Jump to content

बूढानीलकंठ मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बूढानीलकंठ मंदिर
भुइज:सि नारायण
बूढानीलकंठ मंदिर
नाव
भूगोल
देश नेपाळ
जिल्हा काठमांडू
स्थानिक नाव भुइज:सि नारायण
संस्कृती
मूळ आराध्यदैवत विष्णू

बूढानीलकंठ मंदिर हे नेपाळ देशातील काठमांडू जिल्ह्यातील शिवपुरी टेकडीच्या प्रदेशात असलेले हिंदू धर्मातील विष्णू या देवतेचे मंदिर आहे. शिवपुरी टेकडी प्रदेश हा काठमांडू खोऱ्याच्या उत्तरेला आहे. या देवस्थानामुळे आजूबाजूच्या परिसराला देखील बूढानीलकंठ असे म्हटले जाते.[१]

या मंदिरात भगवान महाविष्णूची शेषशायी म्हणजे शेषनागावर निद्रिस्त भलीमोठी आडवी मुर्ती आहे. या मंदिरातील बूढानीलकंठाची मूर्ती ही नेपाळमधील सर्वात मोठी दगडी कोरीव काम मानली जाते. या देवतेस स्थानिक नेपाळी लोक 'भुइज:सि नारायण' असे देखील म्हणतात.[२]

बूढानीलकंठ परिसर
बूढानीलकंठ मंदिराचे प्रवेशद्वार

बूढानीलकंठ मूर्ती[संपादन]

ही मूर्ती चतुर्भुज भगवान नारायणाची असून पैकी मूर्तीच्या एकेका हातात शंख चक्र, गदा, आणि कमळपुष्प आहे. या मूर्तीला विशाल कोरीव मुकुट देखील आहे. ही मूर्ती ज्वालामुखीतुन उत्पन्न महाकाय काळ्या असिताश्म म्हणजे बेसाल्ट खडकात कोरून निर्माण केलेली असून या मूर्तीची लांबी चार मीटर (१६.४ फूट) असून ती ज्या तळ्यात स्थित आहे त्याची लांबी तेरा मीटर (४२.६५ फूट) आहे. लोकरंजनानुसार ही मूर्ती तरंगती आहे. या दाव्याची ठाम पुष्टी जरी झाली नसली तरी या शिळेच्या एका छोट्याशा तुकड्यावरून यात कमी घनता असलेल्या सिलिका या पदार्थाचे अवशेष सापडले आहेत.[२]

याच तलावात इतर देवतांच्या मुर्त्या आणि एक शिवलिंग देखील आहे. तलावाच्या बाजूला सत्तल, पाटी, यज्ञशाळा, होमकुंड आहेत. नेपाळ महात्म्य, हिमावतखंड या ग्रंथात असे सांगितले आहे की बूढानीलकंठ भगवंताची पूजा आणि दर्शन केल्याने धनधान्य संपत्ती प्राप्त होते. तसेच स्त्री व पुत्रापासून सुख व समाधान देखील प्राप्त होते. हे मंदिर हिंदूंसाठी एक पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते परंतु बौद्धांद्वारे देखील तितकेच पूजनीय असून हे नेपाळमधील एक धार्मिक सौहार्दाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.[३]

आख्यायिका[संपादन]

बुधानीलकंठाची मूर्ती खूप जुनी आहे. एका पौराणिक कथेनुसार, एक शेतकरी जोडपे आपले शेत खोदत असताना जमिनीतील मूर्तीच्या पायाच्या बोटाला दुखापत झाली आणि तेथून रक्त देखील निघाले. त्याचप्रमाणे देवमाला वंशावळीतही राजा श्रीशभदेव याने बूढानीलकंठाची स्थापना केल्याचा उल्लेख आढळतो. परंतु त्या राजाने ही मूर्ती जमिनीतून उत्खनन काढून किंवा एखाद्या प्रसिद्ध मूर्तिकाराच्या हाताने निर्माण करून तिची स्थापना केली हे स्पष्ट नाही. विक्रम संवत ३९८ मध्ये राजा मानदेव प्रथम याने अनेक शिवलिंगांची स्थापना केल्याचे सांगितले जाते, परंतु त्यात नीलकंठाचा कोठेही उल्लेख होत नाही.[४]

राजा प्रताप मल्ल (१६४१ -१६७४) यांना बुधानीलकंठाची ही मूर्ती येथून हलवून हनुमानधोकाच्या प्रांगणात ठेवून तिची प्रतिष्ठापना करायची होती. परंतु त्यांना स्वप्नात असा दृष्टांत झाला की ही मूर्ती येथून हलवू नये, तसेच त्यांनी आणि त्यांच्या वारसदारांनी या मूर्तीचे दर्शनही घेऊ नये, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे त्यांनी हनुमानधोका दरबार आवारात बुऱ्हाणीलकंठाची दुसरी मूर्ती बनवली गेली आणि ती मूर्ती आजही हनुमानधोका दरबार आवारात आहे. या काळापासून नेपाळच्या सिंहासनस्थित राजाला बूढानीलकंठाचे दर्शन निषिद्ध मानले जाते.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Ministry of Culture, Tourism and Civil Aviation - Government of Nepal". www.tourism.gov.np. 6 November 2021 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Budhanilkantha, Nepal - Lonely Planet". lonelyplanet.com. 6 November 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Budhanilkantha". sacredsites.com. 6 November 2021 रोजी पाहिले.
  4. ^ a b "Budhanilkantha". Places of Peace and Power.