Jump to content

माती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मृदा या पानावरून पुनर्निर्देशित)
मातीचे वेगवेगळे स्तर

मृदा म्हणजे माती नव्हे. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्म जीव मृदेमध्ये असतात. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये त्यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. याउलट माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो तर कुंभार माती या परिसंस्थेचा वापर करतो. मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदानिर्मिती होते.

माती ही वेगवेगळे खनिज, सेंद्रिय वस्तू, वायू, तरल पदार्थ व अगणित सूक्ष्म जीवांचे मिश्रण असते, जे एकत्रितपणे पृथ्वीवरच्या जीवनास सहाय्यीभूत होतात. नैसर्गिकरित्या असणाऱ्या मातीची चार प्रमुख कार्ये आहेत. ती वनस्पती उगविण्याचे व वाढीचे एक माध्यम आहे. ती पाण्याचे धारण, पुरवठा व शुद्धी करते. पृथ्वीच्या वातावरणात ती बदल घडवून आणते. ती जीवांचे वसतीस्थान आहे, हे सर्व प्रकार सरतेशेवटी मातीत बदल घडवून आणतात. मातीचे प्रकार रेगुरमृदा, तांबडी मृदा, काळी मृदा इ प्रकार आहेत. मातीस पृथ्वीची त्वचा म्हणतात. तसेच ही एक घन, वायू व पाणी(तरल पदार्थ) धरून ठेवण्याची एक त्रिस्तरीय प्रणाली समजल्या जाते.

मृदानिर्मितीसाठी आवश्यक घटक

[संपादन]
  • मूळ खडक : प्रदेशातील मूळ खडक हा मृदानिर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. प्रदेश्याच्या हवामानानुसार आणि खडकांच्या काठीण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदा. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील बेसौल्त या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला ‘रेगुर मृदा ’ असे म्हणतात. दक्षिण भारतातातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून ‘तांबडी मृदा ’ तयार होते.
  • प्रादेशिक हवामान : मृदानिर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. मूळ खडकाचे विदारण होणे, हा मृदानिर्मितीतील पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रिया ही प्रदेश्याच्या हवामानावर ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता तरावते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. उदा, सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. तेथे बेसौल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जम्भी मृदा तयार होते. हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या नियमित मृदेपेक्षा वेगळा आहे.
  • जैविक घटकः खडकांचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो; परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भूग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते, हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात.वनस्पतींची मुळे,पालापाचोळा ,प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात ,तसेच  त्यांचे विविध जीवान्मार्फात विघटन होते. उदा गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या. अशा विघटीत झालेल्या जैविक पदार्थास ‘ह्युमस’ असे म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल, तर मृदा सुपीक असते. अनेक जीवन्मार्फात विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळेच अलीकडे गांडूळखतनिर्मितीचे प्रयोग मोठया प्रमाणात केले जातात.
  • कालावधी : मृदानिर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेमध्ये मूळ खडकाचे विदारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदानिर्मितीचा कालावधी मोठा असतो. उच्च दर्ज्याच्या मृदेचा कालावधी २.५ सेमीचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. त्यामानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदानिर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त लागतो. निसर्गाकडून मिळालेली ‘मृदा’ एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, किटकनाशके यांचा वापर केला जातो, त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते.


मृदेचे प्रकार

[संपादन]
  1. शी करणारी मृदा : विदारण क्रिया व कमी पाऊस याच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो. पठाराच्या पश्चिम भागात घात माथ्यावर ही मृदा आढळते. उदा. अजंठा, बाळघाट व महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते.
  2. काळी मृदा : रेगुर किवा काळी कापसाची मृदा व भाभर या नावाने देखील ही मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नद्यांच्या खोऱ्यांमधील गाळाची मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अती काळी मृदा तर पूर्वभागात मध्यम काळी मृदा आढळते. दिसायला काळी असली तरी या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते.
  3. जांभी मृदा : सह्याद्रीच्या पश्चिम कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकाचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायुशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून ही मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो.
  4. किनारपट्टीवरील गाळाची मृदा : कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु वेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झालेली आहे. उदा. धरमतर, पनवेल इत्यादी परिसर.
  5. पिवळसर तपकिरी मृदा : अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते. त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. चंद्रपूर, भंडार्याचा पूर्वभाग व सह्याद्रीचा पर्वतीय भागात ही मृदा आढळते.

मृदा धूप व अवनती

[संपादन]

मृदा अवनती

[संपादन]

मानवीय आणि नैर्सगिक घटकामुळे मृदा अवनती होते. जंगलतोड, अतिचराई, रासायनिक खते व किटकांचा अतिवापर, भूस्खलन, पूर इ. होय.

मृदा अवनती रोखण्यासाठी काही पद्धती

  • १.पाचरण
  • २.दगडी बांध
  • ३.टेरेस फार्मिंग
  • ४.आंतर पिके
  • ५.शेल्टर बेल्ट

मृदा वर्गीकरण

[संपादन]

१.गाळाची मुदा

२.काळी मृदा

३.तांबडी मृदा

४.लॅटारेट मृदा

५.वन मृदा

६.शुष्क मृदा