बाटिक काम
कापडावरील छपाईकामाची एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत. बाटिक हा शब्द ‘टिक’ या जावानीज शब्दापासून आलेला असून त्याचा अर्थ ‘गडद पार्श्वभूमीवरील शुभ्र बिंदू’ असा आहे तर मलायी भाषेत बाटिक म्हणजे ‘मेणविलेपन’ असा त्याचा अर्थ आहे. बाटिककाम हा एक रोध छपाईचा प्रकार असून त्यात रोधद्रव्य म्हणून मुख्यत: मेण वापरण्यात येते. कापडाचा जो नक्षीयुक्त भाग रंगविहीन ठेवावयाचा असेल, त्या भागावर मेणाचे लेपाटन करून तेथे रंगाला प्रतिरोध निर्माण करणे व उर्वरित भाग रंगवून कापडाला शोभा आणणे, हे बाटिककामाचे मुख्य तंत्र आहे.
बाटिककाम हे तसे मूलत: भारतीयच. दक्षिणेकडील कोरोमंडल सागरकिनारी प्रदेश हे त्याचे मूळस्थान. पुढे ते दक्षिण आशियात पसरत गेले, पण भारतातून मात्र लुप्त झाले. ही कला जावा बेटांमध्ये इ.स. सातव्या शतकापासून अस्तित्वात असून तिचा खराखुरा विकासही तेथेच झाला म्हणूनच जावा हे बाटिककामाचे माहेरघर बनले. पुढे ही कला इंडोनेशिया व चीनमध्ये पसरली, तर सतराव्या शतकात डचांमुळे ती यूरोपियनांना परिचित झाली. प. बंगालमधील शांतिनिकेतनमध्ये हीच कला नव्या स्वरूपात पुन्हा स्विकारण्यात आली. प्राचीन काळी ईजिप्त. इराण इ. देशांतही बाटिककाम अस्तित्वात असल्याचे उल्लेख मिळतात. विशेषतः प्रतिष्ठित घराण्यांतील मुली हौसेने बाटिककाम करीत असत. बाटिककामाच्या परंपरागत पद्धतीत कापडाचा जो भाग रंगहीन ठेवावयाचा असेल, त्या भागावर प्रथम कारागीर वेळूच्या एखाद्या धारदार पट्टीने मोहोळातील नैसर्गिक मेण चोपडून त्यावर मेणबत्तीने मेण (पॅरॅफिन वॅक्स) पसरवितो व कापडाचा अपेक्षित भाग अवरूद्ध करतो. त्यानंतर मग पार्श्वभूमीला रंग देण्यासाठी तो विशिष्ठ भाग गार पाण्यातील रंगात बुडवितो व मग इतरही भाग क्रमाक्रमाने रंगात बुडवून काढून संपूर्ण कापडच रंगवितो. सरतेशेवटी ते कापड गरम पाण्यात घालून व त्यावरील मेण वितळवून ते स्वच्छ करतो. कापड हाताळताना त्यावरील मेणाचा थर त्याच्या कडकपणामुळे ठिकठिकाणी तुटतो व त्याला भेगा पडतात. त्या बारीक बारीक भेगातून रंग आत झिरपतो आणि कापडावर एक अपूर्व असा वैचित्र्यपूर्ण जाळीदार आकृतिबंध तयार होतो, त्यामुळे ते सुंदर दिसू लागते. बाटिककामासाठी परंपरेने प्रायः सुती वा रेशमी कापडाचाच वापर करण्यात येत असला, तरी लोकरी वा मखमली कापड आणि चर्मपट यांचाही वापर करण्याची प्रथा आहे. तसेच वेळूच्या साध्या पट्टीऐवजी एका विशिष्ट पिचकारीचाही वापर प्राचीन काळी कोरोमंडल किनाऱ्यावरील कारागीर करीत असत. सतराव्या शतकात जांटिंग (Tjanting) नावाचे एक तांब्याचे उपकरण तयार करण्यात आले. त्याला लहान लहान अनेक पन्हळी असतात. त्यांतून मेण सतत झिरपत राहून ते कापडावर एकसारख्या जाडीत पसरण्यास मदत होते. हे उपकरण सर्वत्र वापरात आहे. याशिवाय हौशी कारागीर कुंचल्याचा वापर करूनही मेणाचे लेपाटन करीत असतात.
