Jump to content

महाराष्ट्रातील राज्य नाट्य स्पर्धा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र सरकार गेल्या कित्येक वर्षांपासून (इ.स. १९६१ पासून) राज्यातील सर्व कलांचे जतन, संवर्धन व त्यांमध्ये संशोधन करण्यासाठी नाट्य, साहित्य, नृत्य, संगीत, लोककला, दृक्‌कला व चित्रपट या कलांना समृद्ध आणि सक्षम करण्याचे व कलावंतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ निर्माण करून सन्मान देण्याचे कार्य करीत आहे.

त्यासाठी महाराष्ट्रात गावापासून शहरापर्यंत सर्व स्तरांवर सर्व कलांची शिबिरे, महोत्सव, स्पर्धा असे सांस्कृतिक उपक्रम जोमाने सादर केले जातात. त्यांतील सर्वांत आगळावेगळा उपक्रम म्हणून या दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धेकडे पाहिले जाते. विशेषतः हौशी नाट्य, बालनाट्य, संगीत नाटक, संस्कृत नाटक, हिंदी नाटक व व्यावसायिक नाटके इतक्‍या व्यापक प्रमाणात आयोजित होणारी ही गौरवसंपन्न स्पर्धा आहे.

प्राथमिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रात अनेक (सुमारे २०) केंद्रे असतात.

पूर्वी या स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र सरकारच्या समाजकल्याण विभागामार्फत करण्यात येत असे. त्या विभागाला या स्पर्धेचे फारसे देणघेणे नव्हते. त्यामुळे बदल करून हल्ली या स्पर्धा सांस्कृतिक विभागातर्फे घेण्यात येतात.

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा

[संपादन]

हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील सहभागातील संख्येमुळे त्या प्राथमिक आणि अंतिम अशा द्विस्तरीय घेतल्या जातात. सांस्कृतिक संचालकाने वेळोवेळी नियमात बदल केले. त्यामुळे कधीकधी स्पर्धेच्या मूळ उद्देशालाच बगल दिली गेली होती. उदाहरणार्थ, नवीन नाट्यसंहिता असली पाहिजे ही अट अनिवार्य करण्यात आली. त्यामुळे जुनी अभिजात नाटके बाद झाली. नवीन नाट्यसंहितेच्या अनुपलब्धतेमुळे स्पर्धकांची संख्या रोडावली. त्यामुळे पुढे हा नियम रद्द करण्यात आला.

स्पर्धेच्या नियमावलीतील विविध त्रुटींमुळे यापूर्वी पाच-सहा संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याची उदाहरणे आहेत. आता या हौशी मराठी नाट्यस्पर्धांचे आयोजन जिल्हा प्रशासन, हे स्थानिक नाट्यसंस्थेच्या सहकार्याने करीत आहे.

अंतिम स्पर्धेतील मराठी नाटकांचा दर्जा सुधारण्याबाबत शासनाने दिवंगत नाटककार प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने प्राथमिक, विभागीय, अंतिम अशी त्रिस्तरीय स्पर्धा घेण्याची सूचना व नागरी, अनागरी स्पर्धा गट बंद करण्याची सूचना केली होती.

पूर्वी प्राथमिक व विभागीय स्पर्धा विजेत्यांसाठीचा पारितोषिक वितरण समारंभ विभागीय पातळीवरच घेण्यात येत असे. त्यामुळे स्पर्धकांना अंतिम स्पर्धेतील विजेती नाटके पाहता येत नसत. इतर विभागातील नाट्य कलावंतांच्या भेटी विचारांचे आदानप्रदान त्यामुळे थांबले होते. आता एकाच कार्यक्रमात सर्व अंतिम नाटके सादर केली जातात. त्यामुळे कलावंतांना त्या सर्व कलाकृती पाहता यतात. अंतिम बक्षीसविजेत्या नाटकाच्या प्रयोगांचे महाराष्ट्रभर चार विभागांत सादरीकरण करणे बंधनकारक आहे.

हौशी आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धांमध्ये दुजाभाव केला जात असल्याची नाट्यसंस्थांची अजूनही तक्रार आहे. व्यावसायिक नाटकांना मोठ्या रकमा पारितोषिक म्हणून दिल्या जातात. तर हौशी नाटकांना मात्र अत्यंत कमी रक्कम दिली जाते. त्यामुळे हौशी नाट्य कलावंतांमध्ये नाराजी दिसून येते.

२०१२ हे साल या राज्य नाट्य स्पर्धेचे ५२वे वर्ष होते.

महाराष्ट्र राज्य व्यावसायिक नाट्य स्पर्धा

[संपादन]
२५व्या महाराष्ट्र राज्य अंतिम मराठी व्यावसायिक स्पर्धेचे एप्रिल २०१३मध्ये लागलेले निकाल
  • प्रपोझल (रंगमंच, रंगनील या संस्थेचे नाटक) या नाटकाला पाच लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले. नाटकाचे दिग्दर्शक राजन ताम्हाणे, नेपथ्यकार व प्रकाशयोजनाकार प्रदीप मुळ्ये, वेशभूषाकार गीता गोडबोले व संगीत दिग्दर्शक राहुल रानडे यांनाही प्रथम पारितोषिक जाहीर झाले.
  • टॉम अँड जेरी (अश्वमी थिएटर्स व अद्वैत थिएटर्स यांचे नाटक) या नाटकाला तीन लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
  • सुखान्त या नाटकाला दोन लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.
  • अभिनयासाठी रौप्यपदक व २५ हजार रुपये रोख ज्यांना मिळाले असे पुरुष अभिनेते (कंसात नाटकाचे नाव) : प्रसाद ओक (बेचकी), मंगेश कदम (लहानपण देगा देवा), डॉ. अमोल कोल्हे (प्रपोझल), मोहन जोशी (सुखान्त) आणि निखिल रत्नपारखी (टॉम अँड जेरी).
  • अभिनयासाठी रौप्यपदक व २५ हजार रुपये रोख ज्यांना मिळाले असे स्त्री अभिनेते (कंसात नाटकाचे नाव) : कादंबरी कदम (टॉम अँड जेरी), सुकन्या कुलकर्णी (फॅमिली ड्रामा), नेहा जोशी (बेचकी), नंदिता धुरी (सुखान्त) आणि अदिती सारंगधर (प्रपोझल).
२४व्या महाराष्ट्र राज्य अंतिम मराठी व्यावसायिक स्पर्धेचे जून २०१२मध्ये लागलेले निकाल
  • मी रेवती देशपांडे (श्री चिंतामणी या संस्थेचे नाटक) या नाटकाला पाच लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले.
  • लग्नबंबाळ (शुभम स्पर्श संस्थेचे नाटक) या नाटकाला तीन लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.
  • इदं न ममं अर्थात हे माझे नव्हे (गणरंग या नाट्यसंस्थेचे नाटक) या नाटकाला दोन लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.
  • अभिनयासाठी रौप्यपदक व २५ हजार रुपये रोख ज्यांना मिळाले असे पुरुष अभिनेते (कंसात नाटकाचे नाव) : आनंद इंगळे (लग्नबंबाळ), मोहन जोशी (मी रेवती देशपांडे), शैलेश दातार (बॅरिस्टर), संजय शेजवळ (प्रिया बावरी)आणि गिरीश साळवी (लव्ह बर्ड्‌स).
  • अभिनयासाठी रौप्यपदक व २५ हजार रुपये रोख ज्यांना मिळाले असे स्त्री अभिनेते (कंसात नाटकाचे नाव) : रेश्मा गोखले (मी रेवती देशपांडे),नंदिता धुरी (इदं न ममं अर्थात हे माझे नव्हे), इला भाटे (बॅरिस्टर), मधुर वेलणकर (लग्न बंबाळ) आणि अमृता सुभाष (लव्ह बर्ड्‌स).
  • यांशिवाय दिग्दर्शनासाठी विजय केंकरे (लग्न बंबाळ), कुमार सोहोनी (मी रेवती देशपांडे), प्रदीप राणे ( इदं न ममं अर्थात हे माझे नव्हे); नाट्यलेखनासाठी शेखर पाटील (मी रेवती देशपांडे), मधुगंधा कुलकर्णी (लग्न बंबाळ), प्रदीप राणे (इदं न ममं अर्थात हे माझे नव्हे); नेपथ्यासाठी प्रदीप मुळ्ये (सुखाशी भांडतो आम्ही), नितीन नेरूरकर (मी रेवती देशपांडे), राजन भिसे (लग्न बंबाळ); प्रकाश योजनेसाठी कुमार सोहोनी (मी रेवती देशपांडे), गिरीश जोशी (लव्ह बर्ड्‌स), संजय कोळी आणि गुरू राऊत (प्रिया बावरी); संगीतासाठी राहुल रानडे (मी रेवती देशपांडे), वामन केंद्रे (प्रिया बावरी), नरेंद्र भिडे (लव्ह बर्ड्‌स); वेशभूषेसाठी संध्या साळवे, गीता गोडबोले, तेजश्री आकरे यांना आणि रंगभूषेसाठी कृष्णा बोरकर, सचिन जाधव, संतोष पेडणेकर यांना पारितोषिके मिळाली.