प्लेटो आणि ॲरिस्टॉटलचा अनुकृती सिद्धांत
पाश्चात्य साहित्यिक आद्य तत्त्वज्ञ सोक्रेटीसचा शिष्य आणि आणि ॲरिस्टॉटलचा गुरू असणाऱ्या प्लेटोने साहित्याच्या सैद्धांतिक निरूपणाचा पाया घातला. कला म्हणजे अनुकरण किंवा अनुकृती (Art is Imitation) हा सिद्धांत प्लेटोच्या काळापर्यंत परिचित झालेला होता. ईश्वरकृत [१][१]आदर्श हीच वास्तविक सत्ता असते, या आदर्श विश्वाची अनुकृती म्हणजे कला होत. Imitation या शब्दाचा मूळ ग्रीक धातू mimeisthai असा असून त्याचा अर्थ दुसऱ्याने केले तसे करणे हा आहे. परंतु ग्रीक भाषा व्यवहारात या धातूची व्याप्ती अनुकृती करणे, दर्शन घडवणे, निर्देश करणे, आविष्कृत करणे अशी झालेली दिसते.
प्लेटो
[संपादन]प्लेटो हा शुद्ध तात्त्विक विचारांचा आणि गणिती तत्त्वांचा पुरस्कार करणारा होता. त्याचा कालखंड इ.स. पूर्व ४२७ते इ.स. पूर्व ३४७ हा आहे. यावेळी ग्रीक नगरराज्ये विघटनाच्या अवस्थेत होती. सर्वत्र नैतिक आणि बौद्धिक अधःपतन झाले होते. या काळात प्रज्ञानी आणि बुद्धिवादी असणारा सोक्रेटीस प्रबोधनासाठी धडपडत होता. मात्र त्याची कृत्ये ही धर्मसंस्था आणि राज्यसंस्थेच्या विरोधात असून तो युवकांना बिघडवत आहे असा ठपका सोक्रेटीसवर ठेवण्यात आला होता. तुरुंगात कैद सोक्रेटीसला हॅमलोक विष देऊन मृत्युदंड देण्यात आला. हे सर्व प्लेटो पाहत होता. आपल्या बुद्धिवादी गुरूला दांभिक आणि बुद्धीविरोधी लोकांनी कसे मारले हे पाहून संवेदनशील प्लेटोला लोकशाहीला विकृत करणाऱ्यांचा राग आला. प्रचलित राजकारण आणि समाजरचना पूर्णपणे बदलून टाकावी म्हणून त्याने रिपब्लिक हा ग्रंथ लिहिला. मात्र हा ग्रंथ लिहित असताना तो सोक्रेटीसच्या बुद्धीवादापासून दूर गेला. आणि आध्यात्मिक नैतिकतेचा आदर्श गौरवून सांगणारा प्लेटो जिने त्याच्या बुद्धिवादी गुरूला मारले तिचाच अनावधानाने कैवारी ठरला.
प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथामध्येच त्याचे कलाविषयक विचार दिसून येतात. त्याच्यामते सत्याचा शोध केवळ बुद्धीलाच घेता येतो आणि बुद्धीच्या प्रकाशातच जीवनाची घडी व्यवस्थित बसवता येते. प्लेटोचे तत्त्वज्ञान हे अनुभवजन्य आणि इंद्रियजन्य ज्ञानाला कमी लेखणारे होते. प्लेटो ईश्वर आणि अध्यात्म मानणारा तत्त्वज्ञानी आहे. त्याच्यामते या विश्वातील सर्व गोष्टीविकारी, विनाशी आणि परिवर्तनशील आहेत. मात्र त्यांचे मानवाला जाणवणारे इंद्रियजन्य स्वरूप म्हणजे अंतिम सत्य नव्हे. या सर्व वस्तूंच्या मुळाशी काहीएक सत्त्व वसत असते. यालाच चिद्रूप असे म्हणतात. हे चिद्रूप इंद्रियगोचर नसते. ते अविकारी, अविनाशी आणि अपरिवर्तनशील असते. केवळ बुद्धीला आकलन होणारे हे चिद्रूप म्हणजेच अंतिम सत्य होय. याचिद्रूपाची परिणीती शिवतत्त्वात (Good)होते. आणि या चिद्रूपाचे आकलन केवळ विचारशील आत्माच करू शकतो. प्लेटोचे हे तत्त्वज्ञान समजून घ्यायचे असल्यास त्याचे मांडलेली आत्म्याच्या तीन भागांची कल्पना समजून घ्यावी लागेल.
