बद्रीनारायण (चित्रकार)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बद्रीनारायण (जन्म: सिकंदराबाद, २२ जुलै. इ.स. १९२८; निधन: बंगलोर, २३ सप्टेंबर २०१३) हे एक चित्रकार होते. वयाच्या १९व्या वर्षी ते मुंबईत आले आणि तेथेच रमले. बालपणापासूनच ते चित्रे काढत. त्यासाठी त्यांना कोणत्याही कलाविद्यालयात जावे लागले नव्हते. सर्व काही ते अनुभवांतून शिकले, आणि त्यातूनच त्यांनी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली. बद्रीनारायण चेंबूरला रहात असले तरी त्यांना पंडोल आर्ट गॅलरीने, सायनला सुरेश अहियांच्या घरी स्टुडियोला जागा दिली होती. तिथेच ते चित्रे रंगवीत बसलेले असत. अनेक वेळा बद्रीनारायणांना जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रण असे. जगातील बहुतेक सर्वच देशांत बद्रींची चित्रे संग्रहित केलेली आहेत.

मूळ कन्‍नडभाषक असले तरी बद्रीनारायण मराठी उत्तम बोलत. मराठी साहित्य आवडीने वाचत. अनेक मराठी लेखक, कवी, चित्रकार त्यांचे मित्र होते. ते लिखाण मात्र इंग्रजीत करत. त्यांच्या वाचनात योगवासिष्ठ, रामायण, महाभारत यांसारखे ग्रंथ असत. योगी अरविंदांचे सौंदर्यविषयक आणि कलाविषयक विचार समजून घेण्यात त्यांना रस होता. त्याशिवाय त्यांना साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, ज्योतिष आणि अध्यात्म या विषयांतही रुची होती.

बद्रीनारायणांच्या पत्नीचे नाव इंदिरा होते. त्यांना मोनिशा आणि अर्चना अशा दोन मुली होत्या. २००६साली ते मुंबई सोडून बंगलोरला स्थायिक झाले. काही वर्षांनी तेथेच त्यांचे दीर्घ आजाराने २३सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले.