Jump to content

फ्लॅटलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
'फ्लॅटलॅंड: अ रोमॅन्स ऑफ मेनी डायमेनशन्स'
(Flatland: A Romance of Many Dimensions)

लेखक एडविन ॲबट
देश युनायटेड किंग्डम
साहित्य प्रकार काल्पनिक कथा
प्रकाशन संस्था सीली आणि कं.

फ्लॅटलॅंड: अ रोमॅन्स ऑफ मेनी डायमेनशन्स  (इंग्रजी:  Flatland: A Romance of Many Dimensions, अर्थ:  फ्लॅटलॅंड: अनेक मितींची कहाणी, फ्लॅटलॅंड  चा शब्दशः अर्थ "सपाटदेश" असा होऊ शकतो) ही एड्विन ॲबट ॲबट नामक एका इंग्रज शालेय मुख्याध्यापकांनी लिहिलेली उपहासात्मक लघुकादंबरी आहे. या पुस्तकाचे प्रथम प्रकाशन १८८४ साली लंडन मध्ये सीली आणि कं. तर्फे केले गेले.

"ए स्क्वेअर" या टोपणनावाने लिहिलेल्या पुस्तकात एक काल्पनिक  द्विमितिय जग साकारले आहे. या माध्यमातून लेखकाचा मूळ उद्देश त्या काळातील व्हिक्टोरियन समाजावर टिप्पणी करण्याचा होता, परंतु कालांतराने पुस्तकातील मितींचे निरीक्षण हे जास्त लक्षवेधी ठरले आहे.

या पुस्तकावर आधारित काही चित्रपटही बनले आहेत.

फ्लॅटलॅंड मधील एका साध्या घराचे रेखाचित्र

कथेतील द्विमितीय जग भूमितीय आकृत्यांनी वसलेले आहे, ज्यात पुरुष अनेक प्रकारचे बहुभुज आकार आहेत, व स्त्रिया या सरळ रेषा आहेत. कथेचा सूत्रधार "ए. स्क्वेअर" नामक एक चौरस असून, तो "मध्यमवर्गीय व व्यावसायिक गृहस्थ" या सामाजिक स्तराचा सदस्य असतो. पुस्तकाच्या पहिल्या भागात स्क्वेअर हा वाचकांना द्विमितीय जगाची सफर घडवितो व त्यातील भौतिक, ऐतिहासिक व सामाजिक पैलू समजावून सांगतो.

एके दिवशी स्क्वेअरला स्वप्न पडते ज्यात तो एका एक-मितीय जगाला ("लाईनलॅंड", शब्दशः अर्थ "रेषादेश") भेट देतो, ज्याचे रहिवासी बिंदू असतात. या बिंदुंना स्क्वेअरचा आकार फक्त बिंदूंसारखा दिसतो. स्क्वेअर हा अनेक प्रकारे त्या जगाच्या राजाला दुसऱ्या मितीच्या अस्तित्वाबद्दल पटवायचा प्रयत्न करतो परंतु त्यात तो असफल होतो.

या दृष्टांतानंतर स्क्वेअरच्या जगात एक त्रिमितिय गोल (गोळा) आकृती त्याला भेट देते. जसे एकमितीय बिंदू द्विमितीय स्क्वेअरला फक्त बिंदू म्हणूनच ओळखू शकतात, तसेच द्विमितीय स्क्वेअर हा त्रिमितीय गोळ्याला एक वर्तुळ म्हणूनच बघू शकतो. स्क्वेअरला तिसऱ्या मितीच्या अस्तित्वाबद्दल पटवून देण्यासाठी गोळा स्क्वेअरच्या जगातून हळूहळू "वर"पासून "खाली" जातो, जेणेकरून स्क्वेअरला आधी मोठे होत जाणारे, नंतर लहान होत जाणारे व शेवटी नाहीसे होणारे वर्तुळ दिसते. हे सर्व द्विमितीय स्क्वेअर करता अद्भुत असते.

यानंतरही स्क्वेअरचे शंकानिरसन न झाल्याने गोळा त्याला फ्लॅटलॅंड मधून "उचलून" स्पेसलॅंड (शब्दशः अर्थ: "अवकाशदेश") या त्रिमितीय जगात नेतो. तेथे स्क्वेअरची अखेर खात्री पटते.

References

[संपादन]