Jump to content

क्रॉफर्ड मार्केट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महात्मा ज्योतिबा फुले मंडई या पानावरून पुनर्निर्देशित)

क्रॉफर्ड मार्केटची इमारत ही मुंबईतील ब्रिटिश काळात जनतेच्या दैनंदिन गरजेसाठी बांधल्या गेलेल्या इमारतींपैकी एक आहे. आर्थर क्रॉफर्ड हे मुंबई महापालिका आयुक्त असताना, त्यांच्याच कल्पकतेतून इ.स. १८६५ ते १८७१ या काळात ही इमारत बांधली गेली. ही इमारत गॉथिक शैलीच्या बांधकामाचा एक उत्तम नमूना आहे. स्वातंत्र्योत्तर काळात या मंडईचे महात्मा जोतिबा फुले मंडई असे नामकरण झाले असले तरी अजूनही क्रॉफर्ड मार्केट याच नावाने ती ओळखली जाते.

Crawford_Market

त्रिकोणी आकाराच्या २.२५ हेक्टर म्हणजेच २२४७२ चौरस मीटर क्षेत्रावर क्रॉफर्ड मार्केट उभे आहे. इमारतीसाठी कुर्ला खाणीतील तसेच गुजरातमधील पोरबंदर येथून टिकाऊ दगड आणण्यात आले. या अवाढव्य मंडईच्या बांधकामासाठी त्या काळी रु. १९,४९,७०० इतका खर्च झाल्याची नोंद आहे.

मार्केटच्या मध्यभागी एक सुशोभित कारंजेही होते. त्याचा आराखडा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे तत्कालीन संचालक लॉकवुड किपलिंग यांनी तयार केला होता. तर त्याच्या बांधकामासाठी सर कावसजी जहांगीर या दानशूर पारशी माणसाने देणगी दिली होती.

क्रॉफर्ड मार्केटच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी इमारतीवर भारतीय समाजजीवनाशी आणि संस्कृतीशी सुसंगत जी कलात्मक शिल्पे उभारली आहेत त्याचे आराखडे जे.जे. कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवले आहेत.

आजूबाजूच्या कोणत्याही रस्त्याने या मंडईत प्रवेश करणे शक्य असल्याने ग्राहकांना वावरताना अडचणीचे होत नाही. या इमारतीचा मनोरा सुमारे १२८ फूट उंच आहे. त्याच्या मुख्य इमारतीवर घड्याळाचा उंच मनोरा असून त्यावरील घड्याळाचे टोले परिसरात ऐकू येण्यासाठी त्यात ६०० किलोग्रॅम वजनाची प्रचंड घंटा बसवण्यात आली होती.

या इमारतीत ब्रिटिश वास्तुकला-तंत्रज्ञान आणि स्थानिक हस्तकलेचा मिलाफ जाणवतो. या क्रॉफर्ड मार्केटची इमारत बांधताना मुंबईच्या भौगोलिक स्थितीसह पर्यावरणाचाही विचार केल्याचे लक्षात येते. पावसाच्या उन्हाच्या तीव्रतेपासून रक्षण करण्यासाठी मार्केटच्या भिंती पुरेशा जाड आहेत. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी छपरे उतरणीची आहेत.

इमारतीला दोन पदरी लोखंडी छत असून ते उंच लोखंडी स्तंभांवर उभे आहे. क्रॉफर्ड मार्केटच्या वास्तूचा आराखडा प्रख्यात ब्रिटिश वास्तुविशारद विल्यम इमर्सन यांनी तयार केला होता. इमारतीच्या कामासाठी प्रामुख्याने लोखंड आणि दगडाचा वापर करण्यात आला आहे.

क्रॉफर्ड मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, धान्य, पाव, लोणची, बिस्किटे, चॉकलेट्स, सुकामेवा, आकर्षक लेखन सामग्री, कटलरी, मसाले, किराणा माल, तंबाखू, पादत्राणे असल्या टिकाऊ-नाशवंत वस्तूंची दिवसभर उलाढाल चालूच असते. शिवाय मांस-मासे यांसाठी एक कोपरा राखून ठेवलेला आहे.