प्राचीन काळामधील बाटिककामातील आकृतिबंध निळ्या पार्श्वभूमीवर एकरंगी असत परंतु अठराव्या शतकापासून भारतीय मलमलीवरील रंगीबेरंगी आकृतिबंध निर्माण होऊ लागले. तथापि त्यांतूनही परंपरागत शैली आणि प्रतीकात्मकता दिसून येई. बांजी (Banji) शैलीतील आकृतिबंध या प्रकारातीलच होत. काही अन्य शैलींमधील आकृतिबंधांत मात्र भौमितिक स्वरूपाच्या व परस्परांशी मेळ घालणाऱ्या समांतर रेषांचे प्राबल्यही असल्याचे आढळून येते तर काही शैलींमधून पानाफुलांची आकर्षक गुंफण दिसून येते. समारंभप्रसंगी वापरण्यात येणाऱ्या वस्त्रांवरील बाटिककामातून ते धारण करणाऱ्यांची सामाजिक प्रतिष्ठा सूचित करणारे विशिष्ट रंग व विलोभनीय आकृत्या चितारलेल्या असतात. जावामधील बाटिककामातून त्या त्या स्थानिक प्रदेशाची काही प्रतिनिधिक वैशिषट्येही दिसतात. पुढे एकोणिसाव्या-विसाव्या शतकांत बाटिककामातील पारंपरिक शैली मागे पडून त्यातील छपाईचा तांत्रिक भाग तेवढा टिकून राहिला. विशेषतः पाश्चिमात्यांच्या अभिरुची वैचित्र्याचा प्रभाव व त्यांच्याकडून होणारी मागणी यांना अनुसरून निर्यातयोग्य कलाप्रकार म्हणून तेथे बाटिककामामध्ये विविध शैली निर्माण होऊ लागल्या.
कापड छपाईच्या विविध रोध पद्धतींपैकी बाटिककाम-तंत्राचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात साधण्यात येणारा संगमरवरसदृश परिणाम. हा परिणाम साधण्यासाठी त्यातील रोध द्रव्यात मुख्यत: मेणबत्तीच्या मेणासारख्या ठिसूळ द्रव्याचा वापर करणे अगत्याचे असते. हे मेण ठिसूळ असल्यामुळे, त्याच्या बारीक बारीक भेगांतून रंग झिरपतो व त्यातून गुंतागुंतीची मनोरंजक जाळी आकार घेते परंतु अशा स्वरूपाचा परिणाम साधावयाचा नसेल, तर मात्र एक भाग मेणबत्तीच्या मेणात ४ भाग राळेचे मिश्रण करावे लागते. त्यामुळे त्याचा ठिसूळपणा कमी होतो. मोहोळाचे नैसर्गिक मेण कडक व चिकणे असते त्यामुळे त्याचा वापर करण्यात येत नाही. कधीकधी राळेत माती मिसळून त्याचेही लेपन कापडावर करण्यात येते. अलीकडे पाश्चिमात्य देशांत तर मेणाऐवजी खळीचाच वापर करण्यात येतो. आफ्रिकेतील नायजेरियामध्ये योरूबा लोक कसाव्हा नावाच्या एका झाडाच्या भुकटीचा वापर करून बाटिककामाचा परिणाम साधतात. व्यावसायिक दृष्ट्या बाटिक छपाईचा खरा प्रारंभ १८४॰ मध्ये झाला. जावामध्ये तर त्याला कुटिरोद्योगाचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. तेथील प्रत्येक निर्मितीकेंद्राची खास अशी विशिष्ट शैली असून व्यावसायिक दृष्टीने ही केंद्रे यशस्वी झालेली दिसतात.
संदर्भ
[संपादन]- ^ "https://vishwakosh.marathi.gov.in/29191/". External link in
|title=
(सहाय्य)