच वळण घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भाजपचे बळ वाढू लागले, त्या वेळी प्रतिगामी-जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी सर्व पुरोगामी- डाव्या- आंबेडकरवादी पक्षांनी काँग्रेसच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी, महाराष्ट्रात मात्र धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेऊन त्यांनी काँग्रेसशी अनेकदा निवडणूक समझोता केला. त्यामुळे लाल निशाण पक्षातही मतभेद झाले.[ संदर्भ हवा ]

यशवंत चव्हाण यांनी स्थापलेला लाल निशाण पक्ष त्यांनीच २०१७ साली १८ ऑगस्टला जाहीरपणे भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये विलीन केला व आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्य प्रवाहात ते सामील झाले. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पुरोगामी, धर्मनिरपेक्ष व समतावादी विचारांची बांधिलकी सोडली नाही.[ संदर्भ हवा ]