मानकरकाका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

कृष्णा लक्ष्मण मानकर ऊर्फ मानकरकाका (जन्म : भायखळा, मुंबई, इ.स.१९३८; - मुलुंड, मुंबई), २८ नोव्हेंबर, इ.स. २०१५) हे एक मराठी चित्रकार असून टॉनिक या मुलांच्या दिवाळी अंकाचे संपादक होते.

सुरुवातीला टॉनिक हा हस्तलिखित कृष्णधवल स्वरूपात काही महिने आला. मुलांमधील सुप्‍त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी हा प्रयत्‍न केला होता. कथा, कविता, मुलांनी काढलेली चित्रे हे या अंकाचे बलस्थान होते.

ते रेल्वेतील प्रवास, कार्यक्रम, संमेलन अशा अनेक ठिकाणी ते रेखाचित्रे काढीत असत. ज्याचे चित्र काढले अद्सेल त्याला टॉनिकचा दहा रुपयांचा अंकही भेट देत असत.

टॉनिक[संपादन]

मानकरकाका यांच्यावर साने गुरुजींच्या विचारांचा पगडा होता. या प्रभावातूनच त्यांनी मुलांवर संस्कार व्हावेत या दृष्टिकोनातून १९७९पासून ‘टॉनिक’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यास सुरुवात केली. एकूण ३६ वर्षे अथकपणे ‘टॉनिक’ या दिवाळी अंकाचे त्यांनी वेळोवेळी पदराला खार लावून आणि वेळ पडल्यावर बायकोचे दागिने विकून नियमित प्रकाशन केले.

’टॉनिक’च्या अंकाचा दर्जा आणि छपाईबाबतही मानकरकाका काटेकोर असत. वेगवेगळे विषय अत्यंत कल्पकतेने त्यांनी ‘टॉनिक’मधून हाताळले. चित्रकला नसानसात भिनलेल्या या कलावंताने "टॉनिक‘च्या अंकात एखाद्या विषयावरील विशेषांक काढताना त्यांनी अनेक प्रयोग केले.लेखकांकडून साहित्य आणण्यासाठी ते लांबचाही प्रवास आनंदाने करीत. अंकाचे गठ्ठे स्वतः वाहत असत. एवढे करूनही अंक नुकसानीतच जात असे; पण त्याची फिकीर न करता पुढच्या वर्षी त्याच उत्साहाने मानकरकाका नव्या अंकाची जुळवाजुळव करीत.

'टॉनिक'च्या स्थापनेपासून त्या अंकाच्या सजावटीचे तसेच ते छपाई करून विकण्यापर्यंतची सगळीच कामे मानकरकाका स्वतःच करत सत. दोन खांद्यावर 'टॉनिक'चे अंक असलेल्या दोन झोळया घेऊन काकांनी अनेक वर्षे मुंबई-ठाण्यातील अनेक जुन्या इमारतींचे जिने झिजविले आहेत. मुलांसाठी जे मी छापतो, जे मी निर्माण करतो ते त्या मुलांपर्यंत पोहोचलेच पाहिजे असा त्यांचा कायम अट्टहास असे. पुढील काळात परवडत नसले तरी 'टॉनिक' हा रंगीतच निघाला पाहिजे हा त्यांचा हट्ट होता.

मानकराकाकांची निरलस वृत्ती आणि प्रामाणिकपणा बघूनच डॉ. जयंत नारळीकर ते डॉ. विजया वाड अशा अनेक मान्यवरांनी त्यांच्या अंकासाठी कित्येक वर्षे आवर्जून लेखन केले.

मानकरकाकांचे शिष्य[संपादन]

मानकरकाकांचे राज कांबळे, श्रीकांत पाटील आदीं शिष्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार बनले. त्यांची चित्रे लाखोंच्या किमतीत विकत घेतली जातात.

सामाजिक कार्य[संपादन]

भारदस्त आवाज आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले मानकरका कलावंत आहेत, हे सहज जाणवायचे. चित्रकला, साहित्य आणि लहान मुले ही त्यांची आवड. कलाशिक्षक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची गोडी लागावी यासाठी ‘बालनुक्कड’सारख्या स्पर्धा ठिकठिकाणी त्यांनी भरवल्या. यासाठी खूप पायपीटही केली. उत्कृष्ट चित्रांना ते पारितोषिकही देत होते. साहित्यिक चंद्रकांत खोत, दादा गावकर हे त्यांचे गुरू होते. कामगारांच्या मुलांसाठी स्थापन झालेल्या व झटणार्‍या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ या संस्थेसाठी काकांनी ६० वर्षे काम केले.

मुलांसाठी ‘टॉनिक’ नावाचे दैनिकही त्यांनी सुरू केले, मात्र तो प्रयोग फार काळ चालला नाही.

दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेशीही मानकर काका जोडलेले होते. ‘कथाकृष्ण कला केंद्रा’च्या माध्यमातून त्यांनी त्यांची पत्‍नी कथा मानकर यांच्या मदतीने ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ आदी नाटके सादर केली.

लेखन[संपादन]

  • देवचार (आत्मचरित्र)
  • पु.ल. देशपांडे यांच्या ‘वयम् मोठम् खोटम्’ या एकांकिकेचा हिंदी अनुवाद

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • ’टॉनिक’च्या दिवाळी अंकांना ३६ वर्षांत ५६ पुरस्कार मिळाले.
  • मानकरकाकांच्या आठवणी सांगणारे ’मानकरकाका’ हे पुस्तक बोरीवलीच्या ’फुलराणी’ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. पुस्तकाचे लेखन काकांचे विद्यार्थी राज कांबळे आणि टॉनिक परिवारातील लेखकांनी आणि चित्रकारांनी केले आहे. डॉ. वीणा सानेकर व राजेश दाभोळकर या लेखसंग्रहाचे संपादक आहेत.