प्लेटोने माणसाच्या आत्म्याचे तीन भाग केले आहेत. त्याच्या मते आत्म्याचा पहिला भाग हा अमर, अविनाशी आणि अभेद्य असतो. आत्म्याचा हा भाग विचारशील असतो. तर दुसरा भाग हा विनाशी आणि विच्छेद्य असतो. शौर्य, संयम, क्षमाशीलता आदी गुणांचे अधिष्ठान आत्म्याच्या या भागातच असते. तर तिसरा भाग हा विनाशी आणि संग्रह्शील असतो. मानवेतरांमध्ये आत्म्याचा पहिला विचारशील भाग नसतो. अन्य दोन भाग मात्र असतात. चिद्रूपामागील कार्यकर शिवतत्त्वाचे आकलन फक्त आत्म्याचा हा पहिला भाग करू शकतो. चिद्रूपाव्यतिरिक्त जे उरते ते सर्व असत्य असते. आणि सत्याचा शोध घेण्याचा अधिकार केवळ तत्त्वज्ञानाला आहे, कलांना नाही. प्लेटोच्या मते कला आणि वाड्मयाचा विचारशील आत्म्याशी असणारा संबंध तुटला आणि आत्म्याच्या दुय्यम भागाशी प्रस्थापित झाला. त्यामुळेच कला आणि वाङ्मयाला गौणत्त्व प्राप्त झाले.
प्लेटो म्हणतो की, अंतिम सत्य हे शाश्वत आणि एकमेव असले पाहिजे. कला आणि साहित्य या अंतिम सत्यापर्यंत पोहचू शकत नाही. किंबहुना साहित्यादी कला या अंतिम सत्यापासून दोन पायऱ्या खाली ढकललेल्या (Twice removed from truth) असतात. हे कशाप्रकारे घडते ते प्लेटोने पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.
१) पहिल्या पातळीवर ईश्वरनिर्मित मूळ रूप किवा आदर्श रूप असते. हे इंद्रियातीत आणि बुद्धिगम्य रूप म्हणजेच अंतिम सत्य होय. उदा: पलंगाचे पलंगपण म्हणजेच पलंगामागची अव्यक्त कल्पना. अनेक विवक्षित पलंगाचे हे वैश्विक आणि शाश्वत रूप असते.
२) दुसऱ्या पातळीवर पलंगपणाची अर्थात चिद्रूपाची अनुकृती करणारा सुतार किंवा लोहार आहे. त्याने केलेली अनुकृती ही विवक्षिताची अनुकृती असते. ही अनुकृतीप्रत्यक्षात उपयोगात आणता येईल अशा स्वरूपाची असते. मात्र ही चिद्रूपाची अपूर्ण प्रतिकृती असते.
३)तिसऱ्या पातळीवर चित्रकार / कलावंत सुतार किंवा लोहार यांनी बनविलेल्या पलंगाचे रंगरेषा यांच्या माध्यमातून चित्र काढतो. हे चित्र म्हणजे सुताराच्या पलंगाची अनुकृती असते. म्हणजेच चित्र-साहित्यादी ललित कला या अनुकृतीची अनुकृती (Imitation of Imitation) असतात.
