मा.कृ. पारधी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. माधव कृष्ण पारधी (जन्म : सावनेर, १८ डिसेंबर, इ.स. १९२० किंवा १६-१२-१९१९? - ) हे एक मराठी लेखक आणि समीक्षक आहेत. त्यांचा मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषांचा सखोल अभ्यास आहे. मुंबईचे दैनिक नवशक्ति, पुण्याचे सकाळ आणि हेराल्ड व दिल्ली येथील आकाशवाणीचा वृत्तसेवा विभाग येथे त्यांनी काम केले. ते ‘केंद्रीय माहिती सेवा’चे सदस्य होते. इ.स. १९७८मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतरही पारधी यांचे वृत्तपत्रीय समीक्षालेखन २०१६ सालीसुद्धा चालू आहे.

मा.कृ. पारधी यांचा जन्म सावनेर येथे एका गरीब घराण्यात झाला. बालपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे अतिशय आर्थिक हलाखीत, आई मंजुळाबाईने मोलमजुरी करून माधवला मॅट्रिकपर्यंत कसेबसे शिकविले. पुढील शिक्षण घेणे आर्थिक परिस्थितीमुळे कठीणच होते. सावनेरच्या भालेराव प्रशाळेत मॅट्रिकला पहिले आले. विद्यार्थिदशेपासूनच त्यांना साहित्य/संगीत व नाटकाची आवड होती. त्यांच्यातील सुप्त गुण ओळखून ताराबाई बुटी, शालेय मित्र मनोहर खेडकर, अनंत पटवर्धन यांसारख्या सुहृदांनी मदतीचा हात दिला.

नागपूरला कुणीही नातलग किंवा ओळखीचे नव्हते. अशा परिस्थितीत लेखक, पत्रकार, साहित्यिक व तरुण भारतचे संपादक ग. त्र्यं. माडखोलकर यांनी त्यांना आपला मानसपुत्र मानले. दिवसा कॉलेज व रात्री तरुण भारतात काही वेळ नोकरी, असे करीत कॉलेजचे शिक्षण केले. माडखोलकरांच्या सान्निध्यात राहिल्याने त्यांच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळाला.

त्यानंतर पुढील शिक्षणासाठी पारधी यांनी मुंबई गाठली. मुंबईसारख्या महानगरात शिक्षणासोबतच लेखन/नाटकांच्या तालमी करून ते रात्री पु. रा. बेहेरेंच्या ‘नवशक्ती’त काम करीत असत. मनमिळावू स्वभाव व सुप्त गुणांमुळे केशवराव दाते, दाजी पणशीकर, विजय तेंडुलकर, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, डॉ. अंजना मगर इ. मान्यवरांसोबत त्यांची मैत्री झाली. नंतर मात्र नोकरीनिमित्ताने दिल्लीला गेले व दिल्लीतच रमून गेले. कठोर परिश्रम व कुठल्याही नवीन गोष्टीची जिज्ञासा असल्यामुळे ते रागदारी व संगीताकडे वळले. पहाटे उठून तंबोर्‍याच्या तारा छेडत रियाझ करू लागले.

मा.कृ. पारधी यांनी दिल्ली येथील वास्तव्यात २७ वर्षे रंगभूमीवर नट म्हणून कारकीर्द केली.

वयाच्या ५०व्या वर्षी त्यांची पुण्याला बदली झाली. येथे त्यांनी भा.कृ. केळकर यांच्या साहाय्याने महाराष्ट्र सरकारला माहितीकेंद्र स्थापून दिले.

महाराष्ट्र रंगायतनमधे हिंदी/मराठी नाटके, कथ्यक नृत्याकरिता परीक्षक म्हणून त्यांना बोलावीत असत. सेवानिवृत्त झाल्यावर महराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळात मानसेवी संपादक म्हणून त्यांनी काही दिवस काम केले.

कौटुंबिक[संपादन]

कुसुमताई भिलवडीकर (माहेरचे नाव) यांच्याशी पारधींचा प्रेमविवाह झाला.

मा.कृ. पारधी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • इंडिया सिन्स इन्डिपेन्डन्स (अनुवादित)
  • भारतीय वाद्ये (अनुवादित, मूळ लेखक - बी चैतन्यदेव)
  • भारतीय सैन्याच्या परंपरा
  • मारवा (कवितासंग्रह)
  • मी परत येईन (कथासंग्रह)
  • मुसलमानी अमदानीत संगीत
  • सार्थवाह (अनुवादित, मूळ लेखक - मोतीचंद्र)
  • स्वातंत्र्याचा लढा (अनुवादित, मूळ लेखक - अमलेश त्रिपाठी, वरुण डे, बिपिनचंद्र)

पारधी यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • ‘मी परत येईन’ या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार
  • शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सन्मान (६-९-२०१६)