बोडण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोडण विधी

बोडण हा चित्पावन ब्राह्मणांत केला जाणारा एक कुलधर्म, कुलाचार वा धार्मिक विधी आहे.

लग्न, मुंज यांसारखे मंगल कार्य पूर्ण झाल्यानंतर हे व्रत केले जाते. कोकणस्थ ब्राह्मण आपल्या कुळातील चालीप्रमाणे म्हणजेच परंपरेप्रमाणे वार्षिक, त्रैवार्षिक अगर शुभकार्य झाल्यावर बोडण भरतात. बोडण हे शक्यतो मंगळवारी, शुक्रवारी किंवा रविवारी भरतात. चातुर्मास, पौष किंवा चैत्र महिना सोडून हा देवीचा धार्मिक कार्यक्रम एरवी कधीही करता येतो.

तीन किंवा पाच सुवासिनी व एक कुमारिका यांना तेल शिकेकाई देऊन, सुस्नान होऊन सोवळ्याने म्हणजेच रेशमी वस्त्र नेसून सर्व सौभाग्य अलंकार लेऊन येण्यास सांगितले जाते. सर्वांचे पाट गोलाकार मांडून मधोमध एक पाट अगर चौरंग ठेवून ठरावीक पद्धतीचीच रांगोळी काढायची असते. बोडण भरण्यास लाकडी काथवटच लागते. ती चौरंगावर ठेवतात. काथवट नसल्यास हल्ली पितळी/ तांब्याची परात वापरतात. मात्र अशा पराती वापरताना त्या स्वच्छ व कल्हई केलेल्या हव्यात. आल्याबरोबर सुवासिनींची व कुमारिकेची तुळशीपुढे पूजा होते. प्रथम तुळशीची पूजा व नंतर आलेल्या महिलांची व कुमारिकेची गरम पाणी व दूध पायावर घालून ओटी भरतात. त्यानंतर लगेच त्या बोडण भरण्यास बसतात.

आपल्या देवघरातील अन्नपूर्णा काढून ती बोडणाच्या काथवटीत /परातीत ठेवतात तिची पूजा करण्याआधी, प्रथम सुपारीचा गणपती करून त्याची पंचामृताने पूजा करतात. कणीक साखर घातलेल्या दुधात भिजवून तिचे देवीकरिता छोटे छोटे दागिने करतात. त्या कणकेचेच सिंहासन व दुधासाठी हराडेरा करतात. आरतीसाठी कणकेचे पाच छोटे छोटे दिवेही करतात.

देवीची पूजा घरच्या मालकिणीने पंचामृत वापरून करायची असते. देवीभोवती पुरणपोळीवर सर्व पदार्थ वाढून पाच नैवेद्य मांडले जातात. यावेळी नैवेद्यासाठी पुरण घातलेच पाहिजे. नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी दुर्गादेवीची आरती म्हणतात. नंतर ते पाच दिवे काथवटीत/परातीत प्रत्येक नैवेद्याजवळ ठेवतात. घरातील दुसरी बाई चांदीच्या संध्येच्या पळीस साखळी गुंडाळून त्याने दुधाची धार सोडून ते दिवे शांत करते. या पूजेसाठी जसे पुरण हवे तसे एक ते दोन भांडी पंचामृतही (दूध, दही, तूप, मध, साखर) लागते. दिवे शांत झाल्यावर देवीवर प्रत्येकी पाच पळ्या दूध व दही घालतात. नंतर घराची मालकीण सर्वांना बोडणाच्या परातीला हात लावण्यास सांगते. याला बोडण कळवणे म्हणतात. नंतर इतर लोक बोडण कळवण्यास सुरुवात करतात. आधी कुमारिका देवी, पैसा व सुपारी त्या बोडणातून काढते, व नंतर देवीच्या तोंडास पुरण किंवा साखर लावून देवी देवघरात ठेवते. बोडणातले पुरण सवाष्णीच्या हातास लावून त्यांचे हात ’थांबवते’. परातीतील बोडण चमचाभर काढून घेऊन सर्व माणसांना अंगारा म्हणून लावतात. ते बोडण नंतर डब्यात, पातेल्यात घालून गाईस खायला घालतात. ते इतर कोणत्याही जनावरास घालायचे नसते, तसेच टाकून द्यायचे नसते.

बोडण हा धार्मिक कुलाचार चित्पावन ब्राह्मणांत असून इतर कोणत्याही ब्राह्मण पोटजातीत तो आढळत नाही.