प्लेटोच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे पलंगाचे चिद्रूप हे अंतिम सत्य (Abstract) असते. सुताराने बनवलेला पलंग (Concrit) चिद्रूपाची अनुकृती असते. हा पलंग जीवनाला उपयुक्त असल्याने व त्या अनुकृतीच्या सहाय्याने मूळ चिद्रूपाची मनाला जाणीव होत असल्याने सुताराने पलंग तयार करणे हितावह आहे. पण सुताराच्या या पलंगाची जेव्हा चित्रकार रंग, रेषा, यांच्या सहाय्याने किंवा साहित्यिक शब्द आणि अर्थाच्या सहाय्याने अनुकृती तेव्हा यातील कोणतीही गोष्ट साधत नाही. कारण चित्रकार किंवा लेखकाने चितारलेला / वर्णन केलेला पलंग म्हणजे अनुकृतीची अनुकृती असते. या प्रतिपादनाने प्लेटोने सर्वच ललित कलांना अंतिम सत्यापासून दूर ढकलत तत्त्वज्ञान आणि सत्यसंशोधनाला महत्त्व दिले आहे.
ॲरीस्टॉटल
[संपादन]पाश्चात्य साहित्यशास्त्राची गंगोत्री म्हणून ॲरिस्टॉटलचा गौरव केला जातो. ख्रिस्तपूर्व ३८४ ते ३२२ हा त्याचा कालखंड होता. सुप्रसिद्ध तत्त्ववेत्ता प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडरचा गुरू असलेल्या ॲरिस्टॉटलचा काव्यशास्त्र (Poetics) हा पाश्चात्य साहित्यशास्त्रातील महत्त्वाचा ग्रंथ आहे. तत्कालीन महाकवी होमर, इक्लीस, सोफाक्लीस यांसारख्या विख्यात नाटककारांची नाटके, प्लेटोचे गद्य साहित्य यांच्या चिकित्सक अभ्यासातून त्याने आपले साहित्य सिद्धांत मांडले.
ॲरिस्टॉटलने आपल्या गुरूचेच Art Imitates Nature हे तत्त्व स्वीकारले. मात्र या तत्त्वाची मांडणी करताना ॲरिस्टॉटलने अगदी टोकाचे निष्कर्ष काढून दाखवले. काव्यामुळे नैतिक अधःपतन होण्याऐवजी माणसाच्या चित्ताचे शुद्धीकरण आणि उदात्तीकरण होते. असा सिद्धांत प्रस्थापित करून त्याने प्लेटोप्रणित अनुकृती सिद्धांताचा चेहरामोहराच बदलून टाकला. प्लेटोने कलावंत हा बाह्यसृष्टीचे अनुकरण करत असतो असे म्हणले आहे. हे अनुकरण अर्थातच अज्ञानजन्य, खोटे असते. म्हणूनच प्लेटो कवी आणि लेखकांचा तिरस्कार करतो. ॲरिस्टॉटलने या विचारसरणीचे खंडन करून अनुकृती सिद्धांताला वेगळी बैठक प्राप्त करून दिली.
अनुकृती सिद्धांताच्या मागील मूळ तत्त्व म्हणजे कला या प्रकृतीची अनुकृती असतात (Art Imitates Nature ) हे आहे. यातील प्रकृती म्हणजे जड व बाह्यसृष्टी आहे. प्रत्येक वस्तू विकसित झाल्यावर जशी दिसेल वा जशी असेल तिला प्रकृती असे म्हणतात. असे पूर्ण विकसित रूप हेच या वस्तूचे आदर्शरूप असते. पण त्यात अडथळे निर्माण होत असल्याने प्रगतीत अडथळा निर्माण होतो. कलावंत हे अडथळे दूर करून आपल्या निर्मिती प्रक्रियेच्या जोरावर आपल्या कलेत त्या वस्तूला पूर्णत्त्व देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच कलावंत एक प्रकारे वस्तू तिच्या आदर्श रूपात प्रकट करत असतो. कलावंत एकप्रकारे सृष्टीच्या निर्मितीचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करतो. या दृष्टीने कलावंत सृष्टीत जे चांगले आहे किंवा जे चांगले असायला हवे त्याचे अर्थात शिवाचेच अनुकरण करत असतो.
