Jump to content

मिस्टर अँड मिसेस (नाटक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

'मिस्टर ॲन्ड मिसेस' हे नाटक म्हणजे रिॲलिटी शो आता कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात किती आणि कशी ढवळाढवळ करू शकतात, त्याचे उत्तम उदाहरण आहे. या शोजमध्ये पैसा भरपूर मिळतो आणि र‌िॲलिटीच्या नावावर अनेकदा खोटरडेपणाही केला जातो हे मान्य असले, तरी या र‌िॲलिटी शोजनी मानवी नात्यांचा बाजार मांडला आहे हेही तितकेच खरे आहे. मुख्य म्हणजे पैसा मिळाला की माणूस स्वतःलाही कसा आणि किती विकू शकतो, त्याचेही हे उदाहरण आहे. 'मिस्टर ॲन्ड मिसेस' नाटकाचा नायक असलेला अम‌ित (चिन्मय मांडलेकर) स्वतःला असाच विकतो.

अम‌ित आणि प्रिया (मधुरा वेलणकर-साटम) नवरा-बायको. अमित कधीकाळी मालिका-सिनेमांतला नावाजलेला ॲक्टर, पण स्वतःच्या गुर्मीमुळेच मार्केटमधली पत घालवून बसलेला. परिणामी घराला प्राप्त झालेली आर्थिक दुरावस्था प्रिया आपल्या बँकेतल्या नोकरीने मनापासून सावरू पाहते आहे. पण एकाचे निष्क्रियपण आणि दुसऱ्याचे सक्रियपण यामुळे त्यांच्यात सतत वाद होतात. प्रियाचा स्वाभाविक कल अमितला सांभाळून घेण्याकडे असला तरी अमितला फक्त पैसा कमवायचा आहे. अमित अशा एका संधीच्या शोधात असतानाच, त्याच्या या नाजूक अवस्थेचा नेमका फायदा मालिका प्रोड्यूसर असलेला त्याचा मित्र अश्विन (प्रियदर्शन जाधव) उचलतो. अश्विनने फेकलेल्या रिॲलिटी शोच्या जाळ्यात पैशाच्या हव्यासापायी अमित अलगद अडकत जातो, त्यासाठी बायकोच्या नकळत तिला आणि आपल्या नात्यालाही पणाला लावतो.

हा रिॲलिटी शो थेट घटस्फोटाचा असतो.. आणि जरी संसारात खटके उडत असले, तरी प्रिया घटस्फोट देणार नाही, हे अमित आणि अश्विनलाही ठाऊक असते. म्हणूनच तिला अंधारात ठेवून तिच्याच घरात घटस्फोटाच्या रिॲलिटी शोचा सापळा रचला जातो. रिॲलिटी शो मागची 'रिॲलिटी' या नाटकात छान बघायला मिळते. संवादांपासून नेपथ्यापर्यंत रिॲलिटी शोचा माहोल उभा करण्यात नाटककार-दिग्दर्शक आणि नेपथ्यकार यशस्वी ठरले आहेत.

अमितच्या आधीचे जुनाट घराचे रूप रिॲलिटी शोसाठी बदलावे लागते. 'बिग बॉस'सारखा खरोखरचा स्टुड‌िओ असावा, असाच परफेक्ट नजारा वालावलकर यांनी घराला दिला आहे. पण केवळ नेपथ्यच नाही, तर 'मिस्टर ॲन्ड मिसेस' नाटकात काम करणाऱ्या कलावंतांनीही नाटकातला आशय अधिक उठावदार केला आहे. चिन्मय मांडलेकर यांनी अभिनेता असलेल्या अमितची भूमिका चोख बजावली आहे. अभिनेत्याचा पीळ, नाटकीपणा आणि सोंगीपणाही त्यांनी आपल्या अभिनयात अचूक पकडला आहे. क्वचित प्रसंगांतली अगतिकताही त्यांनी छान व्यक्त केली आहे. मुख्य म्हणजे भूमिकेची गरज म्हणून त्यांनी केलेल्या थोड्या लाऊड अभिनयाला मधुरा वेलणकर-साटम यांच्या संयत अभिनयाची उत्तम जोड मिळाली आहे. अनेकदा नाटकाचा तोल सांभाळण्यासाठी अभिनयाचा पोतही सांभाळावा लागतो. हा पोत चिन्मय आणि मधुरा यांच्या अभिनयातून नेमका साधला गेला आहे. एकदाही आक्रस्ताळी अभिनयाचा आधार न घेता, मधुरा यांनी प्रत्येक वेळी संयतपणा दाखवलाय. त्यामुळे अमितचा उथळपणा जेवढा प्रेक्षकाच्या मनावर ठसतो, तेवढीच प्रियाची मॅच्युरिटी. चिन्मय आणि मधुराव्यतिरिक्त नाटकात अश्विनची महत्त्वाची भूमिका करणारे प्रियदर्शन जाधव यांनीही भूमिका छान निभावली आहे. रिॲलिटी शो करणाऱ्यांचा बेरकीपणा त्यांनी अचूक पकडला आहे. याशिवाय अनिरुद्ध जोशी, यशश्री उपासनी, सुधीर श्रीधर, अमित नंदा, नम्रता कदम यांच्याही भूमिका छान झाल्या आहेत.

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस या नाटकाची निर्मिती : ऋजुता प्रॉडक्शन आणि अथर्व. नाटकाचे लेखक : अस्लम परवेझ, नीलेश रूपापारा. दिग्दर्शक : प्रियदर्शन जाधव नेपथ्य : प्रसाद वालावलकर. संगीत : ऋषिकेश कामेरकर. नाटकाची प्रकाश यंत्रणा : भूषण देसाई. नाटकातील कलावंत : चिन्मय मांडलेकर, मधुरा वेलणकर-साटम, प्रियदर्शन जाधव, अनिरुद्ध जोशी, यशश्री उपासनी, हरीश कस्पटे आणि अमित नंदा.

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस या नाटकाचा १११वा प्रयोग २४ ऑगस्ट २०१४ रोजी होणार आहे. पहिला प्रयोग ११ जानेवारी २०१४ रोजी झाला होता.