Jump to content

बाहुबली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाहुबली गोम्मटेश्वर या पानावरून पुनर्निर्देशित)

बाहुबली (कुंभोज) हे जैन धर्मीयांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले या तालुक्याच्या उत्तरेस सात कि. मी. अंतरावर हे स्थान वसले आहे.

बाहुबलीचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. आठव्या शतकात लिहिल्या गेलेल्या आळत्याच्या शिलालेखात आसपासच्या डोंगराचे वर्णन आहे. ते वर्णन बाहुबली डोंगराला पूर्णपणे लागू आहे.

त्यावेळी या डोंगराचे नांव बाहुबली डोंगर नव्हते पण डोंगरावरील जिनप्रतिमा, चैत्यालये यांच्या वर्णनावरून तोच असावा असे दिसते. प्राचीन काळापासून बाहुबलीचा डोंगर जैन मुनींची तपस्याभूमी म्हणून ओळखला जात असल्याचे दिसते. आजही या ठिकाणी आठशे वर्षापूर्वीची ६ फूट उंचीची १००८ भगवान बाहुबलींची अतिशय सुंदर, कलापूर्ण मूर्ती व प्राचीन सहस्र जिनबिंब आपल्या प्राचीनत्वाची साक्ष देत उभे आहेत. ही बाहुबलीची मूर्ती इ.स. ११५६ मध्ये शके १०७८ च्या वैशाख शुद्ध दशमीस श्री १०८ श्रृतसागर मुनिराज यांच्या प्रेरणेने स्थापन झाल्याचा उल्लेख दिगंबर जैन तीर्थक्षेत्र डिरेक्टरीमध्ये मिळतो. सुमारे ३०० वर्षापूर्वी नांद्रे येथील बाहुबली मुनींनी येथे केलेली तपश्चर्या, १९२६ मध्ये तेथे झालेला चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराज यांचा चातुर्मास, धर्मप्रेमी श्री कल्लाप्पा निखे यांनी घातलेला रत्नत्रय मंदिराचा पाया व त्यासाठी बांधलेली दुमजली चिरेबंदी भव्य इमारत या सर्व गोष्टीमुळे या भागात या पहाडाला जैन धर्मियांच्या दृष्टीने वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. बाहुबली नावाचा सिनेमाचा याच्याशी काहीही संबंध नाही.