ॲरिस्टॉटलने या अनुकृतीचे काही विशेष सांगितले आहेत. त्यांच्या मते काव्यातील अनुकृती व्यक्तीचे वा वस्तूचे अंतर्बाह्य दर्शन घडवत असते. काव्यामध्ये बाह्य जगातील वास्तवापेक्षा त्याच्या प्रतीयमान रूपाचे अनुकरण अधिक होते. वस्तू कशी आहे यापेक्षा ती कशी असू शकते किंवा ती कशी असायला हवी याचे काव्यात होणारे अनुकरण महत्त्वाचे असते. ॲरिस्टॉटलच्या मते कलेत वा काव्यात तीन रूपाचे अनुकरण केले जाते. ही रूपे पुढीलप्रमाणे :-
१) प्रतीयमान रूप : प्रतीयमान रूप म्हणजे वस्तूचे किंवा व्यक्तीचे कलावंताला प्रतीत होणारे रूप.
२) संभाव्य रूप : संभाव्य रूप म्हणजे वस्तूचे किंवा व्यक्तीचे जसे रूप असू शकते असे रूप.
३) आदर्श रूप : आदर्श रूप म्हणजे वस्तू किंवा व्यक्ती आदर्श रूपात जशी असावी ते रूप.
ॲरिस्टॉटलने ही रूपे मांडत असतानाच सर्जनशील अनुकृतीशीलता (Creative Imitation)महत्त्वाची मानली आहे. त्याच्या दृष्टीने अनुकृतीचे माध्यम, अनुकृतीच्या वस्तू आणि अनुकृतीच्या पद्धती यामुळे ललित कलाकृतींमध्ये परस्पर भिन्नता निर्माण होते. म्हणून प्रत्येक कलाकृती हा अनुकृतीचा विशेष प्रकार असते. त्याची अनुकृतीची कल्पना प्लेटोपेक्षा वेगळीच आहे. ललितकलेतील अनुकृती ही विवक्षिताची अनुकृती नसून विश्वात्मकाची अनुकृती आहे असे ॲरिस्टॉटलचे मत आहे. या विश्वात्मकाच्या प्रत्ययाने होणारे विचारशील आत्म्याचे समाधान हे त्या ललितकलेचे – अनुकृतीचे प्रधान उद्दिष्ट आहे. साहित्यकृतीतील वैश्विकता किंवा वस्तुनिष्ठा हे त्या साहित्यकलेचे वैशिष्ट्य असते. कलावंतालाच ते निर्माण करण्याचे श्रेय असते. साहित्यातील मानवी मताची आणि जीवनाची तीव्र अनुभूती ही कलावंताची सर्जनशील निर्मिती असते. ती प्लेटोला जाणवते तशी अनुकृतीची अनुकृती नसून ती साहित्यकृतीतून विश्वात्मक सत्य उलगडते. एखाद्या ऐतिहासिक सत्यापेक्षाही ते महत्त्वाचे असते. असे ॲरिस्टॉटलचे मत आहे. [२]
प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांनी मांडलेला अनुकृती विचार आकृतीच्या स्वरूपात पुढीलप्रकारे दाखवता येतो.
प्लेटो | ॲरिस्टॉटल |
पलंगपण | पलंगपण |
सुताराचा पलंग | चित्रकाराने रेखलेला पलंग |
चित्रकाराने रेखलेला पलंग | सुताराचा पलंग |
प्लेटो सुताराच्या पलंगाला उपयुक्त मानतो. तर ॲरिस्टॉटल कलाकाराच्या पलंगाचे मोल विशेष मानतो. पलंगपणाच्या वास्तवाला साकार करण्याच्या दृष्टीने ॲरिस्टॉटलच्या अनुकृती सिद्धांताची कल्पना अधिक ग्राह्य मानली आहे. कलावंत-प्रतिभावंताचा पलंग हा सुताराच्या पलंगापेक्षा निश्चितच पलंगपणाच्या कल्पनेजवळ जाणारा आहे. प्लेटोने कला म्हणजे केवळ अनिकृतीची अनुकृती मानली तर ॲरिस्टॉटलने त्याला सर्जनशील अनुकृतीची संज्ञा दिली. मनुष्य स्वभाव, मानवी मन आणि मानवी जीवन, संवेदना यांचे सर्जनशीलतेच्या पातळीवरून केलेले हे अनुकरण सर्जनशील अनुकृतीवादात ॲरिस्टॉटलला अभिप्रेत आहे. [३][४][५]