बारभाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बारभाई हे नारायणराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे आणि दुसरे बाजीराव पेशवे यांच्या सत्ताकाळात त्यांच्या वतीने कारभार पाहणारे बारा व्यक्तींचे मंडळ होते. नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर त्यांच्या गर्भवती पत्नी व होणाऱ्या संततीचे रक्षण करण्यासाठी हे मंडळ एकत्र आले व नंतर त्यांनी कारभार पाहिला.

या मंडळाचे सदस्य खालीलप्रमाणे होते -

 1. नाना फडणवीस
 2. सखारामबापू बोकील
 3. हरिपंत फडके
 4. मोरोबा फडणीस
 5. त्रिंबकराव पेठे
 6. महादजी शिंदे
 7. तुकोजीराव होळकर
 8. भगवानराव पंतप्रतिनिधी
 9. मालोजी घोरपडे
 10. सरदार रास्ते
 11. बापूजी नाईक
 12. फलटणकर

बारभाई कारस्थान[संपादन]

उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ उभा राहिला होता.[१] नारायणरावाच्या हत्येनंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, "रघुनाथरावाला काढून टाकू नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले." यालाच बारभाई कारस्थान म्हणतात.[२] ह्यातच सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेचे प्रमुख म्हणून ठेवावे असे ठरले हो. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असे उघड राजकारण सुरू झा. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली. या लढाईत त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाईला मुलगा झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन १८ मे १७७४ रोजी त्याला पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. यानंतर बारभाईत मोरोबादादा फडणीस, भगवानराव प्रतिनिधी, बाबूजी नाईक, परशुरामभाऊ पटवर्धन, भोसले इ. मंडळींचा समावेश करण्यात आला. रघुनाथराव आणि बारभाई यांच्यात बरेच वर्षे संघर्ष चालू होता. रघुनाथरावाने इंग्रजांशी तह करून त्यांचा आश्रय घेतला. रघुनाथरावाला ताब्यात घेण्यासाठी बारभाईनी इंग्रजांशी १ मार्च १७७९ रोजी पुरंदरचा तह केला.[३]

संदर्भ[संपादन]

 1. ^ Rao, V. D. (1950). "RAMSHASTRI". Proceedings of the Indian History Congress. 13: 302–304.
 2. ^ Gordon, Stewart. The Marathas 1600–1818. Cambridge: Cambridge University Press. ISBN 9781139055666.
 3. ^ Abhang, C.J. (1999). "TWO UNPUBLISHED LETTERS OF HON. JUSTICE RAMSHASTARY PRABHUNE A JUDGE OF THE PESHWA 18TH CENTURY". Proceedings of the Indian History Congress. 60: 465–472.